>> आशियाई सांघिक बॅडमिंटन अजिंक्यपद
भारतीय पुरुष संघाने ०-२ अशा पिछाडीवरून दमदार पुनरागमन करताना थायलंडचा ३-२ असा पराभव करीत आशियाई सांघिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली. मनिला-फिलिपिन्स येथे सुरू असलेल्या स्पर्धेतील या विजयामुळे भारतीय संघाने पदकही निश्चित झाले आहे. भारतीय संघाची उपांत्य फेरीत आता दोन वेळच्या विजेत्या इंडोनेशियन संघाशी गाठ पडणार आहे.
भारताचे स्टार शटलर्स किदाम्बी श्रीकांत आणि साई प्रणीत यांना पहिले दोन्ही एकेरीचे सामने गमवावे लागल्याने भारतीय संघ ०-२ अशा पिछाडीवर पडला होता. साई प्रणीतला जागतिक १२व्या स्थानावरील कांताफोन वांगचरोईन याच्याकडून १४-२१, २१-१४, १२-२१ असा पराभव स्वीकारावा लागला होता. तर दुसर्या एकेरीत माजी जागतिक अग्रमानांकित शटलर किदाम्बी श्रीकांतला तीन वेळचा वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप जेत्या कुन्लावुत विटिडसर्नने २०-२२, १४-२१ असे नमविल्याने भारतीय संघ ०-२ अशा पिछाडीवर पडला होता.
परंतु पहिल्या दुहेरीच्या लढतीत एमआय अर्जुन आणि ध्रुव कपिला यांनी किट्टिनूपोंग केड्रेन आणि तनुपत विर्यांगकुरा यांना २१-१८, २२-२० पराभूत करीत भारताचे आव्हान जिवंत राखले.
परतीच्या एकेरीत युवा लक्ष्य सेनने विश्व क्र. ४५व्या सपान्यू अविव्हिंगनसनवर २१-१९, २१-१८ अशी मात करीत भारताला २-२ अशी बरोबरी साधून दिली. तर दुसर्या दुहेरीत चिराग शेट्टी आणि किदाम्बी श्रीकांत यांनी जागतिक १२व्या स्थानावरील मनिपोंग जोंगजित आणि निपीटफॉन फुआंगफुआपेट यांना २१-१५, १६-२१, २१-१५ असे नमवित भारताच्या ३-२ अशा विजयासह उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला.
भारतीय संघाने हैदराबादेत २०१६ साली झालेल्या या स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली होती.