‘ते’ पत्र पर्रीकरांनी जनतेसमोर ठेवावे : कॉंग्रेस

0
66

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी वास्को येथील कोळसा विस्तार प्रकल्पाबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना पाठविलेले पत्र जनतेसमोर ठेवावे, अशी मागणी कॉंग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी कॉँग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल केली.

कोळसा विस्तार प्रकल्पाला कॉँग्रेसने विरोध केला आहे. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी विस्तार प्रकल्पाला विरोध असल्याचे पत्र केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना पाठविल्याचे म्हटले आहे. भाजप सरकारने मुरगाव बंदरातील कोळसा हाताळणी वाढविण्यासाठी पुढाकार घेतला होता. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी केलेल्या विरोधामुळे कोळसा हाताळणी वाढविण्याच्या प्रयत्नांना खीळ बसली होती. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी केलेल्या वक्तव्यावर नागरिकांचा विश्‍वास नाही. त्यामुळे केंद्रीय मंत्र्यांना पाठविलेले पत्र जनतेसमोर ठेवावे, असेही रेजिनाल्ड यांनी सांगितले.मुख्यमंत्री पर्रीकर यांचे कोळसा हाताळणीला विरोध करणार्‍या नागरिकांनी विजेचा वापर बंद करावा हे वक्तव्य दुर्दैवी आहे. कोळशाचा केवळ वीज निर्मितीसाठी वापर केला जात नाही. तर स्टील व इतर उद्योगात मोठ्या प्रमाणात कोळशाचा वापर केला जातो. कोळसा वाहतुकीसाठी महामार्गांचे रुंदीकरण, रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण, नद्यांचे ड्रेजिंग केले जात आहे. कोळसा सेस सुध्दा कमी करण्यात आला आहे, असा आरोप रेजिनाल्ड यांनी केला.