‘त्या’ शिक्षिकांना सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर

0
3

>> 7 वर्षीय मुलीला अन्य विद्यार्थिनींकडून मारहाण प्रकरण

कुंकळ्ळीमधील एका विद्यालयातील 7 वर्षीय मुलीला अन्य विद्यार्थिनींकडून झालेल्या मारहाण प्रकरणामध्ये विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आणि वर्गशिक्षिकेला बाल न्यायालयाने काल सशर्त अटकपूर्व जामीन काल मंजूर केला.

वेरोडा-कुंकळ्ळीतील एका विद्यालयात मुलांमध्ये झालेल्या भांडणात एक मुलगी गंभीर जखमी झाली होती. ही घटना 27 सप्टेंबरला घडली होती. या प्रकरणी मडगाव येथील महिला पोलीस स्थानकाकडून चौकशी केली जात आहे. पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्यानंतर त्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आणि वर्गशिक्षिकेने अटकपूर्व जामिनासाठी बाल न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मागील आठवड्यात या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली होती. त्यानंतर काल त्या दोघांना 25 हजार रुपयांच्या वैयक्तिक हमीवर सशर्त जामीन मंजूर करण्यात आला. तसेच त्यांना 10 दिवसांसाठी पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचा आदेश दिला आहे.
सदर 7 वर्षीय मुलीच्या पालकांनी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आणि वर्गशिक्षिकेवर निष्काळजीपणाचा आरोप केला होता. मुलीला शाळेच्या आवारात त्याच वर्गातील मुलींनी धक्काबुक्की केल्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्या जखमी मुलीवर सध्या बांबोळी येथील गोमेकॉमध्ये उपचार
सुरू आहेत.