दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ हे सुसज्ज व सगळ्या सोयी सुविधांनी युक्त असे इस्पितळ बनवण्यात येणार असून त्यासाठी चर्चा करण्यासाठी पुढील आठवड्यात आपली मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याबरोबर बैठक होणार असल्याची माहिती काल आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी पत्रकारांशी अनौपचारिकरित्या बोलताना दिली.
या इस्पितळात कोणकोणते विभाग सुरू करणार ते सुसज्ज बनवायला हवेत, तसेच त्यासाठी किती डॉक्टर्स व अन्य मनुष्यबळाची गरज आहे. त्याचबरोबर कोणकोणती वैद्यकीय उपकरणे आणण्याची गरज आहे याचा सविस्तर अहवाल तयार करण्यात येणार असून नंतर टप्प्याटप्याने हे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती राणे यांनी दिली.
दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाविषयी आम्ही जनतेला जी जी आश्वासने दिली होती ती सगळी पूर्ण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
दक्षिण गोव्यातील लोकांना दक्षिण गोव्यातच योग्य ती वैद्यकीय सेवा मिळायला हवी या मताचा आपण असल्याचे सांगून दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ सुसज्ज बवण्यात येणार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ बऱ्याच वेळा तेथील रुग्णांना गोमेकॉत हलवत असते असे राणे यांच्या नजरेत आणून दिले असता ते म्हणाले की गोमेकॉत सुपर स्पेशालिटी विभाग आहे. त्यामुळे बऱ्याचदा गंभीर दुखणी असलेल्या रुग्णांना चांगले उपचार मिळावेत यासाठी तेथे हलवण्यात येत असते. आपण स्वत: खासगी इस्पितळात न जाता गोमेकॉत स्वत:वर शस्त्रक्रिया करून घेतली आहे. त्याचबरोबर आपले वडील प्रतापसिंह राणे हे आजारी असताना त्यांच्यावरही गोमेकॉतच उपचार करण्यात आले होते याची त्यांनी आठवण करून दिली.
दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ प्रकरण उच्च न्यायालयात पोचले आहे. त्याविषयी राणे यांना विचारले असता ते म्हणाले की प्रकरण न्यायालयात गेले म्हणून इस्पितळात सुधारणा होईल असे नाही. सदर इस्पितळाचा दर्जा वाढवण्याबाबत सरकार कधीपासून विचार करीत आहे आणि ते सगळे करण्यास थोडा वेळ हा लागणारच असल्याचे ते म्हणाले.