राज्य सरकारच्या समाजकल्याण खात्याच्या दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत (डीएसएसवाय) मोठे अपत्य 21 वर्षांपेक्षा कमी वयाचे असलेल्या विधवांना आता यापुढे 4 हजार रुपयांचे मासिक अर्थसाहाय्य मिळणार आहे.
डीएसएसवाय या योजनेखालील विधवांच्या मासिक मानधनात 1,500 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे विधवांना यापुढे 2,500 रुपयांच्या ऐवजी 4 हजार रुपयांचे अर्थसाहाय्य मिळणार आहे. समाजकल्याण खात्याने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे.
राज्यातील विधवा महिलांना ‘डीएसएसवाय’ योजनेअंतर्गत सरकारकडून प्रत्येक महिन्याला 2,500 रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात येत होते; परंतु सरकारने या योजनेत बदल करून मोठे अपत्य 21 वर्षांपेक्षा कमी वयाचे असलेल्या विधवांना 2,500 रुपयांच्या ऐवजी 4 हजार रुपयांचे अर्थसाहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे. योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या विधवांना गृहआधार योजनेचा लाभ मात्र देण्यात येणार नाही. याशिवाय मोठे अपत्य 21 वर्षांपेक्षा अधिक वयाचे असलेल्या विधवा महिलांचे अर्थसाहाय्य 2,500 रुपये इतकेच ठेवण्यात आले आहे. दरम्यान, राज्यातील सुमारे वीस हजार विधवा महिला सरकारच्या या योजनेचा लाभ होणार आहे.
राज्य सरकारने विधवांना आर्थिक साहाय्य करण्यासाठी योजनेमध्ये दुरुस्ती केली आहे. राज्यात सध्या 39 हजार विविध महिलांना आर्थिक साहाय्य केले जात आहे, त्यातील साधारण 50 टक्के विधवा महिलांना 4 हजार रुपयांचा लाभ मिळू शकतो. या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर सुमारे आठ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे, अशी माहिती समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली.