मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती; दुरुस्ती कामानंतर कंत्राटदार काळ्या यादीत
कला अकादमीचे नूतनीकरण व दुरुस्तीचे काम करताना निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ज्या त्रुटी राहून गेल्या आहेत, त्या त्रुटी आता हे काम केलेल्या कंत्राटदाराकडूनच येत्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत मोफत दूर करून घेतल्या जाणार आहेत. तसेच सदर कंत्राटदाराला नंतर काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे, अशी माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. मात्र, मागील निविदेत नसलेली आणि आता होणारी अतिरिक्त कामे ही नवी निविदा काढून केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हे सगळे काम करताना पारदर्शकता ठेवली जाईल, तसेच गुणवत्तेकडे खास लक्ष ठेवले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
विनाविलंब येत्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत कला अकादमीतील त्रुटी दूर करण्यासाठी काम हाती घेले जाईल व ते पूर्ण करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. कला अकादमीची इमारत ही राज्यातील सांस्कृतिक वारशाचे एक प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले.
कला अकादमीच्या इमारतीचे नूतनीकरण केल्यानंतर विविध त्रुटींमुळे कला अकादमी वादाचा विषय ठरली होती. आणि तेथील ध्वनियंत्रणा व वीज यंत्रणाही निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप विरोधकांनी केल्यानंतर आणि काही घटनांमधून ती बाब प्रत्यक्षात समोर आल्यानंतर सरकारने चौकशीसाठी नाट्य दिग्दर्शक विजय केंकरे यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली होती.
दरम्यान, सुमारे महिनाभरापूर्वी कला अकादमीत महाराष्ट्रातील एका व्यावसायिक नाटकाचा प्रयोग चालू असताना तेथील ध्वनियंत्रणेत बिघाड होण्याची घटना घडली होती. नंतर आणखी एका नाटकाचा प्रयोग चालू असताना प्रकाशयोजनेसाठीच्या वीज यंत्रणेत बिघाड होण्याची घटनाही घडली होती. त्यामुळे पुन्हा एकदा कला अकादमीच्या नूतनीकरणाच्या विषयावरून वादाला तोंड फुटले
होते.
या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्र्यांनी येत्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत कला अकादमीतील त्रुटी नाहीशा करण्यासाठी हे काम केलेल्या कंत्राटदाराकडूनच सदर काम मोफत करून घेतले जाणार असल्याचे स्पष्ट केले.
ही तर मुख्यमंत्र्यांकडून घोटाळ्याची
कबुली : आमदार विजय सरदेसाई
कला अकादमीच्या नूतनीकरण कामात ज्या त्रुटी राहिल्या आहेत, त्या त्याच कंत्राटदाराकडून दुरुस्त करून घेणार असे जे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे, ते म्हणजे कला अकादमीच्या नूतनीकरण कामात महाघोटाळा झाल्याची कबुली देण्यासारखेच आहे, असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी म्हटले आहे. मात्र या प्रकाराला जो कोणी दोषी आहे, त्याच्यावर कारवाई करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी कोणतेही भाष्य केलेले नाही, त्याविषयी सरदेसाईंनी नाराजी व्यक्त केली.
कला अकादमीतील नूतनीकरणाचा महाघोटाळा सर्वप्रथम आपण उघडकीस आणला. विधानसभेत आणि बाहेरही आवाज उठवला. तसेच या घोटाळ्याविरोधात न्यायालयात दाद मागितली, असे सरदेसाई म्हणाले.
निविदा न काढता एका कंत्राटदारला काम कसे दिले असा सवाल आपण कला व संस्कृतीमंत्र्यांना विधानसभेत विचारला असता, त्यांनी ताजमहाल बांधताना निविदा काढली नव्हती, असे उत्तर दिले होते, याची आठवण सरदेसाई यांनी करून दिली.
सदर कंत्राटदारला निविदा न काढता कोणी काम दिले, त्याची चौकशी व्हायला हवी. या कामासाठी 70 ते 80 कोटी रुपये खर्च झाले, ते गोव्यातील जनतेच्या करातून खर्च केले आहेत, यामागील सूत्रधार कोण? त्याला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यावर कोणती कारवाई करण्यात येईल याबाबत मुख्यमंत्र्यांनी काहीही भाष्य केलेले नाही. फक्त त्याच कंत्राटदारांकडून एकही पैसा न देता काम करवून घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. म्हणजेच हा मोठा घोटाळा असल्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले.
आता त्याच कंत्राटदारांकडून दुरुस्ती काम करून घेतल्यानंतर इतिहासाची पुनरावृत्ती होणार नाही, याची खात्री सरकार देणार का, असा सवालही विजय सरदेसाई यांनी केला.