दक्षिणेवर डोळा

0
43

कॉंग्रेसमधील आठ बंडखोरांना पक्षात प्रवेश देऊन भारतीय जनता पक्षाने मुख्यत्वे आगामी लोकसभा निवडणुकीसाठीची आपली गणिते नव्याने जुळवायचा प्रयत्न केला आहे. प्रसंगी त्यासाठी आपले स्वतःचे कार्यकर्ते गाळात गेले तरी चालतील, परंतु निष्ठावंतांपेक्षा अधिक ‘विनेबिलिटी’ असलेल्या व गेल्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून ती दाखवून दिलेल्या या उपर्‍यांना पक्षात घेणे अधिक लाभदायक ठरेल असा हा साधासरळ हिशेब आहे. ‘ह्या आठजणांना पक्षात घेण्याचा निर्णय पक्षाच्या केंद्रीय नेत्यांचा आहे व राष्ट्रीय पक्ष असल्याने तो पाळणे हे आमचे काम आहे; आपले मत विचारले गेले असते तर कदाचित आपण ‘नाही’ म्हणालो असतो,’ असे काल भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे म्हणाले. त्यातून एकीकडे त्यांची हतबलता व्यक्त होतेच, परंतु केंद्रीय नेत्यांकडे बोट दाखवून या पक्षप्रवेशाने दुखावलेल्या त्या आठ मतदारसंघांतील स्वपक्षीयांचा असंतोष शमविण्याची धडपड त्याहून अधिक दिसते. आठजणांच्या या पक्षप्रवेशाबाबत त्या त्या मतदारसंघातील पक्षाचे मागील उमेदवार व कार्यकर्ते प्रदेशाध्यक्ष या नात्याने आपल्यालाच जाब विचारणार आहेत हे तानावडे जाणून आहेत. त्यामुळेच त्यांनी चेंडू आधीच दिल्लीला टोलवला आहे.
भाजपचे आता लक्ष्य आहे ती २०२४ ची लोकसभा निवडणूक. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीला अद्याप बराच अवकाश आहे. त्यामुळे त्या समीकरणांचा विचार करण्याची पक्षाला आज गरज वाटत नाही. लोकसभेच्या दोन्ही जागांवर मात्र काहीही करून भाजपाची मोहोर उठलीच पाहिजे याचे नियोजन आता सुरू झाले आहे. कालच्या आठजणांच्या पक्षप्रवेशामुळे त्या मतदारसंघांमधील आपले बळ वाढेल असे भाजपा नेतृत्वाला वाटते. विशेषतः ज्या दक्षिण गोव्याच्या जागेने गेल्या निवडणुकीत नऊ हजार मतांनी हुलकावणी दिली, ती जागा काहीही करून पक्षाला जिंकायची आहे. त्यासाठी दिगंबर कामत हा हुकुमी एक्का आता पक्षाला गवसला आहे. पर्रीकरनिष्ठांना विद्यमान मुख्यमंत्र्यांनी दूर ठेवल्याने आणि उत्पल यांना उमेदवारी नाकारल्याने दुखावलेल्या सारस्वत समुदायाला जवळ आणण्याची गरज पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला वाटत होती. त्यामुळेच दिगंबर यांच्या पक्षप्रवेशास वरून हिरवा कंदील मिळाला. त्यांचे गोव्यात पुनर्वसन होते की दिल्लीसाठी विचार होतो हे लवकरच कळेल, परंतु दिगंबर यांच्यासारखा मडगाव मतदारसंघावर उत्तम पकड असलेला, तेथून आठ वेळा निवडून आलेला व त्याहून महत्त्वाचे म्हणजे समविचारी नेता पक्षाला हवाच होता. त्यामुळे सतरा वर्षांनी झालेला त्यांचा हा पुनःप्रवेश भाजपसाठी महत्त्वाचा आहे. आलेक्स सिकेरांमुळे नुवेसारख्या मतदारसंघात भाजपाला पुन्हा चंचुप्रवेशाची संधी मिळणार आहे. संकल्प आमोणकरांच्या येण्याने भले मिलिंद नाईक अडगळीत फेकले जातील, पण लोकसभा निवडणुकीत मुरगावमध्ये आघाडी मिळवता येईल असे पक्षाला वाटते. तोच प्रकार कळंगुटचा, साळगावचा, कुंभारजुव्याचा आहे. मायकल लोबोंच्या विरोधात पक्षात आणलेले कळंगुटचे माजी सरपंच जोसेफ सिक्वेरा यांची गरज आता संपलेली आहे. साळगावात गोवा फॉरवर्डमधून पक्षात आवर्जून आणले गेलेले जयेश साळगावकर यांच्या जागी केदार नाईक आता मायकलच्या आशीर्वादाने पुढे येतील. सांताक्रुझमध्ये कॉंग्रेसमधून भाजपात आणलेले टोनी फर्नांडिस यांच्या जागी आता रुडॉल्फ असतील. कुंभारजुव्यात तर जेनिता मडकईकरच नव्हे, तर श्रीपाद नाईक यांचे पुत्र सिद्धेश नाईक यांचे राजकीय भवितव्यही अंधःकारमय झाले आहे. पेडण्यातून थेट मडगावात पाठवणी झालेले बाबू आजगावकर तर ‘ना घरका, ना घाटका’ बनले आहेत. या सर्व मतदारसंघांमधून येत्या लोकसभा निवडणुकीत भरघोस मतदान पक्षाच्या पारड्यात पडावे असा जोरदार प्रयत्न होईल.
दक्षिण गोव्यातील कॉंग्रेसचे अस्तित्व आता जवळजवळ पुसले गेले आहे. केपे आणि कुंकळ्ळी सोडल्यास दक्षिण गोव्यातून कॉंग्रेस हद्दपार झाली आहे. सालसेतचा बालेकिल्ला तर उरलेलाच नाही. तिची जागा घ्यायला आप, आरजी, राष्ट्रवादी आणि तृणमूल उतावीळ आहेत. आता सगळे त्यासाठी सक्रिय होतील. गोवा फॉरवर्डलाही आता अस्तित्व टिकवायचे असेल तर पक्षविस्तार हाती घ्यावा लागेल. याउलट भाजपापाशी आता दक्षिण गोव्यात बारा आमदार आहेत. पक्षाच्या ख्रिस्ती आमदारांची संख्याही बारा आहे. गेल्यावेळी सुदिन ढवळीकरांना मंत्रिमंडळातून काढल्याने लोकसभा निवडणुकीत फटका बसला होता. यावेळी सुदिनराव मगोसह सोबत आहेत. या सगळ्यामुळेच उत्तरेबरोबरच दक्षिणेची जागाही जिंकण्याचा जबर आत्मविश्‍वास भाजपाला परवाच्या पक्षांतरांतून मिळाला आहे.