दक्षिण गोव्यात सनबर्न महोत्सवाला परवानगी नाहीच

0
7

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे मंत्री माविन गुदिन्हो, आमदार आलेक्स रेजिनाल्ड व आंतोझ वाझ यांना आश्वासन

सनबर्न ईडीएम महोत्सव दक्षिण गोव्यात आयोजित करण्यास सरकार परवानगी देणार नाही, असे आश्वासन काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सत्ताधारी आमदारांना दिले. त्यामुळे वादग्रस्त सनबर्न ईडीएम यंदा दक्षिण गोव्यात होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. वाहतूक व पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, अपक्ष आमदार व आयडीसीचे चेअरमन आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स व अन्य एक अपक्ष आमदार आंतोन वाझ यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेऊन सनबर्न संगीत महोत्सवाला दक्षिण गोव्यात परवानगी देऊ नये, अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. ती मागणी मुख्यमंत्र्यांनी काल मान्य केली.

विरोधी पक्षांचे आमदार व पदाधिकारी, तसेच दक्षिण गोव्यातील काही बिगर सरकारी संघटना व जागरुक नागरिकांनी दक्षिण गोव्यात सनबर्नचे आयोजन करण्यास सरकारने परवानगी देऊ नये, अशी मागणी करतानाच लोकांचा विरोध डावलून सरकारने या संगीत महोत्सवाला परवानगी देण्याचा प्रयत्न केल्यास त्याला जोरदार विरोध करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. दक्षिण गोव्यातील काही पंचायतीत झालेल्या ग्रामसभांतही सनबर्नला परवानगी देऊ नये, असे ठरावही संमत करण्यात आले होते.

या पार्श्वभूमीवर सनबर्नला दक्षिण गोव्यात संगीत महोत्सव आयोजित करण्यास परवानगी न देण्याचा निर्णय सरकारने तत्वत: घेतला आहे, अशी माहिती काल आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी दिली.
आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना दक्षिण गोव्यात सनबर्न आयोजित करण्यास लोकांचा प्रचंड विरोध असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. आमचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सनबर्नला दक्षिण गोव्यात संगीत महोत्सव आयोजित करण्यास परवानगी देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केल्याचे रेजिनाल्ड यांनी सांगितले.

याशिवाय सनबर्नच्या आयोजकांचीही आम्ही भेट घेतली व त्यांना दक्षिण गोव्यात संगीत महोत्सव आयोजित करण्याचा विचार सोडून द्या, असे त्यांनाही सांगितल्याचे रेजिनाल्ड म्हणाले.
सनबर्न या संगीत व नृत्य महोत्सवाचे दरवर्षी डिसेंबर महिन्यात वागातोर येथे किनारी भागात आयोजन करण्यात येत होते; पण डिसेंबर महिन्यात उत्तर गोव्यातील किनारपट्टी भागात नववर्षासाठी येणारे लाखो पर्यटक, तसेच या संगीत महोत्सवानिमित्त खास येणारे आणखी हजारो पर्यटक यामुळे वागातोर व आसपासच्या भागांत प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक लोकांचा सनबर्नला वाढता विरोध होऊ लागल्याच्या पार्श्वभूमीवर सनबर्न आयोजक हा महोत्सव यंदा दक्षिण गोव्यात आयोजित करू पाहत होते, तसेच त्यांनी महोत्सवासाठीची तिकीट विक्री देखील सुरू केली होती.

हा महोत्सव दक्षिण गोव्यात होऊ नये यासाठी आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी केलेली शिष्टाई सफल झाल्याचे भाजपमधील सूत्रांनी दै. ‘नवप्रभा’शी बोलताना सांगितले. रेजिनाल्ड यांनी लोकभावना व्यवस्थितपणे मुख्यमंत्र्यांकडे पोचवल्या व त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सनबर्नला दक्षिण गोव्यात परवानगी न देण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.