>> जमैका तलावाहज्वर १९ धावांनी मात
त्रिनबागो नाईट रायडर्सने कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेतील आपला विजयी धडाका सुरूच ठेवताना सलग सातव्या विजयाची नोंद करताना जमैका तलावाहज्चा १९ धावांनी पराभव केला. त्रिनबागोच्या ४ बाद १८४ धावांना उत्तर देताना तलावाहज्ला ६ बाद १६५ पर्यंतच पोहोचता आले.
तलावाहज्ने यावेळी नाणेफेक जिंकत त्रिनबागोला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. त्रिनबागोने संघात दोन बदल करताना टिऑन वेबस्टर व सिकंदर रझा यांच्या जागी ड्वेन ब्राव्हो व सुनील नारायण यांचा पुन्हा संघात समावेश केला. तलावाहज्ने वीरसामी परमॉलला बाहेर बसवून आंद्रे रसेलला संघात घेतले. तीन सामने मुकल्यानंतर संघात परतलेल्या सुनील नारायण याने फिडेल एडवर्डस् याने टाकलेल्या पहिल्या षटकात २ चौकार व १ षटकार खेचत त्रिनबागोला झंझावाती सुरुवात करून दिली. कार्लोस ब्रेथवेटने टाकलेल्या डावातील तिसर्या षटकातील पहिल्या तीन चेंडूंवर चौकारांची बरसात केल्यानंतर नारायण चौथ्या चेंडूवर बाद झाला. यावेळी केवळ २.३ षटकात त्रिनबागोच्या ३२ धावा फलकावर लागल्या होत्या.
यापूर्वीच्या दोन्ही सामन्यात शून्यावर बाद झालेला कॉलिन मन्रो तिसर्या स्थानी फलंदाजीस उतरला. त्याने ५४ चेंडूंत ६५ धावांची खेळी करत त्रिनबागोच्या डावाला आकार दिला. आपल्या अर्धशतकी खेळीत त्याने १० चौकार व १ षटकार लगावला. टिम सायफर्ट (१३ चेंडूंत १८) व कायरन पोलार्ड (१६ चेंडूंत नाबाद ३३) यांनी शेवटच्या काही षटकांत तुफानी फटकेबाजी करत त्रिनबागोला निर्धारित २० षटकांत ४ बाद १८४ धावांपर्यंत पोहोचविले. तलावाहज्कडून कार्लोस ब्रेथवेट याने दोन तर फिडेल एडवर्डस् व संदीप लामिछाने यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना तलावाहज्ची सुरुवात खराब झाली. सलामीवीर चॅडविक वॉल्टन पहिल्याच चेंडूवर आपली विकेट गमावून बसला. यंदाच्या सीपीएलमध्ये वॉल्टन याने २, ०, ०, १, १०, १ अशी कामगिरी केली आहे. आपल्या आक्रमक खेळासाठी ओळखला जाणारा दुसरा सलामीवीर ग्लेन फिलिप्स याला अपेक्षित वेगाने फलंदाजी करता आली नाही.
३१ चेंडूंत त्याने ४१ धावा केल्या असल्या तरी त्याच्याकडून अधिक चांगल्या स्ट्राईकरेटची अपेक्षा होती. जर्मेन ब्लॅकवूड (९), अनक्रुमा बोनर (२६), रोव्हमन पॉवेल (२), आसिफ अली (७) यांनी निराशा केल्याने तलावाहज्ची १४.१ षटकांत ६ बाद ९७ अशी केविलवाणी स्थिती झाली होती. आंद्रे रसेल याने केवळ २३ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ५० व कार्लोस ब्रेथवेट याने १६ चेंडूंत नाबाद २१ धावा जमवत पराभवाचे अंतर कमी केले. लक्ष्य मोठे असल्यामुळे त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. त्रिनबागोकडून फवाद अहमद याने दोन तर अकिल हुसेन, खारी पिएर, सुनील नारायण व ड्वेन ब्राव्हो यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
गयानासमोर बार्बेडोसची शरणागती
नवीन उल हक याने केवळ १४ धावांत घेतलेल्या चार बळींच्या जोरावर गयाना ऍमेझॉन वॉरियर्सने बार्बेडोस ट्रायडंटस्चा ८ गडी राखून पराभव केला. बार्बेडोसने विजयासाठी ठेवलेले ९३ धावांचे किरकोळ लक्ष्य गयानाने १६.४ षटकांत २ गडी गमावून गाठले. प्रथम फलंदाजी करताना बार्बेडोसची स्थिती ११.६ षटकांत ८ बाद २७ अशी दयनीय झाली होती. मिचेल सेंटनर (३६) व राशिद खान (१९) नवव्या गड्यासाठी ४८ धावांची भागीदारी करत संघावरील नामुष्की टाळली.
गयानाकडून नवीन वगळता कर्णधार कॅमेरून ग्रीन याने भेद मारा करत आपल्या ४ षटकांत केवळ ३ धावा देत १ गडी बाद केला. केव्हिन सिंक्लेअरने २ बळी घेत सुरेख मारा केला. मोठ्या धावसंख्येचा दबाव नसल्यामुळे गयानाने सावध खेळ दाखवला. सलामीवीर ब्रेंडन किंग याने ४९ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह नाबाद ५१ धावांचे योगदान दिले. ३३ चेंडूंत १८ धावा करून नाबाद राहिला. बार्बेडोसकडून हेडल वॉल्श व राशिद खान यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.