दक्षिण कोरियात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा

0
4

>> कार्यवाहक राष्ट्रपतींकडून सर्व विमान कंपन्यांच्या तपासणीचे आदेश

दक्षिण कोरियातील विमान अपघातानंतर, कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष चोई संग मोक यांनी सोमवारी देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला. यासोबतच विमान कंपन्यांच्या सर्व यंत्रणांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.
रविवारी बँकॉकहून येणारे जेजू एअरचे बोईंग 737-800 विमान मुआन विमानतळावर उतरत होते, परंतु गिअरमध्ये बिघाड झाल्यामुळे त्याची चाके उघडली नाहीत. बेली लँडिंगच्या प्रयत्नात विमान क्रॅश झाले आणि त्यात 179 जणांचा मृत्यू झाला.

या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 84 पुरुष आणि 85 महिलांचा समावेश आहे. तर 10 मृतदेहांचे लिंग कळू शकलेले नाही. मृत्युमुखी पडलेल्या 146 जणांची ओळख पटली आहे, उर्वरित लोकांची ओळख जाणून घेण्यासाठी डीएनए चाचणी केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

या अपघातातून बचावलेल्या दोन क्रू मेंबर्सवर उपचार सुरू आहेत. शुद्धीवर आल्यानंतर दोघांनाही मोठा धक्का बसला आहे. अपघाताबद्दल त्यांना स्पष्टपणे काहीही आठवत नाही. अपघातातून बचावलेले दोन क्रू मेंबर्स प्रवाशांच्या मदतीसाठी विमानाच्या मागील बाजूस तैनात होते. त्यापैकी 32 वर्षीय ली नामक कर्मचारी अजूनही धक्क्यात आहे. तो वारंवार विचारत आहे की त्याला काय झाले आहे? आणि तो इथे का आहे? लीच्या डाव्या खांद्याला आणि डोक्याला दुखापत झाली आहे, परंतु त्याची प्रकृती स्थिर आहे.

25 वर्षीय फ्लाइट अटेंडंट क्वॉन हेही या अपघातातून थोडक्यात बचावले. त्यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. क्वॉनला देखील अपघाताबद्दल काहीही आठवत नाही. त्यांच्या डोके, घोटा आणि पोटात तीव्र वेदना जाणवत आहे. क्वॉनच्या जखमा गंभीर असल्या तरी जीवाला धोका नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दोन ब्लॅक बॉक्स व व्हॉईस रेकॉर्डर जप्त
विमानात टेकऑफ आणि लँडिंगसाठी वापरलेली चाके पूर्णपणे उघडली नव्हती. मात्र, ते न उघडण्यामागचे कारण काय, हे अद्याप समजू शकलेले नाही. अपघातस्थळावरून दोन ब्लॅक बॉक्स, फ्लाइट डेटा आणि व्हॉईस रेकॉर्डर जप्त करण्यात आल्याचे नागरी उड्डाण मंत्रालयाने सांगितले. तथापि, त्या सामग्रीचे बरेच नुकसान झाले आहे, ज्यामुळे ते राजधानी सेऊलमधील लनाइज सेंटरमध्ये पाठवले जाईल.

पायलटला 6800 तासांचा उड्डाणाचा अनुभव
दक्षिण कोरियाच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने सांगितले की, कंट्रोल टॉवरने पायलटला पक्ष्यांच्या टक्करबाबत अलर्ट पाठवला होता. त्यानंतर त्याला मार्ग बदलून विरुद्ध दिशेने उतरण्याच्या सूचना देण्यात आल्या. पायलटने सूचनांचे पूर्णपणे पालन केले. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, विमानाचा मुख्य पायलट 2019 पासून या पदावर होता आणि त्याला सुमारे 6800 तास उड्डाणाचा अनुभव होता.