>> वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांची माहिती
वीज खात्यातील ज्या कंत्राटी कर्मचार्यांना नोकरभरतीसाठीच्या नियमांची पूर्तता न करताच नोकर्या देण्यात आल्या होत्या, अशा कर्मचार्यांना सोडून कंत्राटी पद्धतीवरील अन्य कर्मचार्यांना सेवेत कायम करण्याबाबत विचार केला जाईल, अशी माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल विधानसभेत दिली.
विधानसभेत काल आमदार आलेक्स सिल्वेरा यांनी मांडलेल्या एका लक्षवेधी सूचनेवर बोलताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिले.
२००७ सालापासून वीज खात्यात ज्या कर्मचार्यांची कंत्राटी पद्धतीवर भरती झाली, त्यापैकी काही कर्मचार्यांची मुलाखत आणि परीक्षा न घेताच त्यांची भरती झाली असल्याचे आढळून आले असल्याचे ढवळीकर यांनी स्पष्ट केले. त्यात मीटर रिडर्स, वायरमन आदी पदांवरील कर्मचार्यांचा समावेश असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. मात्र, हे खरे नसून वीजमंत्री ढवळीकर यांनी केलेला हा दावा खोटा असल्याचे सिल्वेरा म्हणाले. दिगंबर कामत व आपण वीजमंत्री असतानाही असे कधीच घडले नसल्याचे सिल्वेरा यांनी सांगितले.