थकित महसूल वसुलीसाठी आयडीसीकडून विशेष योजना

0
6

कोविडमुळे उद्योजकांना भाडेपट्टीच्या थकबाकीवर 5 टक्के सूट

गोवा औद्योगिक विकास महामंडळाने (जीआयडीसी) कोविड-19 महामारीमुळे प्रभावित झालेल्या उद्योजकांना दिलासा देण्यासाठी ‘कोविड-19 दिलासा योजना’ जाहीर केली असून, या योजनेच्या माध्यमातून उद्योजकांना वार्षिक भाडेपट्टी आणि लीज भाडेपट्टीच्या थकबाकीवर 5 टक्के सूट दिली जाणार आहे. ही योजना येत्या 24 जूनपासून सुरू केली जाणार असून, ती केवळ 30 दिवसांसाठी खुली ठेवली जाणार आहे, अशी माहिती औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी काल पाटो-पणजी येथील मुख्यालयात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली.

राज्यातील सुमारे 605 उद्योग बंद पडलेले आहेत. आयडीसीचा सुमारे 47 कोटी रुपयांचा महसूल थकलेला आहे. या योजनेच्या माध्यमातून सुमारे 36 ते 37 कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्याचा प्रयत्न आहे. या योजनेच्या माध्यमातून उद्योजकांना दिलासा देऊन उद्योग व्यवसाय पुन्हा कार्यान्वित करण्याचा उद्देश आहे, असे लॉरेन्स यांनी सांगितले.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी उद्योग कंपन्यांनी आयडीसीच्या मुख्यालय किंवा संबंधित फिल्ड व्यवस्थापक कार्यालयाकडे लेखी प्रस्ताव एका महिन्याच्या काळात सादर करावा लागणार आहे. उद्योग कंपन्या थकबाकी एकरकमी भरू शकतात किंवा थकबाकी भरण्यासाठी महिन्याचा पर्याय निवडू शकतात. थकबाकीची रक्कम भरण्यासाठी जास्तीत जास्त 8 हप्ते दिले जाणार आहेत. तथापि, योजनेचा लाभ घेणाऱ्यांना आर्थिक वर्ष संपण्याच्या पूर्वी ही थकबाकीची रक्कम भरावी लागणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

योजनेला आणखी मुदतवाढ नाही
या योजनेला आणखीन मुदतवाढ दिली जाणार नाही. जे उद्योग व्यावसायिक या योजनेचा लाभ घेणार नाहीत. त्यांच्याकडील थकबाकीची रक्कम वसूल करण्यासाठी कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. ही योजना तयार करताना उद्योग संघटनांना विश्वासात घेण्यात आले आहे, असे आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी सांगितले.