मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, नगरविकास मंत्री फ्रान्सिस डिसोझा, सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर, वीजमंत्री पांडुरंग मडकईकर, आमदार कार्लुस आल्मेदा व इजिदोर फर्नांडिस हे मंत्री व आमदार सध्या आजारी असल्याने त्यांना रोज औषध पाणी घ्यावे लागते. प्रकृती खालावू नये व आरोग्य ढासळू नये यासाठी त्यांना विश्रांती व काळजीही घ्यावी लागते.
उद्यापासून गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असून या लोकप्रतिनिधींपैकी कितीजण अधिवेशनाला उपस्थिती लावणार आहेत, कितीजण मर्यादित काळासाठी विधानसभेत येतील व किती जणांना एकही दिवस अधिवेशनासाठी हजेरी लावता येणार नाही हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
मडकईकर इस्पितळातच
वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांच्यावर अद्याप मुंबईतील ब्रीच कॅन्डी इस्पितळात उपचार चालू असल्याने ते अधिवेशनाला हजर राहू शकणार नाहीत हे आता स्पष्ट झालेले आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर हे त्यांच्यावर मुंबईत झालेल्या शस्त्रक्रियेनंतर गोव्यात परतले असून ते विधानसभा अधिवेशनाला हजर राहणार असल्याचे त्यांचे बंधू दीपक ढवळीकर यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, शस्त्रक्रियेला सामोरे गेलेले सुदिन ढवळीकर हे अधिवेशनात किती दिवस व किती वेळ भाग घेतील हे स्पष्ट झालेले नाही.
पूर्ण क्षमतेने सहभागाची शक्यता कमी
आमदार कार्लुस आल्मेदा यांची प्रकृती आता बर्यापैकी सुधारलेली असली तरी चालताना त्यांना थोडासा त्रास होत आहे. त्यामुळे ते पूर्णक्षमतेने अधिवेशनात सहभागी होऊ शकतील की काय याविषयी प्रश्नचिन्हच आहे. मुत्रपिंडाची शस्त्रक्रिया झालेले काणकोणचे आमदार इजिदोर फर्नांडिस यांची प्रकृती आता सुधारली असली तरी त्यांच्यावरही मर्यादा आलेल्या असल्याने ते रोज अधिवेशनाला हजेरी लावतील की काय याविषयी शंका व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी आपण पूर्ण फिट असून रोज अधिवेशनाला हजेरी लावणार असल्याचे सांगितले.
मंत्री फ्रान्सिस डिसोझा हेही आजारी असून त्यांना चालताना दुसर्या व्यक्तीची मदत घ्यावी लागते. त्यामुळे गेल्या दोन अधिवेशनात त्यांनी अल्पकाळासाठी सभागृहात हजेरी लावली. यावेळीही ते अल्पकाळासाठी विधानसभेत येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून या पार्श्वभूमीवर स्वतः गंभीर आजाराला सामोरे जाऊन परतलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर विधानसभेत किती वेळ हजर राहू शकतील व किती वेळ चर्चेत भाग घेऊ शकतील हेही पहावे लागणार आहे.