तोतया पोलिसांनी वृद्ध महिलेला लुबाडले

0
7

>> म्हापसा-बस्तोडा जंक्शनवरील खळबळजनक घटना

आम्ही पोलिस अधिकारी आहोत. थोड्या वेळापूर्वीच काही अंतरावर मोठा दरोडा पडला आहे. त्यामुळे अंगावरील दागिने सांभाळा, अशी बतावणी करून दोघा तोतया पोलिसांनी एका वृद्ध महिलेचे मंगळसूत्र, पाटल्या, तोडे असे मिळून लाखो रुपयांचे दागिने हातोहात पळविल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी म्हापसा पोलीस स्थानकात अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी दुपारी म्हापसा-बस्तोडा जंक्शनवर घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी नंदकुमार रायकर (76, रा. कारोणा-हळदोणा) यांनी तक्रार नोंदवली आहे. नंदकुमार गावकर व त्यांची पत्नी हे म्हापशाहून हळदोणेच्या दिशेने दुचाकीवरून जात होते. यावेळी दोघे तोतया पोलीस दुचाकीवरून या दाम्पत्याजवळ आले. त्या भामट्यांनी दाम्पत्यास सांगितले की, तुम्ही ट्राफिक सिग्नल मोडला आहे. तुमचे लायसन्स दाखवा, त्यानुसार फिर्यादीने लायसन्स घरी आहे, असे सांगितले. याशिवाय आम्ही कुठलाही सिग्नल मोडला नाही, असेही सांगितले.

यानंतर, पुढे मोठा दरोडा पडला आहे. त्यामुळे तुमच्या पत्नीच्या अंगावरील दागिने काढून पिशवीत ठेवा, अशी सूचना तोतया पोलिसांनी दाम्पत्यास केली. त्यानुसार नंदकुमार गावकर यांच्या पत्नीने सर्व दागिने काढून पिशवीत ठेवले. त्याबरोबर सर्व दागिने घेऊन संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला. मंगळसूत्र, तोडे, पाटल्या असा लाखो रुपयांचा ऐवज त्यांनी लंपास केला. या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 204, 303 व 3(5) अन्वये गुन्हा नोंद केला आहे.