नुकतेच कॉंग्रेसमधून भाजपात आलेले सात फुटीर ‘वेडात मराठे वीर दौडले सात’च्या आवेशात मुख्यमंत्री व भाजप प्रदेशाध्यक्षांसमवेत मोठ्या अपेक्षा घेऊन दिल्लीला जाऊन आले. भाजपचे नेतृत्व, गृहमंत्री, पंतप्रधान आपल्यासाठी अगदी लाल पायघड्या अंथरून उभे असतील असा कदाचित यापैकी काही मंडळींचा भ्रम असेल, परंतु दिल्लीला ज्या थंडपणे या लोकांचे स्वागत झाले आणि कोणत्याही ठोस अथवा मोघम आश्वासनाविना जी बोळवण केली गेली, ती पाहिली तर या फुटिरांना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने फारसे महत्त्व दिलेले दिसत नाही. सरकार भक्कम असल्याने पक्षाला या घडीला अशा लोकांना आंजार-गोंजारण्याची काही आवश्यकताही वाटत नाही.
या फुटिरांचे नेते मायकल लोबो सध्या केनियात असल्याने ते या दिल्ली दौर्यात हजर नव्हते, पण ते आणि दिगंबर कामत सोडल्यास बाकी मंडळींना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या लेखी काडीचीही किंमत नाही असे दिसते. इतर आमदार हे लोकप्रतिनिधी कायद्यातून पळवाट मिळावी व स्वार्थ साधता यावा म्हणून लोबो – कामत यांना पक्षांतरावेळी सोबत हवे होते आणि आता नगाला नग म्हणून भाजपला आपल्या पक्षात हवे आहेत हेही आतापर्यंत स्पष्ट झाले आहे. भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी तर ‘ह्या लोकांना पक्षात प्रवेश देऊया का’ असे केंद्रीय नेतृत्वाने आपल्याला विचारले असते तर आपण सरळ ‘नाही’ म्हणालो असतो अशी स्पष्टोक्तीच करून टाकलेली आहे. पंतप्रधानांची या फुटिरांना भेटही मिळू शकली नाही. त्यामुळे शेवटी मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने कशीबशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन पूर्ण रिकाम्या हातांनी परतण्याची पाळी या फुटिरांवर आलेली दिसते.
जेलरपुढे कैद्यांची ओळखपरेड करावी तशी ह्या मंडळींची दिल्लीला ओळखपरेड केली गेली. नड्डा आणि शहा यांनी या फुटिरांना वरवरची हालहवाल विचारली आणि आता भाजपमध्ये आला आहात, तर पक्षासाठी काम करा, लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकून देण्यासाठी प्रयत्न करा वगैरे उपदेशामृृत पाजून रिकाम्या हाताने परत पाठवले. मंत्रिपदांबाबतच काय, कोणतेही ठोस आश्वासन या फुटिरांना मिळालेले दिसत नाही. मुख्यमंत्र्यांनीही गोव्यात परतल्यावर सध्या मंत्रिमंडळात फेरबदलाचा कोणताही विचार नाही असे प्रसारमाध्यमांसमोर सांगितले आहे. अर्थात, कॉंग्रेसमधून असे घाऊकपणे आलेल्या या पाहुण्यांची कोणत्याही बक्षिसीविना बोळवण करणे पक्षाला शक्य होणार नाही हेही तेवढेच खरे आहे. त्यामुळे किमान त्यांच्या दोन ज्येष्ठ म्होरक्यांसाठी तरी काही तरतूद पक्षाला आज ना उद्या करावीच लागणार आहे. पण हे करीत असताना आपले निष्ठावंत कार्यकर्ते दुखावू नयेत आणि त्यांच्यातून उठाव होऊ नये ही खबरदारीही घ्यावी लागणार असल्यानेच भाजपने हा अत्यंत थंडा पाहुणचार चालवलेला दिसतो. उगाच कोणी उतू मातू नये यासाठीची ही खबरदारी तर आहेच, पण त्याहून आपल्या दुखावलेल्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा हा आटापिटा आहे. कारण कार्यकर्त्यांकडून पहिला तडाखा मडगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत बसलाच आहे.
फुटिरांपैकी दिगंबर कामत आणि मायकल लोबो यांचा फायदा पक्षाला करून घ्यावासा फार तर वाटेल. पर्रीकरनिष्ठांना सरकारमधून पद्धतशीरपणे दूर सारले गेल्याने आणि उत्पल पर्रीकरांचे तिकीट कापल्याने दुखावलेल्या सारस्वत समाजाला पुन्हा पक्षासोबत घेण्यासाठी आणि दक्षिणेची लोकसभेची जागा जिंकण्याच्या दृष्टीने दिगंबर कामत यांना महत्त्व द्यावे लागेल आणि मायकल लोबोंचे अपराध कितीही भरले असले तरी उत्तर गोव्यातील काही मतदारसंघांतील त्यांची वट लक्षात घेता त्यांनाही गोंजारावे लागेल. त्यामुळे या पक्षांतराचा खरा फायदा ह्या दोघांनाच मिळणार आहे. गाड्याबरोबर नळ्याची यात्रा तसे बाकीचे आलेले असले तरी सालसेतवर नजर ठेवून मायकलसोबत आलेक्स सिकेरांना फार फार तर मंत्रिपद दिले जाऊ शकते, पण इतरांची डाळ इतक्यात शिजणे कठीण आहे. दिगंबर कामत आपल्या मानमरातबाला साजेसे पद मिळत असेल तरच स्वीकारतील असे दिसते. स्वतःपेक्षा आपल्या मुलाच्या राजकीय प्रतिष्ठापनेस ते अधिक प्राधान्य देतील. लोबोंचे उपद्रवमूल्य भाजपने गेल्या कार्यकाळात पुरेपूर अनुभवलेले आहे, त्यामुळे त्यांच्या नाड्या पक्षाने आपल्या हातात ठेवल्या आहेत. एकूण भाजपने या फुटिरांना डोक्यावर न चढवता आपल्या मर्यादेत ठेवण्याच्या दृष्टीने पद्धतशीर पावले टाकलेली दिसतात. त्यामुळेच हा थंडा प्रतिसाद त्यांना मिळाला आहे. ‘टू इज कंपनी, थ्री इज क्राऊड’ म्हणतात. येथे तर थ्रीऐवजी ‘थर्टी थ्री’चा बाजार आहे. त्यासाठीच ही खबरदारी आहे.