थायलंडमध्ये अडकलेल्या आठ गोमंतकीयांच्या सुटकेसाठी प्रयत्न

0
3

>> ॲड. नरेंद्र सावईकर यांची माहिती

विदेशात नोकरीसाठी गेलेले आठ गोमंतकीय थायलंडमध्ये अडकून पडल्याचे समोर आले आहे. त्यांना परत आणण्यासाठी गोवा एनआरआय आयुक्तालयाने प्रयत्न सुरू केले आहेत, अशी माहिती एनआरआय आयुक्त ॲड. नरेंद्र सावईकर यांनी दिली.
अमेरिकेत नोकरीसाठी गेलेल्या दोघांची फसवणूक झाल्याचे उघड झाले असून त्यांना अमेरिकेने परत पाठविले आहे. विदेशात नोकरीसाठी गेलेले आठजण थायलंडमध्ये अडकून पडल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक युवकांची विदेशात नोकरी देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली जात असल्याचे समोर आले आहे.

गोवा एनआरआय आयोग सध्या फसव्या नोकरीच्या ऑफरला बळी पडलेल्या गोमंतकीयांना भारतीय दूतावासाच्या माध्यमातून परत आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याची सावईकर यांनी दिली. परदेशात अडकलेल्या व्यक्तींना परत आणण्यासाठी भरपूर प्रयत्न करावे लागतात. एखादी व्यक्ती विदेशात अडकून पडल्याचे कळल्यावर संबंधित दूतावासाशी संपर्क साधावा लागतो असेही सावईकर म्हणाले.
विदेशात नोकरी देण्याचे आमिष दाखवून लुबाडणूक केली जात आहे. नोकरीच्या शोधात परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या तरुण आणि त्यांच्या पालकांनी परदेशात जाण्यापूर्वी योग्य पडताळणी करावी असेही सावईकर यांनी सांगितले.