त्याग, तपस्या आणि सेवा

0
38

योगसाधना- 650, अंतरंगयोग- 236

  • डॉ. सीताकांत घाणेकर

सेवा- तपस्या- त्याग या गोष्टी फार आवश्यक आहेत. पण हे सर्व करताना सृष्टिकर्ता भगवंताचा, आपल्या मातापित्याचा, सद्गुरूंचा विसर पडता कामा नये. म्हणून यज्ञासारखे सत्कर्म करताना भगवंताचे स्मरण करण्यासाठी विविध मंत्र म्हणत असत.

मानवी जीवनात काही शब्द पुष्कळ वेळा व परत परत ऐकायला मिळतात. त्यांतील तीन मुख्य शब्द म्हणजे- ‘त्याग’, ‘तपस्या’ आणि ‘सेवा.’ प्रत्येक क्षेत्रात या तीन शब्दांचा अनेकवेळा उपयोग होतो- भौतिक, सामाजिक, आध्यात्मिक. हे शब्द साधे नाहीत, फार वजनदार आहेत. मुख्यतः आध्यात्मिक क्षेत्रात.
सेवा ः हा शब्द अनेकांच्या तोंडून आपण ऐकतो. आईवडिलांनी मुलांची सेवा केली, मुलांनी वृद्धांची सेवा केली, डॉक्टरांनी रोग्यांची सेवा केली, सामाजिक कार्यकर्त्यांनी पीडितांची सेवा केली, सरकारी सेवकांनी लोकांची सेवा केली… अशी कितीतरी उदाहरणे रोजच्या जीवनात दृष्टिक्षेपात येतात.
येथे मुख्य मुद्दा म्हणजे, सेवा करण्यामागील हेतू काय असतो तो बघायला हवा. बहुतेकवेळा ही सेवा देहाभिमान ठेवून केली जाते. म्हणजे नाते, कर्तृत्वशक्ती, स्थान… तसेच अनेकवेळा अपेक्षेने केली जाते- जास्त करून काही भौतिक, आर्थिक लाभ, समाजातील स्थान… त्यात गैर काही नाही. अनेकवेळा बहुतेकजण कर्तव्य म्हणूनदेखील सेवा करतात.

सेवेला जास्त महत्त्व येते जेव्हा ती सेवा निःस्वार्थ, निरपेक्ष भावनेने केली जाते. या सेवेची विविध उदाहरणे आहेत- स्वातंत्र्यसैनिकांनी केलेली देशसेवा, भारतातील स्त्री करत असलेली कुटुंबाची सेवा- मुख्यतः पूर्वीच्या पिढीतील स्त्री. आजच्या तथाकथित भौतिक जीवनात अशी उदाहरणे कमी सापडतात. याचे एक कारण म्हणजे, कुटुंबात आता अपेक्षित संस्कार होत नाहीत. तसेच शैक्षणिक क्षेत्रातदेखील पूर्वीसारखे नैतिक शिक्षण मिळत नाही. त्यामुळे समाजातील विविध समस्या वाढताहेत- विभक्त कुटुंबे, तंटे, घटस्फोट वगैरे. अनेकांचा देहाभिमान वाढला आहे- स्वतःचे शिक्षण, पद, प्रतिष्ठा, आर्थिक स्थिती… यांना जास्त महत्त्व दिल्यामुळे स्वार्थ व अहंकार वाढला आहे.

आज देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे खरे, पण मानवाची वृत्ती गुलामाची आहे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार असे त्याला वाटते. या भावनेचे बळी तरुण व प्रौढदेखील होताना दिसतात. बहुतेकांना या स्थितीबद्दल चिंता वाटते, निराशा येते. त्यांना नक्की उपाय सुचत नाही. कारण विश्वाची विनाशाकडे घोडदौड चालू आहे हे त्यांना स्पष्ट दिसते.

खरे म्हणजे या विषयावर सखोल अभ्यास व चिंतनाची आवश्यकता आहे. याला एक उपाय म्हणजे अध्यात्मशास्त्राचा शास्त्रशुद्ध अभ्यास. योग हे असेच एक शस्त्र आहे. फक्त हटयोग करणे म्हणजे योगसाधना नव्हे. तो आवश्यक आहे, पण तो फक्त एक स्थूल पैलू आहे. योग तत्त्वज्ञानाचा योग्य अभ्यास हवा. अध्यात्मशास्त्राचा अभ्यास केला की एक मुद्दा सुरुवातीला कळतो, तो म्हणजे, मी देह नाही- देही (आत्मा) आहे. असा विचार केला की मानवाचे अनेक दुर्गुण गळून पडतात- स्वार्थ, षड्रिपू, अहंकार… कारण आध्यात्म हे आत्म्याचे शास्त्र आहे. व्याख्याच तशी आहे-
आत्मने अधि इति अध्यात्मः
त्यामुळे दुसऱ्याच्या देहाकडे न बघता, त्याचे दुर्गुण न बघता, त्याच्यातील आत्म्याच्या सप्तगुणांचे दर्शन होते. आत्म्याची पवित्रता दिसायला लागते. मानवत्वाचा साक्षात्कार होतो.

एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की ही जाणीव झाली, ज्ञान झाले म्हणून लगेच काही दृष्टिकोन बदलणार नाही. त्यासाठी निरंतर योगसाधना हवी. सुरुवातीला ‘योग’ शब्दाचा खरा अर्थ समजायला हवा.
युज्वते अनेक इति योगः।
संस्कृतातील ‘यूज’ शब्दावरून बनवलेला हा शब्द. ‘यूज’ म्हणजे जुळणे, एकत्र येणे. हे जुळणे विविध संदर्भातून बघायला हवे-

  • मन व शरीर ः म्हणजे चित्त एकाग्रता- सर्वांनाच कर्तृत्वशक्ती आठवण्यासाठी अत्यंत आवश्यक.
  • आत्मा व परमात्मा ः यांचे मीलन ध्यानामध्ये उत्कृष्ट तऱ्हेने होऊ शकते. त्यामुळे आत्मशक्ती वाढते. भावमीलन अपेक्षित आहे.
  • दोन किंवा अनेक आत्म्यांचे मीलन- हे आवश्यक आहे. कारण मग भेदभाव राहत नाही. सद्भाव नांदतो. एकात्मता साधते.
    आपल्या ऋषी-महर्षींनी त्यासाठीच म्हटले होते- वसुधैव कुटुम्ब कम्‌‍। आंतरराष्ट्रीय योग दिवस- 2023 चे संयुक्त राष्ट्राचे हेच ध्येय आहे. दुर्भाग्याने त्या दिवशी शेकडो देश, करोडो लोक योग करतात. मग हे सर्व विसरून जातात. निरंतर योगसाधना करत नाहीत. अर्थात, अपवाद आहेतच.
    स्वामी विवेकानंद- ज्यांनी योग व वेदांत या भारतीय विषयांचा प्रचार व प्रसार केला. ते म्हणतात की योगशास्त्राचे तत्त्वज्ञान अभ्यासून आचरणात यायला हवे तरच अपेक्षित फळ मिळेल. त्यांच्या विविध साहित्यातून त्यांच्या या विचाराचे दर्शन होते. एक उत्कृष्ट वाक्य म्हणजे- मी त्या प्रभूचा सेवक आहे, ज्याला सामान्य लोक मनुष्य म्हणतात. किती खोल तत्त्वज्ञान या वाक्यात आहे. स्वामीजी सेवादेखील याच भावनेने करीत होते. मग ती सेवा रोग्यांची असो अथवा ज्ञानदान करून केलेली सेवा असो. अशा महापुरुषांचे जीवन बघितले की सेवेचा अर्थ समजतो.

त्यासाठी ‘तपस्या’ या शब्दावर विचार हवा. आपण हा शब्द अनेक महापुरुष, कवींच्या चरित्रात ऐकतो. तपस्या म्हणजे जंगलात एका पायावर उभे राहून भगवंताचा जप करणे नव्हे. भगवंताकडे योग साधणे आवश्यक आहे तरच फळ मिळणार. आपण वाचतो की ध्रुवबाळ श्रीविष्णूचा मंत्र जपत होता- ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’, तर वेदशास्त्र पारंगत लंकेश रावण श्रीशंकराचा जप करत होता- ‘ॐ नमः शिवायः’
तपस्या करण्यामागचा दृष्टिकोन मुख्य आहे. ‘तप’ या शब्दाचा अर्थ आहे ‘तत्त्वासाठी परिश्रम.’ म्हणजे तपस्वीचे ध्येय मुख्य आहे. रावणासारखा स्वार्थ व अहंकार असला तर नाश होतो- स्वतःचा व इतरांचा. त्याविरुद्ध ध्रुवबाळाला ‘ध्रुवपद’- अढळ असे पद प्राप्त झाले.
तपस्येच्या मुळात निस्वार्थी, निरपेक्ष, निराकांक्ष सेवा असली तर फळ चांगले मिळते. व्यक्तीचा व समाजाचा विकास होतो. अशा उच्च सेवेला ‘त्याग’ म्हणतात.
शास्त्रकार सांगतात की जीवनात काही व्यक्ती अशा भेटतात की त्यांना पुष्कळ सफलता मिळते. त्यांचे आचार-विचार सात्त्विक असतातच, पण मिळालेले फळ अनेकपट जास्त असते. याचे कारण म्हणजे त्यांनी या जन्मात व पूर्वजन्मात केलेला त्याग.

सेवा- तपस्या- त्याग या गोष्टी फार आवश्यक आहेत. पण येथे एक मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे व तो म्हणजे, हे सर्व करताना सृष्टिकर्ता भगवंताचा, आपल्या मातापित्याचा, सद्गुरूंचा विसर पडता कामा नये. म्हणून यज्ञासारखे सत्कर्म करताना भगवंताचे स्मरण करण्यासाठी विविध मंत्र म्हणत असत. हा असा दृष्टिकोन ठेवला तर माणसाला कळते की ‘मी फक्त एक साधन आहे, कर्ताकरविता ईश्वर आहे.’ म्हणून प्रत्येक कर्मात त्याचे स्मरण आवश्यक आहे. त्याची आठवण असणे आवश्यक आहे.