‘तो’ अश्लील व्हिडिओ भाजप नेत्यांनीच व्हायरल केला : ठाकरे

0
6

>> काँग्रेसच्या बैठकीत पक्ष संघटना बांधणीवर चर्चा

भाजपला काही विषय दडपून टाकायचे आहेत. त्यामुळे भाजप नेत्यांकडून काँग्रेसच्या नेत्यांवर निराधार आरोप होत आहेत. काँग्रेस आमदाराचा व्हिडिओ हा त्याचाच एक भाग असून, तो भाजप नेत्यांनी व्हायरल केला आहे, असा आरोप काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी काल केला. गोवा प्रदेश काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी समितीच्या पणजीत झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते.
या बैठकीला काँग्रेसच्या प्रभारी सचिव अंजली निंबाळकर, गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार कार्लुस फेरेरा व इतरांची उपस्थिती होती.

काँग्रेसच्या आमदारांनी बदनामी प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलीस यंत्रणेकडून चौकशीला सुरुवात झाली आहे. भाजप केवळ लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी हा मुद्दा उठवत आहे, असेही माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक बांधणीबाबत खुली चर्चा झाली. सर्व नेते, कार्यकर्ते आगामी जिल्हा पंचायत, विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या कामाला लागले आहेत, असे ठाकरे यांनी सांगितले.

काँग्रेसच्या नेत्यांना बैठकीमध्ये तक्रारी मांडण्याची सूचना करण्यात आली आहे. बैठकीच्या बाहेर माध्यमांसमोर तक्रारी करणाऱ्यांवर योग्य कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत सर्वांना समज देण्यात आली असून, पक्षात गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही, अशी समजही देण्यात आली आहे, असे ठाकरे म्हणाले. तसेच ह्या बैठकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते यांची पक्ष संघटना मजबूत करण्याबाबतची मते जाणून घेण्यात आली. त्यांनी ज्या काही त्रुटी नजरेस आणून दिल्या आहेत. त्यात सुधारणा केली जाणार आहे, असेही ठाकरे यांनी सांगितले.

काँग्रेस पक्ष आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीत इतर विरोधी पक्षांशी आघाडी करण्याबाबत जनतेला विचारून निर्णय घेणार आहे, अशी माहिती काँग्रेसच्या प्रभारी सचिव अंजली निंबाळकर यांनी दिली.
दरम्यान, आमदार कार्लुस फेरेरा यांनी भाजपकडून त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या आरोपाबाबत कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला.

समविचारी पक्षांशी आघाडी करणार
गोव्यातील आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये समविचारी पक्षाशी आघाडी करण्याबाबत केंद्रीय पातळीवर निर्णय घेतला जाणार आहे, असेही माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.