– शंभू भाऊ बांदेकर, साळगाव
जातीयता, विषमता आणि असमानता यात पोखरून निघालेल्या भारत देशात या सर्वांवर मात करून जे अनेक दलित नेते शून्यातून वर आले, त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बाबू जगजीवनराम यांनी दीन-दलित, शोषित-पीडित समाजासाठी जे कार्य केले, त्याचे कौतुक करावे, तितके थोडेच. अशा या थोर नेत्यांपैकी हाल, छळ, पिळवणूक अगदी विद्यार्थीदशेपासून सहन करून आपल्याला जे सहन करावे लागले, ते आपल्या दलित समाजाला सोसावे लागू नये म्हणून स्वतः देशाच्या उपपंतप्रधानांपर्यंत झेप घेऊन समाजापुढे आदर्श निर्माण करणारे व्यक्तिमत्व म्हणजे बाबू जगजीवनराम होय.बिहार राज्यातील एका खेड्यात बाबुजींचा जन्म ५ एप्रिल १९०८ रोजी झाला, हे कुटुंब चर्मकार समाजातील असून स्वच्छ, निर्व्यसनी, देशभक्त व परोपकारी होते. त्यामुळे स्वकियांपासून सवर्णांपर्यंत सर्वांना त्यांच्याबद्दल एक प्रकारची आस्था होती. बाबूजींचे वडील सोहिराम तर सकाळी आंघोळ वगैरे आटोपून देवपूजा केल्याशिवाय पाणी सुद्धा पीत नसत. आपला मुलगा शिकून मोठा व्हावा, तो समाजाच्या, देशाच्या, जगाच्या उपयोगी पडावा असे सोहिराम यांना वाटे. या सद्विचारांतून त्यांनी त्यांचे नाव ‘जगजीवन’ असे ठेवले असावे. त्यासाठी ते देवाकडे प्रार्थना तर करीतच, पण बालवयात तो सुसंस्कारी बनावा यासाठी प्रयत्न करीत. दुर्दैवाने बाबुजींना पितृछत्र फार वर्षे लाभले नाही. त्यांच्या बालवयातच वडिलांचे अकाली निधन झाले. पण माता वासंतीदेवी हिने धीर सोडला नाही. आपल्या पतीची मुलाबद्दलची इच्छा पूर्ण करायचीच अशी जणू तिने प्रतिज्ञाच केली आणि पडेल ते काम करून आपल्या मुलाच्या शिक्षणाची काळजी ती माता वाहू लागली. आपल्या आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना बाबुजी म्हणतात, ‘ती केवळ माझी जन्मदात्री माता नव्हती, तर मी शिकून – सवरून आपल्या भारतमातेची सेवा करावी, अशी मनोमन इच्छा बाळगणारी व त्यासाठी पडेल ते काम करून मला ‘‘घडवणारी’’, काम करणारी ती देवता होती. अशी माता मिळेल, तो पुत्र मोठा झाला नाही, तर नवल!’
बाबुजींचा मोठेपणा अनेक प्रकारांत मोडतो. ते यशस्वी राजकारणी व कर्तबगार संघटक तर होतेच, पण अन्नमंत्री म्हणून केंद्रात असताना त्यांनी देशात हरितक्रांतीचे बीजारोपण केले. संरक्षणमंत्री म्हणून पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधींच्या सहयोगाने त्यांनी बांगलादेशाची निर्मिती तर केलीच, पण भारताच्या वतीने पहिल्यांदा पाकच्या नापाक कृत्यांना दहशत बसवण्याचे काम केले. केंद्रात त्यांना जे जे मंत्रिपद मिळाले, त्या पदाला पूर्ण न्याय देण्याचे काम त्यांनी केले. दीनदलितांचा दबलेला आवाज बोलका करण्याचे, आरक्षणामुळे दलित समाजाला योग्य तो न्याय मिळवून देण्याचे आणि त्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी जीवनाच्या अखेरपर्यंत काम करण्याचे व्रत त्यांनी स्वीकारले आणि म्हणूनच बाबुजी हे राजकारणातील मुत्सद्दी, एक अत्यंत यशस्वी मंत्री आणि दीनदलितांचे सच्चे कैवारी म्हणून ओळखले जातात.
नुकतेच ज्यांना भारत सरकारने ‘भारतरत्न’ देऊन गौरविले, त्या पं. मदन मोहन मालवीयांचे एक उदाहरण बाबुजींच्या विद्यार्थी दशेतला कर्तृत्वाचा एक दाखला म्हणून सांगता येईल. पं. मदनमोहन मालवीय बिहार राज्याच्या दौर्यावर होते. ते बाबुजींचा जन्मगावालाही एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट देणार होते. गावातील उच्चवर्णियांनी तो कार्यक्रम यशस्वी करण्याचा जणू चंगच बांधला. सर्वानुमते पंडितांचे स्वागत करण्याची जबाबदारी बाबुजींवर सोपवण्यात आली. बाबुजींनी ही संधी साधून आपल्या अमोघ वक्तृत्वाने पंडितजींचे असे काही जोरदार स्वागत केले की, गावच्या व आसपासच्या परिसरातील लोक तर खूष झालेच, पण खुद्द पं. मदनमोहनजी भारावून गेले. कार्यक्रमानंतर त्यांनी बाबुजींना आस्थेने आपल्याकडे बोलावून घेतले. काय शिकतोस? पुढे काय करणार? अशी पृच्छा केली. बाबुजी म्हणाले, ‘अजून निश्चित काही ठरलेले नाही. एक मन सांगते पुढे शिकावे. दुसरे मन म्हणते नोकरी करावी. पंडितजी म्हणाले,‘तू हुशार आहेस, आणखी शिक. तुझा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. तुला शिकावेसे वाटले तर बनारसला माझ्या महाविद्यालयामध्ये ये. मी पुढचे पाहून घेईन. बाबुजी पुढे शास्त्र शाखेचे पदवीधर झाले. कायद्याची परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले आणि मग महात्मा गांधींच्या आदेशाचा मान राखत स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले. आपल्या पक्षीय राजकारणास त्यांनी आपल्या शहरातील नगरपालिकेपासून सुरुवात केली. अखिल भारतीय कॉंग्रेस पक्षाचे सदस्य, सचिव अशी पदे त्यांनी राज्यात भूषविली. कॉंग्रेस पक्षाचे आमदार म्हणूनही ते निवडून आले. बिहार राज्यातील सासाराम या राखीव मतदारसंघाचे खासदार म्हणून तर ते तब्बल ४०-४५ वर्षे कार्यरत राहिले. त्यांच्या संघटन कौशल्याची दखल घेऊन त्यांना अखिल भारतीय कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्षपदही भूषविण्याचा मान मिळाला, त्याच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत जास्तीत जास्त खासदार निवडून आणून केंद्रात कॉंग्रेसचे सरकार सत्तेत आणण्याचे काम त्यांनी केले.
त्यांचे वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व या देशाच्या उपपंतप्रधानपदापर्यंत त्यांना नेऊन गेले. अशा या वंदनीय व्यक्तीस ते उपपंतप्रधान असताना गोव्यात त्यांचा सन्मान करण्याचे भाग्य आमच्या दलित संघटनेस लाभले. त्यांचा सत्कार ज्या पणजीच्या गोमंतक साहित्य सेवक मंडळ सभागृहात तत्कालीन सभापती ऍड. गोपाळ आपा कामत यांच्या अध्यक्षतेखाली घडवून आणला, त्याच जागी कालपासून बाबुजींच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविले गेले आहे. हे प्रदर्शन १४ जानेवारीपर्यंत खुले राहणार आहे. त्यानिमित्त बाबुजींच्या पवित्र स्मृतीत विनम्र अभिवादन.