>> पक्षी अभयारण्यावरील संभाव्य परिणाम
चोडण येथील डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्याच्या बाजूलाच मांडवी नदीत उभे करण्यात आलेल्या नवीन कॅसिनो जहाजावर प्रत्यक्षात कॅसिनो व्यवसाय सुरू झाल्यानंतर त्याचा या अभयारण्यावरील संभाव्य परिणामांविषयीचा अहवाल वनमंत्री राजेंद्र आर्लेकर यांना येत्या दोन-तीन दिवसात मिळणार आहे. आर्लेकर यांनी ही माहिती या प्रतिनिधीला दिली. यासंदर्भात अहवाल देण्याचा आदेश त्यांनी दिला होता.
पर्वरी मतदारसंघातील नागरिकांनी तसेच स्वयंसेवी संघटनांनी या कॅसिनोस जोरदार विरोध दर्शविला आहे.
पक्षी महोत्सवाबाबत पुढील आठवड्यात बैठक
दरम्यान, गोव्याच्या वन व पर्यावरण खात्याच्या नियोजित पक्षी महोत्सव कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यासाठी पुढील आठवड्यात एक बैठक होणार असल्याचे वनमंत्री राजेंद्र आर्लेकर यांनी काल सांगितले. येत्या नोव्हेंबरमध्ये हा महोत्सव होईल.
डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्यावर या महोत्सवानिमित्त खास लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. या महोत्सवानिमित्त देश-विदेशांतून पक्षी अभ्यासक, पक्षी निरीक्षक, पक्षी छायाचित्रकार व पक्षीप्रेमी येणार असून माहितीचे मोठे आदान-प्रदान, चर्चासत्रे व अन्य कार्यक्रमांतून होणार आहे. यानिमित्त चर्चासत्रे व अन्य काही महत्त्वाचे कार्यक्रम पणजीत आयोजित करण्याचा विचार असल्याचे आर्लेकर यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय वनमंत्र्यांनाही निमंत्रित करणार
दरम्यान, केंद्रीय वन व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांना या पक्षी महोत्सवाविषयी आपण माहिती दिलेली असून त्यानीही महोत्सवाविषयी खूप रस दाखवला आहे. त्यामुळे महोत्सवाच्या काळात त्यानीही कार्यक्रमासाठी यावे, अशी आपली इच्छा असून त्यांना निमंत्रण देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.