
ऑस्ट्रेलियाविरुद्धचा चौथा कसोटी सामना जिंकून मालिका ३-१ अशी खिशात घालण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला अजून ७ गड्यांची आवश्यकता आहे. यजमानांनी विजयासाठी ठेवलेल्या ६१२ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची चौथ्या दिवसअखेर ३ बाद ८८ अशी स्थिती झाली आहे. जिगरबाज मॉर्ने मॉर्कलने पूर्ण तंदुरुस्त नसतानादेखील आपल्या शेवटच्या कसोटीच्या शेवटच्या डावात गोलंदाजी करताना कांगारूंची दोन आघाडीचे फलंदाज माघारी धाडत आपल्या संघाला वर्चस्व प्रस्थापित करून दिले.
तत्पूर्वी, द. आफ्रिकेने तिसर्या दिवसाच्या ३ बाद १३४ धावांवरून पुढे खेळताना काल आपला दुसरा डाव ३४४ धावांवर घोषित केला. मॉर्कल पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने दक्षिण आफ्रिकेने अधिक धोका न पत्करता मोठे लक्ष्य दिले. यजमान संघ पाहुण्यांना ४५० ते ५०० यादरम्यान लक्ष्य देणे अपेक्षित होते. परंतु, मॉर्कल पूर्ण क्षमतेनिशी गोलंदाजी करू शकत नसल्याने त्यांनी मोठी धावसंख्या उभारली. फाफ ड्युप्लेसीने आपले आठवे कसोटी शतक झळकावले तर एल्गारने आपल्या १२व्या कसोटी अर्धशतकाची नोंद केली.
धावफलक
दक्षिण आफ्रिका पहिला डाव ः ४८८, ऑस्ट्रेलिया पहिला डाव ः सर्वबाद २२१
दक्षिण आफ्रिका दुसरा डाव ः ३ बाद १३४ वरून ः डीन एल्गार झे. मार्श गो. लायन ८१, फाफ ड्युप्लेसी झे. हँड्सकोंब गो. कमिन्स १२०, तेंबा बवुमा नाबाद ३५, क्विंटन डी कॉक पायचीत गो. कमिन्स ४, व्हर्नोन फिलेंडर नाबाद ३३, अवांतर १२, एकूण १०५ षटकांत ६ बाद ३४४ घोषित
गोलंदाजी ः जोश हेझलवूड २१-६-४१-०, चाड सेयर्स १४-२-६८-०, नॅथन लायन ४१-१३-११६-२, पॅट कमिन्स १८-५-५८-४, मिचेल मार्श ८-०-४०-०, मॅट रेनशॉ ३-०-९-०
ऑस्ट्रेलिया दुसरा डाव ः मॅट रेनशॉ पायचीत गो. मॉर्कल ५, ज्यो बर्न्स पायचीत गो. मॉर्कल ४२, उस्मान ख्वाजा पायचीत गो. महाराज ७, पीटर हँड्सकोंब नाबाद २३, शॉन मार्श नाबाद ७, अवांतर ४, एकूण ३० षटकांत ३ बाद ८८
गोलंदाजी ः कगिसो रबाडा ५-२-९-०, व्हर्नोन फिलेंडर ५-२-९-०, केशव महाराज १०-१-४५-१, मॉर्ने मॉर्कल ८-४-१८-२, ऐडन मारक्रम २-०-६-०