‘त्या’ फलकामुळे माझे प्राण वाचले : डोनाल्ड ट्रम्प

0
3

>> व्हाईट हाऊसचे माजी डॉक्टर रॉनी जॅक्सन यांच्याशी संवादावेळी उल्लेख; मागचा फलक दाखविण्यासाठी मान वळवली आणि थोडक्यात बचावले

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर रविवारी जीवघेणा हल्ला झाला, त्यातून ते थोडक्यात बचावले होते. नोव्हेंबर 2024 मध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ते पेनसिल्व्हेनियातील बटलर या ठिकाणी प्रचारासाठी आले होते. यावेळी समोरच्या इमारतीवर लपून बसलेल्या हल्लेखोराने ट्रम्प यांच्यावर गोळी झाडली. रिपब्लिकन पक्षाने अद्याप ट्रम्प यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलेले नाही. गोळीबाराच्या घटनेनंतर पक्ष काय निर्णय घेतो, हे आता लवकरच समोर येईल. रविवारच्या प्रचारावेळी डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या भाषणादरम्यान अवैध स्थलातंराचा मुद्दा तावातावाने मांडत होते. त्यासाठी त्यांनी मागे लावलेल्या फलकाकडे वळून बघितले आणि तेवढ्यात गोळी सुटली. ही गोळी डोक्याच्या अवघ्या दोन सेंटीमीटर अंतरापासून गेल्यामुळे ट्रम्प बचावले गेले.

बटलर येथील सभेत बोलत असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी अवैध स्थलांतराचा मुद्दा उपस्थित केला. त्यासाठी त्यांनी त्यांच्यामागे असलेल्या फलकाकडे बोट दाखविण्यासाठी मान वळवली आणि तेवढ्यात गोळी कानाला चाटून गेली. गोळी कानाला लागताच डोनाल्ड ट्रम्प खाली बसले आणि त्यांच्या कानातून रक्तस्त्राव सुरू झाला. सिक्रेट सर्विसेसच्या जवानांनी त्यांच्याभोवती कडे करत त्यांना सुरक्षितपणे मंचावरून खाली नेले. हल्ल्याच्या काही तासानंतर व्हाईट हाऊसचे माजी डॉक्टर रॉनी जॅक्सन यांच्याशी फोनवरून ट्रम्प यांनी संवाद साधला. त्यावेळी, अवैध स्थलांतराच्या फलकामुळे माझे प्राण वाचले, असे ट्रम्प म्हणाले.

डॉ. जॅक्सन यांनी न्यूयॉर्क टाइम्सला मुलाखत दिली असता ट्रम्प आणि त्यांच्यात काय संवाद झाला, याबाबत माहिती दिली. अवैध स्थलांतराच्या त्या फलकामुळे माझे प्राण वाचले. मी जर त्या फलकाकडे पाहण्यासाठी वळलो नसतो तर गोळी माझ्या डोक्यात शिरली असती, असे टम्प यांनी आपल्याशी फोनवरून बोलताना सांगितल्याची माहिती डॉ. जॅक्सन यांनी दिली.

‘त्या’ फलकावर काय लिहिले होते?
डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष असल्यापासून अमेरिकेत अवैधपणे होणाऱ्या स्थलांतराचा मुद्दा उचलत आले आहेत. राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्याची भाषा वापरली होती. न्यूयॉर्क टाइम्सने कालच्या प्रचारावेळी वापरलेल्या फलकाचा एक फोटो आता सादर केला आहे. त्यामध्ये अमेरिकेत होणारे अवैध स्थलांतर, असे स्पष्टपणे दिसत आहे. या फलकावर वर्ष 2012 ते 2024 या दरम्यान किती स्थलांतर अवैधपणे झाले याची माहिती दिली गेली आहे.

हल्लेखोराची ओळख पटली
फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय)ने हल्लेखोराची ओळख पटवली असून, थॉमस मॅथ्यू क्रूक्स या 20 वर्षीय तरुणाने हा गोळीबार केला. थॉमसने गोळीबार करताच सुरक्षा रक्षकांनी प्रतिहल्ला केला. त्यात थॉमसचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांच्या स्टेजपासून अवघ्या 140 मीटर अंतरावरील एका छतावर तो नेम धरून उभा होता. त्याच्याकडे एआर-15 ही शैलीतील सेमी ऑटोमॅटिक रायफल होती. त्याच्या वडिलांकडे या रायफलचा परवानाही आहे. याच रायफलने त्याने गोळीबार केला. पेनसिल्व्हेनियामधील बेथेल पार्कमधील तो रहिवासी होता.