>> वास्कोत संबंधित अधिकार्यांसोबत बैठक
दोनापावल येथे समुद्रातरुतलेल्या नू-शी-नलिनी या नाफ्तावाहू जहाजातील नाफ्ता हायड्रोलिक पंपद्वारा खेचण्याच्या कामाला ३१ ऑक्टोबर किंवा १ नोव्हेंबरला आरंभ करण्यात येईल. सदर काम चार पाच दिवसांमध्ये पूर्ण करण्यात येईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथे मंगळवारी सांगितले. या जहाजातील नाफ्ताला गळती लागू यासाठी सर्व खबरदारी घेण्यात आल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन केले.
कोणाविरोधात गुन्हे नोंदवावे हे सध्याच्या स्थितीत महत्वाचे नाही. सर्वात अगोदर तो नाफ्ता दुसर्या जहाजामध्ये हलविण्याचे काम महत्वाचे आहे. त्या जहाजावरील नाफ्ता पूर्णपणे खेचून दुसरीकडे नेण्यात आल्यावर त्या जहाजाचे काय करावे हा निर्णय घेतला जाईल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
या जहाजातील नाफ्ता काढण्यासाठी काय केले पाहिजे यासंबंधी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एमपीटी, नौदल, भारतीय तटरक्षक दल, जहाज मालक, कस्टम्स अधिकारी तसेच इतर संबंधितांचे प्रतिनिधी यांची मंगळवारी एमपीटीच्या प्रशासकीय कार्यालयात बैठक घेतली होती. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांना एकंदर चर्चेसंबंधी थोडक्यात माहिती दिली.
या ऑपरेशनचा खर्च एमपीटीने करावा यासाठी राज्य सरकारने एमपीटीला पत्र लिहले होते. आता ऑपरेशनचा सर्व खर्च जहाज मालकाद्वारा करण्यात येत आहे. त्यामुळे राज्य सरकार या ऑपरेशनावर कोणताही खर्च करीत नाही. नाप्ता खेचण्याचे काम पूर्ण झाल्यावर चूक कोणाची होती हे तपासले जाईल. या जहाजातील नाफ्तामध्ये शुद्ध व दूषित नाफ्ता किती आहे हे सांगणे कठिण असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.