थप्पड कोणावर?

0
18

सदैव वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला चंडिगड विमानतळावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या एका महिला जवानाने कानशिलात लगावली त्यावरून मतमतांतरांचा कल्लोळ चालला आहे. खुद्द बॉलिवूडही ह्या विषयावरून दुभंगलेले दिसते. ज्या महिला जवानाने कंगनावर थप्पड लगावली तिने त्याचे स्पष्टीकरण देताना चार वर्षांपूर्वी दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन चालले होते तेव्हा कंगनाने तेथे आलेले शेतकरी हे भाडोत्री असल्याची शेरेबाजी समाजमाध्यमांवरून केली होती व तेथे त्यावेळी आपली आई हजर होती, त्यामुळेच आपण कंगनाला धडा शिकवल्याचे सांगितले. येथे ह्या विषयाच्या दोन बाजू आहेत आणि दोन्ही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे काहीही जरी असले तरी शारीरिक हिंसा ही पूर्णतः निषेधार्ह ठरते आणि ज्यांच्यावर विमानतळावर सुरक्षा पुरविण्याची जबाबदारी असते, त्या सीआयएसएफच्याच एका जवानाने हे कृत्य करणे ही अतिशय गंभीर व घातक बाब ठरते. कंगनाने लावलेले ‘भाडोत्री’ हे विशेषण आपल्या आईला लागू पडल्याने सीआयएसएफ जवानाने चार वर्षांनंतर कंगनाच्या कानशिलात लगावून आपला राग शमवला हे जरी खरे असले, तरी आपल्या देशाने यापूर्वी सुरक्षारक्षकांच्या गोळीबारात एक पंतप्रधान गमावल्या आहेत, त्यामुळे झालेला प्रकार हा निश्चितच अतिशय चिंताजनक आहे आणि कोणत्याही परिस्थितीत ह्याची पुनरावृत्ती होता कामा नये. ही घटना घडताच तिला सीआयएसएफमधून तातडीने निलंबित करण्यात आले आणि अटकही झाली. परंतु बॉलिवूडमधील गायक आणि गीतकार विशाल दादलानीने त्या महिला जवानास नोकरी देण्याची व मदत करण्याची तयारी जाहीरपणे दाखवून जणू त्या कृत्याचे समर्थनच केलेले पाहायला मिळाले. आता राहिली ह्या प्रकरणाची दुसरी बाजू. मुळात कंगना रनौत ही एक वाचाळ अभिनेत्री आहे. आपल्या अभिनयक्षेत्रापलीकडील राजकीय विषयांवर ती सतत बेछूट भाष्य करीत असते आणि केंद्रात नरेंद्र मोदी सरकार आल्यापासून बॉलिवूडमधील काही मंडळींनी जी राजकीय लाचारी दाखवली आहे, त्यामध्ये अनुपम खेर, अक्षयकुमार यांच्या रांगेत तीही एक आहे. कलाक्षेत्रातील व्यक्तींची स्वतःची अशी राजकीय मते वा भूमिका असू शकते आणि ती असलीही पाहिजे. परंतु तिचे सवंग प्रदर्शन करून राजकीय हुजरेगिरी केली जाते आणि तिच्या जोरावर जेव्हा पदरात राष्ट्रीय पुरस्कार आणि पद्म किताबांसारखे फायदे पाडून घेतले जातात तेव्हा त्या भूमिकेस स्वार्थाची दुर्गंधी आल्याशिवाय राहत नाही. कंगना ही एक उत्तम अभिनेत्री आहे आणि स्वतःच्या हिंमतीवर ती बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करून राहिली आहे हे निःसंशय. तिने ज्याप्रकारे बॉलिवूडमधील वशिलेबाजीला उघडे पाडले तेही धाडसाचे आणि कौतुकास्पद होते, परंतु तरीही समाजमाध्यमांवरून सतत वादग्रस्त विधाने करून जाणूनबुजून अंगावर वाद ओढवून घ्यायची तिची जी सवय आहे ती तिला सतत चर्चेत ठेवणारी आणि उदंड प्रसिद्धी मिळवून देणारी जरी असली, तरी ती विवेकी भूमिका म्हणता येत नाही. आता ह्या बाई राजकारणात उतरल्या आहेत. भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर त्यांनी मंडीतून लोकसभेची निवडणूक लढवली आणि हिमाचल प्रदेशच्या चारही जागा भाजपकडे गेल्या, तशी कंगनाही खासदारपदी निवडून आलेली आहे. त्यामुळे राजकारणात आलेल्या व्यक्तीपाशी काही पाचपोच असावा लागतो, तो सांभाळण्याची जबाबदारी कंगनावर येते. चार वर्षांपूर्वी शेतकरी आंदोलनासंदर्भात तिने केलेले भाष्य हे सरळसरळ सरकार समर्थनार्थ केलेले होते हे उघड आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनात काही गैरप्रकार जरूर घडले, परंतु त्यानिमित्ताने ते आंदोलनच खलिस्तानवादी ठरवणे किंवा त्या आंदोलकांना भाडोत्री संबोधणे गैर होते. शेतकऱ्यांच्या रोषापुढे सरकारला तिन्ही प्रस्तावित कृषीकायदे मागे घ्यावे लागले, ह्यावरून त्या आंदोलनाची धग आणि त्याला असलेला उत्तर भारतातील सर्वदूरच्या शेतकऱ्यांचा पाठिंबा लक्षात यावा. ह्या निवडणुकीत भाजपचे हिंदीपट्ट्यात विशेषतः उत्तर प्रदेश आणि राजस्थान, हरियाणात जे पानीपत झाले, त्यामागे शेतकऱ्यांचा हा रोषही प्रमुख कारण आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाची काहीही माहिती नसताना बेछूटपणे त्या आंदोलकांस भाडोत्री ठरवण्याचा जो उथळपणा कंगनाने दाखवला तोच तिला ह्या प्रकरणात भोवला. त्यामुळे समाजमाध्यम हे अत्यंत प्रभावी माध्यम जरी असले तरी शेवटी ते दुधारी हत्यार आहे ह्याची जाणीव ठेवून जबाबदारीने ते हाताळले जाण्याची गरजच ह्या साऱ्या प्रकरणातून अधोरेखित झाली आहे हाच ह्या प्रकरणाचा खरा मथितार्थ आहे. खरी थप्पड ही समाजमाध्यमांवरील ह्या बेतालपणाला आहे.