>> वीजमंत्री काब्राल यांची माहिती
गोव्याला दक्षिण क्षेत्र ग्रीडकडून मिळणार्या वीज पुरवठ्यामध्ये वरच्यावर बिघाड होत असल्याने दक्षिण गोव्यातील वीज पुरवठ्यावर विपरीत परिणाम होत असून नागरिकांना वीज समस्येला तोंड द्यावे लागत आहे. मागील १८ तास कर्नाटकातून होणारा वीज पुरवठा बंद आहे. दक्षिण गोव्यातील विजेची समस्या सोडविण्यासाठी पश्चिम क्षेत्र ग्रीडमधून दक्षिण गोव्यात वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.
राज्यात विजेची निर्मिती केली जात नाही. राज्य सरकार पश्चिम आणि दक्षिण क्षेत्र ग्रीडकडून वीज विकत घेत आहे. पश्चिम ग्रीडमधून घेण्यात येणार्या विजेचे वितरण उत्तर गोव्यात केले जाते. तर, दक्षिण ग्रीडकडून घेण्यात येणार्या विजेचे वितरण दक्षिण गोव्यात केले जात आहे. कर्नाटकातून गोव्यात येणारी ८० किलो मीटर वीज वाहिनी जंगलातून येत आहे. ४० किलोमीटर वाहिनी कर्नाटक राज्याच्या क्षेत्रात येते. तर, ४० किलो मीटरची वाहिनी राज्याच्या अखत्यारीत येते. या वाहिनीवर मागील सहा महिन्यांत ९० वेळा बिघाड झाल्याने वीज पुरवठ्यावर परिणाम होत आहे. या वाहिनीवर गोवा क्षेत्रात सात वेळा तर, कर्नाटक क्षेत्रात ८३ वेळा बिघाड झाला आहे. त्यामुळे येत्या पंधरा दिवसांत दक्षिण गोव्यात पश्चिम ग्रीडकडून वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही काब्राल यांनी सांगितले.