सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कर्मचारी पुरवठा सोसायटीमधीत तात्पुरता दर्जा देण्यात आलेल्या कर्मचार्यांना खात्याच्या सेवेत सामावून घेण्यास वेळकाढूपणा केला जात असल्याने नाराज बनलेल्या कर्मचार्यांनी मागणीच्या पुर्ततेसाठी पुन्हा आक्रमक बनण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन दिवसात कर्मचार्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी संयुक्त बैठक न घेतल्यास १९ जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर धरणे धरण्याचा इशारा कामगारांनी काल दिला.
पीडब्लूडीमध्ये तात्पुरता दर्जा देण्यात आलेल्या कर्मचार्याना सेवेत सामावून घेण्याची मागणी धसास लावण्यासाठी कर्मचार्याकडून गेल्या दीड – दोन महिन्यापासून पाठपुरावा केला जात आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी संपर्क साधून या प्रश्नी तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी संबंधित खात्याच्या अधिकार्याशी संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन कर्मचार्याना देण्यात आले आहे. परंतु, बैठक आयोजित केली जात नसल्याने कर्मचार्यात नाराजी पसरली आहे.
मंगळवार १६ रोजी सकाळी या कर्मचार्यानी आल्तिनो पणजी येथे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, मुख्यमंत्री पर्रीकर यांची भेट होऊ शकली नाही. मुख्यमंत्री पर्रीकर यांचे खासगी सचिवांची भेट घेतली. येत्या दोन दिवसात बैठक आयोजित करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे कर्मचार्यांना सांगण्यात आले. दोन दिवसात कर्मचार्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी बैठक न घेतल्यास १९ जानेवारीला बंगल्यासमोर निदर्शने केली जातील, असा इशारा कर्मचार्यानी दिला. पीडब्लूडी कर्मचारी पुरवठा सोसायटीमध्ये तात्पुरता दर्जा देण्यात आलेले सुमारे १३८० कर्मचारी आहेत.