- डॉ. मनाली म. पवार
ह्या संपूर्ण थंडीमध्ये त्वचेची, एकंदरीत शरीराची काळजी घेण्यासाठी चांगल्या आयुर्वेदिक तेलाने किंवा तीळ तेलाने रोज मालीश करावे. खोबरेल तेलाचा अंश असलेला उत्तम दर्जाचा साबण वापरावा किंवा साबणाऐवजी चांगले उटणे वापरावे. मांसाहार न करणार्यांनी धारोष्ण दूध, दही, लोणी, मलई इ.चा यथेच्छ वापर करावा.
त्वचा कोरडी झाली, त्वचा खरखरीत झाली, ओठ व गाल फाटले, पायाला भेगा पडल्या… असे त्रास तर होणारच आणि त्यातही उष्ण प्रकृतीच्या लोकांना जरा जास्तच, थंडी गुलाबी जरी असली तरी काटे बोचतातच. दिवाळीत सुरू केलेले अभ्यंग स्नान तसेच चालू ठेवले असते तर हे त्रास आज सुरू झाले नसते. एखादे क्रीम आणून लावले… हा तात्पुरता उपाय झाला व महागडाही!
थंडीमुळे शरीरात वाढणारा कोरडेपणा कमी करण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे अभ्यंग.
- रोज रात्री झोपण्यापूर्वी पाच मिनिटे वेळ काढून संपूर्ण अंगाला तेल लावावे जेणेकरून त्वचेला स्निग्धताही मिळेल, शिवाय हे त्वचेमार्फत आत शिरून रस, रक्त, मांस या धातूंना पोषणही मिळेल. त्वचेला आतून-बाहेरून पोषण मिळण्याकरिता नियमित अभ्यंगाइतका दुसरा प्रभावी उपाय नाही.
- नियमित अभ्यंगाबरोबर उटण्याचा वापर करावा. उटण्याचे अनंतमूळ, ज्येष्ठमध, वाळा, हळद, वारूहळद अशा अनेक उत्तमोत्तम वनस्पतींचे मिश्रण असते. या वनस्पती त्वचेला स्वच्छ करतात व त्वचेवरील दोष दूर करण्यासही समर्थ असतात. तसेच उटण्यामुळे त्वचेला उचित स्निग्धता मिळते. वातावरणातील कोरडेपणामुळे त्वचा कोरडी होण्यास प्रतिबंध होतो.
- मुखलेप लावताना त्यात पाण्याऐवजी दूध – दुधाची साय टाकावी. तळपाय- विशेषतः टाचांना भेगा पडणे, शरीरात अतिरुक्षता वाढल्यासभेगांमधून रक्त येणे ही तक्रारसुद्धा सुरू होते. यावर नियमित पादाभ्यंग उत्तम असते. त्यातही पादाभ्यंगासाठी शतधौतघृत अनुकूल आहे. कोकमाच्या तेलाचाही विशेष फायदा होतो.
- फरशीच्या थंडपणापासून संरक्षण करण्याच्या हेतूने पायात मोजे घालणे किंवा घरातही पादत्राणे घालणे हेसुद्धा उपयोगी ठरते.
- तळपायाच्या तुलनेत तळहाताला भेगा पडण्याचे प्रमाण कमी असते. मात्र हे सर्व उपाय तळहातालाही भेगा पडण्याचे प्रमाण कमी असते, मात्र हे सर्व उपाय तळहातालाही करता येतात.
- हिवाळ्याचा परिणाम ओठांवरही होतो. ओठ फुटणे, दोन ओठ कडेला मिळतात त्या ठिकाणी बारीकशी चीर जाणे, असे त्रास हिवाळ्यात होताना दिसतात. ओठ फुटू नये यासाठी ओठांवर दुधावरची साय लावणे उत्तम असते.
- ओठाच्या कडेला चीर पडणे हा प्रकार खूप वेदनामय असू शकतो. बोलताना, खाता-पिताना ओठांची हालचाल झाली की त्या ठिकाणी वेदना होतात. यावर घरचे ताजे लोणी किंवा घरचे साजूक तूप लावून ठेवण्याने फायदा होतो.
- रात्री झोपण्यापूर्वी नाभीवर दोन-तीन थेंब तूप लावण्यानेही ओठांना चीर जाण्याची प्रवृत्ती कमी होते.
- एकंदर त्वचा कोरडी झाली तर त्याचा परिणाम गुदाच्या आसपासच्या त्वचेवरही होतो. गुदाला भेगा पडून शौचाच्या वेळेला आग होणे, वेदना होणे या प्रकारचा त्रास होऊ शकतो. यावर गुदभागी व्रणरोपण तेल उपयोगी पडते.
- मुळव्याध, फीशरचा त्रास असणार्यांनी हिवाळ्याची सुरुवात झाल्यावर लगेच रोज रात्री झोपण्यापूर्वी गुदभागी दोन थेंब अरंडेल तेल लावण्यानेही या प्रकारच्या त्रासापासून सुटका मिळते.
त्वचेला आलेला कोरडेपणा पटकन् दूर करण्यासाठी बर्याचदा केवळ बाह्योपचार केले जातात. यात सहसा क्रीम, मलम वगैरेचा समावेश असतो. काही मर्यादेपर्यंत याने बरे वाटते. तरीही ही क्रीम चांगल्या प्रतीची असावी.
नैसर्गिक घटकांची बनवलेली असावी. बर्याचवेळा रासायनिक घटकांपासून बनवलेल्या क्रीमचा नंतर त्वचेवर दुष्परिणाम होताना दिसतात.
बाह्योपचाराबरोबर आहारातील महत्त्वाच्या गोष्टी….
- लोणी – वर्णबलाग्निकृत सांगितलेले आहे. म्हणजेच ताजे घरचे लोणी वर्ण सुधारावयास उत्तम होय.
- तूप – कान्तिसौकुमार्यस्वरार्दिनाम् म्हटले आहे. घरचे आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेले साजूक तूप उत्तम कांतीचा लाभ करून देते.
- दूध – जीवनीय रसायनम् असल्याने रस, रक्त, मांस अशा त्वचेसाठी आवश्यक असणार्या सर्वच शरीरघटकांचे पोषण देणारे आहे व म्हणूनच पर्यायाने त्वचेच्या आरोग्यासाठी उत्तम आहे.
- केशर – कायाकान्तिकृत असे आहे. म्हणजेच त्वचेची कांती वाढवून शरीर तेजःपुंज करणारे आहे.
- मध – वर्ण्य म्हणजे प्रसादन करणारा सांगितलेला आहे.
- हळद – वर्णकरी विशोधनी म्हणजेच वर्ण सुधारणारी व त्वचा शुद्ध करणारी म्हटलेली आहे.
आयुर्वेद शास्त्रामध्ये त्वचा निरोगी रहावीयासाठी वर्ण्य द्रव्ये सांगितली आहेत.
‘वणाय हितं वर्ण्यम्|’- जी द्रव्ये शरीरवर्ण उत्तम ठेवतात ती वर्ण्य द्रव्ये होत. - चंदन, केशर, क्षीरकाकोली, श्वेतदूर्वा, ज्येष्ठमध, पद्मकाष्ठ, वाळा, मंजिष्ठा, अनंत ही औषधे वर्ण्य आहेत. म्हणूनच या द्रव्यांचा वापर उटण्यामध्ये केला जातो. ही द्रव्ये शरीराला हवी तेवढी स्निग्धता देऊन त्वचा कोरडी होण्यापासून म्हणा किंवा त्वचेच्या इतर विकारापासून त्वचेचे संरक्षण करतात.
घरगुती उपचार परंतु वैद्याच्या सल्ल्याने – - दोन चमचे बेसन, पाव चमचा हळद, दोन चिमूट कापराचे चूर्ण एकत्र करून आंघोळीच्या वेळी साबणाच्या ऐवजी वापरल्यासत्वचा सतेज, मऊ व निरोगी राहते.
- त्वचा जास्त कोरडी झालेली असल्यास दुधाची साय किंवा लोणी किंचित हळदीसह हलक्या हाताने चोळावे.
- पाव चमचा लिंबाचा रस व थोड्या पाण्यामध्ये १ चमचा जिर्याची पूड व चमचाभर बेसन रात्रभर भिजत घालून आंघोळीपूर्वी अंगाला लावावे व कोमट पाण्याने आंघोळ करावी. याने त्वचा सतेज व घट्ट होते.
- चंदन व बदाम पाण्यात किंवा दुधात सहाणेवर उगाळून तयार केलेल्या गंधात दोन चिमूट हळद घालून तयार केलेले मिश्रण चेहर्यावर २० ते २५ मिनिटे लावावे व नंतर कोमट पाण्याने धुवावे. याने त्वचा सतेज व मुलायम होते. थंडीतील कोरडेपणा जाऊन स्निग्धपणा येतो. चेहर्यावरील मुरुम, काळे डाग, फोडं कमी होतात.
- कोरफडीचा गर किंवा वनस्पतींनी सिद्ध केलेले नारळाचे तेल त्वचेला लावल्यास त्वचा मुलायम, सतेज व निरोगी होते.
- शहाळ्याची मलई चेहर्यावर चोळून लावल्यास अकाली पडलेल्या सुरकुत्या कमी होतात.
ह्या संपूर्ण थंडीमध्ये त्वचेची एकंदरीत शरीराची काळजी घेण्यासाठी चांगल्या आयुर्वेदिक तेलाने किंवा तीळ तेलाने रोज मालीश करावे. - खोबरेल तेलाचा अंश असलेला उत्तम दर्जाचा साबण वापरावा किंवा साबणाऐवजी चांगले उटणे वापरावे.
- पारंपरिक आयु. पंचकर्मापैकी विरेचन व अनुवासन वस्तीचाही खूप उपयोग होतो.
- मृदू विरेचन चालू ठेवावे.
- शतावरी कल्प, महामंजिष्ठादी काढा, गुडूची घन वटी, च्यवनप्राश, सारीवाद्यासव, मोरावळा इ. सेवन करावे.
- आहारामध्ये मधुर अम्ल लवण पदार्थ अधिक हवेत.
- तेल, तूप आदी स्नेहद्रव्यांचे प्रमाणही आहारात भरपूर हवेत.
- गहू, उडीद, साखर, दूध, तेल, तूप यांचा आहारात समावेश हवा.
- तूर, मूग, मटकी, वाटाणा,. हरभरा, चवळी इ. कडधान्ये वापरावीत.
- भुईकोहळा, बटाटा, रताळी, कांदा सारखी कंदमुळे व नवलकोल, दोडका, पडवळ, वांगी, मुळा इ. भाज्या विशेष पथ्यकर आहेत.
- अनेक प्रकारची पक्वान्ने खावीत.
- तळलेले चमचमीत पदार्थ खाण्यास हरकत नाही.
- सर्व प्रकारचा मांसाहार घेण्यास काहीच हरकत नाही.
- मांसाहार न करणार्यांनी धारोष्ण दूध, दही, लोणी, मलई इ.चा यथेच्छ वापर
करावा. - बासुंदी, खवा, पेढे, गुलाबजाम, बर्फी हे दुधापासून बनवलेले पदार्थही भरपूर खावेत.
- द्राक्षे, मनुका, सफरचंद, केळी, चिक्कू, कवठ, नारळ, पेरू, डाळिंब, जर्दाळू, खारीक, पिस्ता, काजू, बदाम या प्रकारची फळे व सुका मेवा खावा.
बाह्योपचाराबरोबर अशा प्रकारचा आहार सेवन केल्यास रसादि धातू चांगले तयार होतात व त्वचेवरील कोरडेपणा आदी त्वचा विकार होणारसुद्धा नाही.