त्यांनाही प्रेम हवंय…!

0
177

– अंतरा भिडे

फेसबुकवर कुणीतरी एक पोस्ट शेअर केला होता. एका माणसानं आपल्या पाळीव कुत्र्याला कित्येक महिने उपाशी ठेवलं होतं. त्याच्या अंगावर फक्त हाडं आणि कातडीच दिसत होती. बिचारा कुत्रा केविलवाण्या नजरेनं बघत होता. पुढं काही दिवसांत तो गेला. त्या क्रूर माणसाच्या (की जनावराच्या?) विरोधात कुणीतरी कोर्टात केस ठोकली, आणि तीतून तो सहीसलामत सुटलाही.

आपण आपल्या निसर्गाबद्दल फार काळजी दाखवतो. हो ना? कुणी विनाकारण झाडं कापू लागल्यास हल्ला बोलतो, निषेध दर्शवितो. कचर्‍याच्या समस्यांना सामोरे जातो, तक्रारी नोंदवतो. खाणींच्या विरोधात, कॅसिनोच्या विरोधातही आवाज उठवतो. मग हे सगळे प्राणी-पक्षीही आपल्या निसर्गाचाच भाग आहेत ना? त्यांच्याकडे का दुर्लक्ष करतो आपण? गाडी चालवताना रस्त्यावरच्या माणसांची काळजी घेतो तशी कुत्र्या-मांजरांची का घेत नाही? का मरू देतो त्यांना आपण गाडीच्या चाकाखाली? एक ड्रायव्हर तर रस्त्यावरच्या प्रत्येक कुत्र्याला धडक देऊन जात होता आणि त्यांच्या केकाटण्यावर हसत होता. असली लोकं कितीतरी असतील… ही कसली विकृती? निरुपद्रवी प्राण्यांच्या वाटेला जाऊन काय मिळणार आहे ह्यांना?
तुम्हांला माहितिये? तुम्ही कधीतरी एखादं बिस्किट दिलं रस्त्यावरच्याच एखाद्या कुत्र्याला, नाहीतर गोंजारलंच एकदा फक्त, प्रेमाने, कधीही विसरत नाही तो. आपलं आयुष्य ओवाळून टाकतात ते माणसांवर. कुत्रे चावतात ते फक्त घाबरल्यावरच, किंवा राग आला तर. तुम्ही प्रेम दिलं तर तेही फक्त प्रेमच देतात परत. आणि तुम्ही त्यांना त्रास नसेल दिला तर नाहीच येत ते तुमच्या वाटेला… का उगाच त्रागा करून घेतात काही कळत नाही.
माणसापेक्षा जास्त संवेदनशीलता दाखवतात हे प्राणी. आणि असतातही ते मनातून हळवे. त्यांची ज्ञानेंद्रियंही आपल्यातून फार जास्त शक्तीशाली असतात. मालक दूर गेल्यास मैलोनमैल ते मालकाच्या शोधात पायी चालत जातात आणि त्याला शोधून काढतात. त्यांना माणसं लक्षातही राहतात. डॉक्टरही सांगतात अनेकदा, घरात आनंद हवा तर पाळीव कुत्रा आणावा. फक्त त्यांची बुद्धी आपल्याहून कमी असते म्हणून आपण त्यांना माणूस म्हणू शकत नाही. पण कळतं त्यांना सगळं. मोद कळतो, दु:ख कळतं, ताप कळतो, वेदना कळतात, मस्ती करायचा मूड कळतो… सगळं समजतं, आणि ते त्याचप्रमाणे वागतात आपल्याशी. आपल्याला हसवायला उड्या मारतात, पायाशी घुटमळतात… नाहीच जमलं तर मांडीवर डोकं ठेवून आसवंही गाळतात बिचारे… आणि आपण त्यांना काय देतो? प्रेम देतो? वेळ देतो? लक्ष तरी देतो का नीट? मदत करतो त्यांना गरज असेल तेव्हा?
मिरामारला आमच्या कॉलेजच्या जवळच दोन-तीन जागा आहेत, तिथं सतत कुत्री पिल्लं देत असतात. आम्ही त्यांना भेटायला जातो, खायला देतो… पण आणखी कुणी त्यांची सतत काळजी घ्यायला नसतं. ती भुकेलीच राहतात अनेकदा. म्हणून यावेळेला आम्ही त्यांना शेल्टरमध्ये द्यायचं ठरवलं. म्हणून आम्ही शेल्टरमध्ये गेलो, त्यांना पिल्लांचा ठावठिकाणा सांगायला. शेल्टरमधल्या लोकांनी आम्ही सांगितलेला पत्ता लिहून घेतला, आणि त्यानंतर सहज आम्ही शेल्टरचा फेरफटका मारायला गेलो. तिथं प्राण्यांना रेबिजचं वॅक्सिनेशन देतात, बाकीचं औषधपाणी नियमित देतात. त्यांना पिंजर्‍यातल्या घरात ठेवावं लागतं. झूमध्ये ठेवतात तसे पिंजर्‍यात कुत्रे बघून माझा जीव कासावीस झाला. आणि आजूबाजूला अस्वच्छता होती. जरी जेवण-खाण भरपूर मिळत असलं, तरी ते खावंसं वाटेल असा तो परिसर नव्हता. तिथल्या बाईनं सांगितलं की एखादा भयंकर रोग झाल्यास त्यांना मारावंही लागलं. काळीज पिळवटून आलं. इथं कुत्र्यांना आणून ठेवता येतं, तसंच इथनं प्राणी नेऊन ते पाळताही येतात… पण क्वचित कुणी इथनं प्राणी नेतात… सगळ्यांना मोठ्या जातीचे, भारी आणि महागडे प्राणी हवे असतात. आणि तेही नर हवे असतात. इथंही जाती आणि लिंगभेद करतो आपण. इथनं फुकट मिळत असलेले प्राणी आपल्याला आवडत नाहीत… काय मोठा फरक आहे ह्या आणि त्या कुत्र्यांमधे? तेवढंच प्रेम करतात हे तुमच्यावर, तेवढंच रक्षणही करतात तुमचं… उलट त्यांचे चोचले पुरवावे लागतात पेडिग्रीसारखे तसे ह्यांना काहीच नाही… आमच्या-तुमच्यासारखे आमटी-भात खाऊन जगू शकतात हे. इम्युनिटी खूप बळकट असते ह्यांची…
सोशल सर्विस करायचा सहसा चान्स मिळत नाही असं वाटणार्‍यांनी तरी निदान एक कुतूचं पिल्लू, विकत घेण्यापेक्षा अडौप्ट करून बघावं असं मला वाटतं. आहेत अजून फार गोष्टी करण्यासारख्या. आणि ही फार लहान गोष्ट आहे. पण हे प्राणी तुम्हांला खूप-खूप-खू…प प्रेम देतील. तुमच्या ऋणात राहतील, कायमचे.
…………