‘त्या’ जखमी दिव्यांगाचा मृत्यू

0
35

गेल्या महिन्यात 30 ऑगस्टला पर्वरी येथील एका शासकीय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून पडलेल्या जखमी झालेला दिव्यांग सिडनी डिसोझा (42) याचा काल गोमेकॉमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, सिडनी डिसोझा याच्या मृत्यूबद्दल गोवा राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर यांनी शोक व्यक्त केला आहे. दिव्यांग व्यक्तींच्या हक्क व कल्याणासाठी राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालय कटिबद्ध आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

हळदोणे येथील सिडनी डिसोझा हा आपल्या आईबरोबर पर्वरीतील एका शासकीय इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील आधार केंद्रावर आधार अपडेट करण्यासाठी आला होता. त्याची आई आतमध्ये आधार अपडेट करण्यासाठी गेली असता सिडनी हा तेथे एका ग्रिल्सला टेकून उभा राहिला. ते ग्रिल्स गंजलेले असल्यामुळे तुटले आणि सिडनी दुसऱ्या मजल्यावरून ग्रिल्ससकट खाली कोसळला. त्याला त्वरित गोमेकॉमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या अपघातात त्याच्या कंबरेला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. गेले काही दिवस त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार केले जात होते; परंतु मंगळवारी त्याने अखेरचा श्वास घेतला.
दरम्यान, सिडनी हा आपल्या आईबरोबर पहिल्यांदा म्हापसा येथील आधार केंद्रावर गेला होता; परंतु तेथील सर्व्हर चालत नसल्यामुळे त्यांना पर्वरीतील आधार केंद्रावर जाण्यास सांगितले होते. आणि त्यावेळी ही अपघाताची घटना घडली होती.