भौतिकशास्त्र विभागातील कथित प्रश्नपत्रिका चोरी प्रकरणी सहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रणव नाईक यांच्याविरोधात गोवा विद्यापीठाने काल अखेर आगशी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. गोवा विद्यापीठाने तक्रार दाखल केल्याने प्रा. प्रणव नाईक यांच्याविरोधात आगशी पोलिसांकडून गुन्हा दाखल केला जाण्याची शक्यता आहे.
काशिनाथ शेट्ये आणि इतरांनी गोवा विद्यापीठातील प्रश्नपत्रिका चोरी प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर आगशी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. गोवा विद्यापीठातील प्रश्नपत्रिका चोरी प्रकरण सध्या चर्चेचा विषय बनला आहे. राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय समितीची नियुक्ती केली आहे.
गोवा विद्यापीठाने नियुक्त केलेल्या दोन सदस्यीय सत्यशोधन समितीच्या अहवालानंतर या प्रकरणी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राज्यपाल, गोवा विद्यापीठाचे कुलपती पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी प्रश्नपत्रिका चोरी प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सखोल चौकशीचा आदेश दिला आहे. गोवा विद्यापीठाने प्रश्नपत्रिका चोरी प्रकरणी पोलीस स्थानकात यापूर्वी तक्रार दाखल केली नव्हती.
मार्च महिन्याच्या अखेर होणाऱ्या गोवा विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत प्रश्नपत्रिका चोरीचा विषय चर्चेला येणार आहे. या बैठकीत या प्रकरणात शिस्तभंग कारवाईबाबत निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
काशिनाथ शेट्येंची न्यायालयात धाव
काशिनाथ शेट्ये व इतरांनी गोवा विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिका चोरी प्रकरणामध्ये येथील जिल्हा व सत्र न्यायालयात काल अर्ज दाखल केला. शेट्ये व इतरांच्या अर्जावर येत्या सोमवार दि. 24 मार्च रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. काशिनाथ शेट्ये व इतरांनी गोवा विद्यापीठातील प्रश्नपत्रिका चोरी प्रकरणी आगशी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. मात्र गुन्हा दाखल करण्यात न आल्याने त्यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली आहे.