>> प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांची माहिती
कॉंग्रेस पक्षाच्या काल झालेल्या बैठकीत पक्षातून फुटून गेलेल्या १० आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा ठराव मंजूर करण्यात आल्याची माहिती प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या ठरावाबरोबरच पंचायतींच्या प्रभाग फेररचनेसाठीचा अवधी आणखी वाढवून देण्यात यावा अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे करण्यासंबंधीचा ठरावही संमत करण्यात आला. यावेळी पक्षाच्या विविध समित्या तसेच पक्षाचे गोवा विधानसभा निवडणुकीतील उमेदवार उपस्थित होते.
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने कॉंग्रेसमधून फुटून गेलेल्या १० व मगोतून फुटून गेलेल्या २ अशा एकूण १२ उमेदवारांविरूद्ध जी अपात्रता याचिका होती त्याप्रकरणी दिलेल्या निवाड्याला तात्काळ सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा ठराव बैठकीत घेण्यात आल्याचे चोडणकर यांनी सांगितले. त्याचबरोबर सत्ताधारी भाजप पंचायत प्रभागांची फेररचना आपल्या फायद्यासाठी घाईगडबडीत आपणाला हवी तशी करत असल्याच्या लोकांच्या तक्रारी आहेत. त्या पार्श्वभूमीवर या फेररचनेसाठी अवधी वाढवून देण्याची मागणी आयोगाकडे करण्याचा ठरावही संमत केल्याचे चोडणकर म्हणाले.
यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी, १२ मार्चपर्यंत नवे सरकार सत्तेवर येणार असून घाईगडबडीने गरीब शेतकर्यांच्या बागायती का नष्ट केल्या जात आहेत, असा प्रश्न केला.
आचारसंहितेत नोकरभरती
निवडणूक आचारसंहिता लागू असतानाच सध्या घाईगडबडीत नोकरभरती चालू असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. हे पूर्णपणे बेकायदा असून ही नोकरभरती बंद करण्यात यावी अशी मागणी कॉंग्रेस पक्ष करणार असल्याचे कामत म्हणाले.