‘त्या’ 47 निविदांची दक्षता खात्याकडून चौकशी सुरू

0
2

जुने गोवा येथील सेंट फ्रान्सिस झेवियर अवशेष दर्शनासाठी जारी केलेल्या 47 निविदांची दक्षता खात्याने चौकशीची प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती सरकारी वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला दिली. त्यामुळे उच्च न्यायालयाने जितेश कामत यांची यासंबंधीची जनहित याचिका निकालात काढली आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याने जुने गोवे येथील सेंट फ्रान्सिस झेवियर अवशेष दर्शनावेळी विविध सुविधा पुरवण्यासाठी काढलेल्या 47 कामाच्या निविदांमध्ये ‘संशयास्पद फेरफार’ तपासण्याचे निर्देश देण्याची विनंती करणारी जनहित याचिका जितेश कामत यांनी दाखल केली होती. जितेश कामत यांनी एक पत्रकार परिषद घेऊन 47 कामांच्या निविदांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता.
न्यायालयात दाखल केलेली जनहित याचिका दक्षता विभागाकडे तक्रार म्हणून पाठवण्यात आली आहे. याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे, अशी माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयाला दिली.