तो मी नव्हेच!

0
331


बुडाला आग लागली की नेते ताळ्यावर येतात. सत्तरीचे कैवारी विश्वजित राणे यांच्या बाबतीत सध्या हेच झाले आहे. मेळावली आयटीआय प्रकरणात अवघी सत्तरी मेळावलीवासीयांच्या पाठीशी उभी ठाकत असल्याचे दिसताच त्यांना आपल्या पायांखालची वाळू सरकताना दिसली आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पत्र लिहून आयआयटीसंदर्भात महोदयांनी पूर्ण घूमजाव केले. वास्तविक, सांग्याला होणार असलेली आयआयटी सत्तरीत कोणी पळवली? त्या प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी आवाज उठवताच पोलिसांना पाठवून त्यांची पत्रकार परिषद उधळवून कोणी लावली? काही सरकारी कर्मचारी विरोधात उभे राहत असल्याचे दिसताच त्यांच्या बदल्या कोणी करवल्या? सत्तरीच्या आंदोलकांना पोलिसांचा धाक दाखवून आणि त्यांच्या नेत्यांविरुद्ध सूडाची कारवाई करवून त्यांचा आवाज दाबण्याचा अतोनात प्रयत्न कोणी केला? आणि हे सगळे करूनही विरोधक नमले तर नाहीतच, उलट अधिकाधिक संख्येने एकवटत आहेत हे उमगताच सर्वसामान्य जनतेच्या या उठावाने हादरलेले हे महोदय आता स्वतः नामानिराळे होऊ पाहात आहेत?
विश्वजित यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ‘यू टर्न’ तर घेतला आहेच, परंतु मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना आयआयटी प्रकरणात तोंडघशी पाडण्याचा अश्लाघ्य प्रयत्नही केला आहे. ज्यांच्या आग्रहापोटी आणि भरवशावर मुख्यमंत्र्यांनी मेळावली आयआयटी प्रकल्पात खंबीर भूमिका घेतली, तेच आता सावंत यांच्यावर उलटले आहेत. विश्वजित यांच्या या बदललेल्या पवित्र्यामागे एक महत्त्वाचे कारण आहे. या आयआयटीविरोधी आंदोलनाच्या आडून सत्ताधार्‍यांमधलाच एक गट स्वतः विश्वजित यांच्याविरोधात सत्तरीत वातावरणनिर्मिती करून त्यांचे राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी प्रयत्नशील होता हे आता उशिराने विश्वजित यांच्या ध्यानी आले आहे. विश्वजित जरी आज भाजपमध्ये असले, तरी त्यांच्याकडे त्या पक्षाने कधीही विश्वासार्हतेने पाहिलेले नाही. त्यांच्या भाजप प्रवेशाने सत्तरीतील कॉंग्रेसी मंडळी भाजपमय झाली, परंतु निष्ठावंत भाजप कार्यकर्ते देखील मनाने कधीच विश्वजित यांच्याशी जोडले गेले नाहीत. शिवाय हे महोदय भरवशाचे नाहीत हे तर राफेलवरील त्यांची ऑडिओ क्लीप बाहेर आली तेव्हाच पक्षासाठी स्पष्ट झाले. त्यामुळे वारा येईल तसे सूप धरणार्‍या नेत्यावर विश्वास ठेवणे धोक्याचे ठरू शकते याची जाणीव असलेल्या मंडळींनी विश्वजित यांचा सत्तरीतील राजकीय पाया ठिसूळ करण्याचा जोरदार प्रयत्न पद्धतशीरपणे चालवला होता. आयआयटीविरोधी आंदोलनालाही हा पैलू होताच.
पोलिसी दडपशाहीतून विश्वजित यांची प्रतिमा अधिकाधिक मलीन होत चालली होती आणि जरी जिल्हा पंचायतीमध्ये त्यांच्या उमेदवारांच्या पारड्यात मतदान झाले असले, तरी मेळावली प्रकरणात संतापलेली जनता आता त्यांच्याविरुद्ध उठाव करू लागल्याचे दिसू लागले होते. गावामागून गावे या आंदोलनाला पाठिंबा देत पुढे आली. अठरा गावांनी मेळावलीवासीयांना पाठिंबा दिला तो विश्वजित यांच्यासाठी फार मोठा हादरा होता. स्थानिक जनता आपल्या विरोधात चालली आहे हे चित्र सत्तरीवर आपलाच वरचष्मा आहे या दिमाखात आजवर वावरत आलेल्या विश्वजित यांच्यासाठी मानहानीकारक ठरू लागला होता. केंद्रीय पातळीवरही या विषयाची दखल घेतली जाईल आणि त्यातून आपले राजकीय वजन कमी होईल हे कळून चुकल्यानेच ही बाजी मुख्यमंत्र्यांवर पलटवण्यासाठीच त्यांनी स्वतः ‘यू टर्न’ घेत ते पत्र लिहिले आहे. यातून मुख्यमंत्र्यांना या प्रकरणात खलनायक बनवण्याचा त्यांचा प्रयत्न स्पष्ट होतो. विश्वजित यांच्या या खेळीला मुख्यमंत्री कसे परतवून लावतात हे आता पाहावे लागेल. त्यांच्या राजकीय चातुर्याचा आता कस लागेल.
कोणतेही प्रकल्प जोरजबरदस्तीने जनतेवर लादता येत नाहीत हेे आम्ही पुन्हा पुन्हा बजावत आलो होतो. परंतु जनतेच्या विरोधात जाणे महागात पडते हे उमगायला विश्वजित यांना फार उशीर झाला आहे. खरे तर त्यांचे पिताश्री प्रतापसिंह राणे यांनी ‘सत्तरीच्या जनतेला नको असेल तर आयआयटी प्रकल्प नको’ अशी आपली भूमिका फार पूर्वीच स्पष्ट केलेली होती. सत्तरीची जनता आपल्या जमिनींबाबत किती संवेदनशील आहे याची सिनियर राणेंना पुरेपूर कल्पना आहे. त्यामुळेच त्यांनी सुरवातीलाच योग्य भूमिका घेऊन या विषयातून आपले अंग काढून घेतले होते. विश्वजित मात्र सत्तेच्या गुर्मीत राहिले. यातून आपणच खड्‌ड्यात चाललो आहोत हे त्यांना कधी उमगू शकले नाही. ‘मेळावलीत पोलिसी बळाचा वापर करताना आपल्याला विश्वासात घेतले नाही’ असे एक थातुरमातुर कारण या आपल्या बदललेल्या भूमिकेस कारण म्हणून पुढे केलेले असले तरी या बदललेल्या भूमिकेमागची कारणे जाणण्याएवढी सत्तरीची जनता नक्कीच हुशार आहे!