‘त्या’ क्रीडापटूंना सरकारी नोकरी देणार : मुख्यमंत्री

0
6

स्पेशल ऑलिम्पिकमधील पदकविजेत्यांचा गौरव

स्पेशल ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवलेल्या गोमंतकीय क्रीडापटूंना सरकारी नोकरी व 5 लाख रुपये रोख राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणार असल्याचे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

त्याचबरोबर स्पेशल ऑलिम्पिकमध्ये रौप्य व कांस्यपदक पटकावलेल्या गोमंतकीय क्रीडापटूंना अनुक्रमे 3 लाख व 1 लाख रुपये रोख बक्षीस देण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर आगामी आशियाई स्पर्धांत आणि अन्य मोठ्या स्पर्धांत सुवर्णपदक पटकावणाऱ्या गोमंतकीय क्रीडापटूंनाही सरकारी नोकरी व 5 लाख रुपये रोख बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणाही काल मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच रौप्य व कांस्यपदक पटकावणाऱ्या गोमंतकीय क्रीडापटूंना अनुक्रमे 3 लाख व 1 लाख रुपये देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

स्पेशल ऑलिम्पिकमध्ये सहभागी होऊन पदकांसह परतलेल्या गोमंतकीय क्रीडापटूंचा काल सत्कार केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी 15 क्रीडापटू व 8 प्रशिक्षकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्पेशल ऑलिम्पिक स्पर्धेच्या वेळी या क्रीडापटूंबरोबर स्पर्धा संपेपर्यंत थांबवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांचे कौतुक केले.