>> इफ्फीतील सिनेमांच्या प्रयोगावेळी गैरसोय टाळण्यासाठी आयोजकांचा निर्णय
इफ्फीच्या प्रतिनिधींची आणि चित्रपट रसिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी काल सोमवारपासून इफ्फीत झालेल्या चित्रपटांच्या प्रयोगावेळी थिएटरमध्ये प्रेक्षकांना पूर्ण क्षमतेने प्रवेश देण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सुरुवातीच्या दोन दिवसांत इफ्फीतील चित्रपटांसाठी थिएटर्समध्ये केवळ ५० टक्के क्षमतेने प्रेक्षकांना प्रवेश देण्यात आला होता. संपूर्ण इफ्फीदरम्यान प्रेक्षकांना ५० टक्के क्षमतेनेच थिएटर्समध्ये प्रवेश देण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला होता. मात्र काल तिसर्या दिवसापासून आयोजकांनी त्यात बदल करताना प्रेक्षकांना थिएटर्समध्ये पूर्ण क्षमतेने प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.
५० टक्के क्षमतेने थिएटर्समध्ये प्रवेश देण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे पहिल्या दिवशी ओपनिंग फिल्मच्या वेळी प्रेक्षकांची गैरसोय झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या.
दरम्यान, सोमवारपासून आयनॉक्समधील सर्व थिएटर्स तसेच मॅकेनिज पॅलेसमधील एक थिएटर अशा सर्वच ठिकाणी प्रेक्षकांना पूर्ण क्षमतेने प्रवेश देण्यास सुरुवात करण्यात आली. त्यामुळे इफ्फीच्या प्रतिनिधींची चांगली सोय झाली.