- दत्ताराम प्रभू-साळगावकर
काही लोक आपण कधी बोलतो, कुठे बोलतो, कशाच्या बाबतीत बोलतो ते अजिबात लक्षात न घेता बोलतात. ऐकणार्याला त्याची गंमत वाटते, कोणाला राग पण येतो. पण यांना आपल्याला कोण हसताहेत, आपल्यावर कोण खेकसताहेत याची जाणीवच नसते.
काही लोक फार विचित्रपणाने वागतात. काय करतील, काय बोलतील, कुठे बोलतील व केव्हा बोलतील याचा नेम नसतो. बोलताना किंवा करताना स्थलकालाचा विचार करत नाहीत. म्हणजे आपण कधी बोलतो, कुठे बोलतो, कशाच्या बाबतीत बोलतो ते अजिबात लक्षात न घेता बोलतात. ऐकणार्या कोणाला त्याची गंमत वाटते, कोणाला राग पण येतो. पण यांना आपल्याला कोण हसताहेत, आपल्यावर कोण खेकसताहेत याची जाणीवच नसते; कदाचित पर्वाही नसते. बोलून मोकळं व्हायचं एवढंच! सवय जडली ती सुटेल कशी? आपण हास्यास्पद बनतो याची त्याना यत्किंचितही कल्पना नसते. अशी माणसं बहुतेकांनी पाहिली असणारच!
मी एक दिवस मासळी मार्केटमध्ये गेलो होतो. संपूर्ण बाजारात एक फेरी मारली की कोणाकोणाकडे कसले कसले मासे आहेत त्याची माहिती मिळते. कसले घ्यायचे ते ठरवता येते. त्याप्रमाणे त्या मासेवाल्याकडे किंवा वालीकडे जायचे, दर विचारायचा, परवडत असतील तर घ्यायचे, महाग वाटत असतील तर थोडी घासाघीस करायची आणि होत नसेल तर दुसर्या विक्रेत्याकडे जायचे, एवढा सोपा व्यवहार. काही विक्रेते किंवा विक्रेत्या अशा असतात की त्यांना घासाघीस केलेली आवडत नाही. चक्क सांगतात, ‘‘तुम्ही घेऊ नका, माझ्याकडे रेग्युलर येणारी गिर्हाईकं आहेत. घासाघीस नको.’’
माझा अनुभव आहे की मासळी मार्केट व कापड दुकानं ही अशी ठिकाणं असतात की तिथे घासाघीस चालतेच! मार्केटमध्ये फेरी मारताना एक जोडपं दिसलं. त्यांच्यात संवादापेक्षा वादच चालला होता; तोसुद्धा मासेवालीच्या पुढ्यात! ती मासेवाली पाचसहा प्रकारचे चांगले मासे घेऊन बसली होती. गिर्हाईकं येत होती, बघत होती, परवडली तर घेत होती. पण या जोडप्याचा वाद कशावरून तर हे घेतले तर मुलगा खाणार नाही, ते घेतले तर मुलगी खाणार नाही, असा! त्यात बायकोनं कहरच केला, मला यातला एकही प्रकारचा मासा आवडत नाही. नवरा म्हणतो, ‘‘तुला आवडत नसतील तर तू खाऊ नकोस, मला पाहिजे ते मी घेणार. तू वरणभात, लोणचे, पापड जेव.’’ त्यावर बायकोचं म्हणणं, ‘‘काय, मी दोन-दोन प्रकार करू? तुमच्यासाठी माशांचं व माझ्यासाठी वरणभात? सकाळपासून संध्याकाळपर्यंत मला फक्त घाण्याला जुंपा.’’ मासेवाली इतकी वैतागली, म्हणाली, ‘‘तुम्हाला काय घ्यायचं, काय जेवायचं ते जरा मार्केटच्या बाहेर जाऊन बोला; नाहीतर ठरवा. माझ्यासमोर नको. तुम्ही माझ्या गिर्हाईकांना अडथळा करता. कृपया दूर व्हा.’’ परिणाम असा झाला की त्या मासेवालीचे खडे बोल ऐकावे लागले. बाजारातल्या पुष्कळजणांची करमणूकही झाली. भर बाजारात त्यांचं वागणं हास्यास्पद ठरलं. त्या मासेवालीच्या बाजूला मासे विकायला बसलेल्या बायका, सर्व अशिक्षित, त्यावर फिदीफिदी करून हसल्या ते वेगळेच!
असाच एक दुसरा प्रसंग, तोही रहदारीच्या भररस्त्यात. वेळ जवळ जवळ दुपारची- बाराची. संभाषण जोडप्यात. सोबत दोन लहान मुले. बायको म्हणाली, ‘‘मुलं फिरून फिरून दमली, त्यांना आईस्क्रीम द्या ना.’’ नवरा म्हणतो, ‘‘अशा दुपारच्या वेळी उन्हात फिरल्यावर थंडगार आईस्क्रीम?’’ बायको म्हणते, ‘‘आईस्क्रीम नाही तर सॉफ्टड्रिंक तरी द्या.’’ त्यावर नवरा, ‘‘सॉफ्ट ड्रिंक पण थंडच; त्यानं सर्दी होत नाही का? तुला अक्कल आहे की नाही?’’ बायको म्हणते, ‘‘माझी अक्कल कशाला वर काढता? आई म्हणून मला मुलांची काळजी वाटते.’’ ‘‘काळजी जर वाटत असेल तर घरातून बाहेर पडताना थर्मासातून पाणी आणायचं होतंस. घरी अर्ध्या-अर्ध्या लिटरचे दोन थर्मास तर आहेत. आता त्यांना सॉफ्टड्रिंक दिलं व सर्दी झाली तर मी आहेच, डॉक्टरची भर करायला!’’ हा संवाद की वाद? तोही सर्वांसमोर आणि भर रस्त्यात… मनात आलं की बोलून टाकावं; ऐकणारे गेले ‘झक’ मारत!
कपडे खरेदीसाठी कापड दुकानात जर असलं एखादं झगडाळ जोडपं गेलं तर तिथेही तसंच! रंगसंगत म्हणजे ‘रंग’ आणि ‘संगत’ जुळेलच असं नाही, बहुतेक वेळा नाहीच! बायको काळी नसेल, जरा सावळी असेल तर नवरा म्हणतो, ‘‘तुला भडक रंगाचे कपडे शोभणार नाहीत, जरा लाईट कलरचे घे.’’ बायको म्हणते, ‘‘लाईट कलरने मी आणखीन लाईट दिसणार, म्हणजे तुमच्यासमोर ‘फिकी’ दिसणार, मला थोडे भडकच घ्यायचे आहेत. तुम्हाला आवडत नसतील तर तुमच्यासोबत कसल्याच कार्यक्रमाला मी येणार नाही, म्हणजे तर झाले?’’
नवरा गप्प बसतो. कारण घराची ‘चावी’(!) बायकोच्या हातात असते. म्हणून आपल्या तोंडाला कुलूप केल्यासारखा गप्प बसतो. कशातही नाक खुपसलेलं बायकोला आवडत नाही व शेवटी कुठे ना कुठे फाडतं. त्यापेक्षा हुकूमाचा धनी होणं बरं! शेवटी होतं काय तर बायको आपल्या पसंतीचेच कपडे घेणार. आपली जबाबदारी दुकानदाराचं बील द्यायची. जेव्हा नवरा-बायकोचं रंगसंगतीवरून पटत नाही व बायको विशिष्ट प्रकारच्या रंगाची पसंती सांगते तेव्हा दुकानदारही तिचीच बाजू घेतो व तिच्याच सुरात आपला सूर लावतो. कारण ती नवर्याचं ऐकत नाही तर दुकानदाराचं कसं ऐकेल? दुकानदारानं वेगळा सूर लावला तर गिर्हाईक तुटतं. दुकानदार ती म्हणते तसले कपडे दाखवलो व गिर्हाईक जोडतो. बायको तिच्याच पसंतीचे कपडे निवडते व घेते; नवर्याला मारू दे झक्! खरेदीचं बील केलं जातं ते नवर्याच्या हाती सोपवते. नवरा मुकाट्यानं बील भरतो. खरेदी केलेला माल हमालासारखा खांद्यावर मारतो व मंडळी घरी येते.
एकंदरीत काय? असली ही लढाई कोणासाठी करमणूक ठरते, कोणाच्या मते हास्यास्पद असते; करणार्याना त्याची जाणीव वा पर्वा नसते.
पाहाणारे, ऐकणारे गेले मारत झक्!