त्रिनबागो, ट्रायडंटस्‌ची विजयी सलामी

0
147

>> सुनील नारायण, जेसन होल्डर, मिचेल सेंटनरची अष्टपैलू चमक

मिचेल सेंटनर व जेसन होल्डर यांच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर कॅरेबियन प्रीमियर लीग टी-ट्वेंटी स्पर्धेच्या विद्यमान विजेत्या बार्बेडोस ट्रायडंटस् यांनी थरारक लढतीत सेंट किटस् अँड नेव्हिस पॅट्रियोटस्‌चा ६ धावांनी पराभव करत ‘सीपीएल २०२०’ स्पर्धेत विजयी सलामी दिली. त्रिनिदादमधील ब्रायन लारा स्टेडियममध्ये हा सामना खेळविण्यात आला. पावसाने बाधित दुसर्‍या सामन्यात त्रिनबागो नाईट रायडर्सने गयाना ऍमेझॉन वॉरियर्सवर ४ गडी व केवळ २ चेंडू राखून मात केली.

स्पर्धेची सुरुवात टीकेआर व वॉरियर्स यांच्यातील सामन्याने झाली. पावसामुळे हा सामना प्रत्येकी १७ षटकांचा खेळविण्यात आला. टीकेआरने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सुनील नारायण व अली खान यांनी ब्रेंडन किंग व चंद्रपॉल हेमराज या सलामीवीरांना स्वस्तात बाद करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. शिमरॉन हेटमायर व रॉस टेलर यांनी यानंतर अर्धशतकी भागीदारी विणली. या भागीदारीत टेलरने अधिक आक्रमकता दाखवताना जेडन सिल्सला सलग षटकार व चौकार खेचला. ही भागीदारी खुलत असताना नारायण पुन्हा एकदा संघाच्या मदतीला धावला. त्याने टेलरला वैयक्तिक ३३ धावांवर बाद केले. टेलरने केवळ २१ चेंडू खेळत प्रत्येकी २ चौकार व षटकार लगावले. ही जोडी फुटल्यानंतर हेटमायरला निकोलस पूरन याची चांगली साथ लाभली. हेटमायरने नाबाद राहत ४४ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह ६३ धावा केल्या. पूरनने १८ व किमो पॉलने नाबाद १५ धावांचे योगदान दिले. वॉरियर्सने निर्धारित १७ षटकांत ८.४७च्या सरासरीने ५ बाद १४४ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. टीकेआरकडून नारायणने सर्वाधिक २ तर अली खान, सिल्स व ब्राव्हो यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना टीकेआरने सातत्यपूर्ण सुरवात केली. परंतु, पॉवरप्ले संपण्यापूर्वी त्यांना लेंडल सिमन्स याला गमवावे लागले. १७ धावांसाठी २१ चेंडू खेळलेल्या सिमन्सला नवीन याने बाद केले. ७ चेंडूंत झटपट १७ धावा करून मन्रो बाद झाला. नारायणने २८ चेंडूंत २ चौकार व ४ गगनचुंबी षटकारांसह ५० धावा चोपत संघाला फ्रंटफूटवरच ठेवले. संघाचे शतक फलकावर लागल्यानंतर नारायण बाद झाला. यानंतर डॅरेन ब्राव्हो (३०) याने उपयुक्त योगदान दिले.

दिवसातील दुसर्‍या सामन्यात पॅट्रियोटस्‌ने यांनी ट्रायडंटस्ला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. ट्रायडंटस्‌ची सुरुवात खराब झाली. जॉन्सन चार्ल्स (०), शेय होप (३) व कोरी अँडरसन (०) हे आघाडीचे तीन फलंदाज तंबूत परतले त्यावेळी फलकावर केवळ ८ धावा लागल्या होत्या. कायल मेयर्स (३७, २० चेंडू, २ चौकार, ३ षटकार) व जेसन होल्डर (३८, २२ चेंडू, २ चौकार, ३ षटकार) यांनी चौथ्या गड्यासाठी ६१ धावांची भागीदारी केली. या भागीदारीनंतर ट्रायडंटस्‌चा डाव पुन्हा गडगडला. जोनाथन कार्टर (०) व रेयमन रिफर (१) यांनी निराशा केल्याने त्यांची ६ बाद ७९ अशी घसरगुंडी उडाली. मिचेल सेंटनर (१८ चेंडूंत २०) व राशिद खान (२० चेंडूंत नाबाद २६) यांनी संघाला ९ बाद १५३ अशी सन्मानजनक स्थिती गाठून दिली. पॅट्रियोटस्‌नने आपल्या डावाची सुरुवात आक्रमकरित्या केली. परंतु, सेंटनरने निर्धाव षटक टाकतानाच धोकादायक लिनला बाद करत त्यांच्या धावगतीला लगाम घातला. एविन लुईस यालादेखील मुक्तपणे फलंदाजी करता आली नाही.

बेन डंक व जोशुआ दा सिल्वा यांनी ६० धावांची भागीदारी करत डाव सावरला परंतु, सेंटनरने डंकला वैयक्तिक ३४ धावांवर बाद करत त्यांना पुन्हा एकदा अडचणीत आणले. पॅट्रियोटस्ला शेवटच्या १८ षटकांत ३१ धावांची आवश्यकता असताना राशिद खानने डावातील १८व्या षटकांत दोन बळी घेतले. शेवटच्या षटकांत २० धावांची गरज असताना सोहेल तन्वीरने फटकेबाजी केली. परंतु, त्याचे प्रयत्न संघाला विजयी करू शकले नाहीत.