‘ते’ कॉंग्रेस पक्षाचे मत नाही

0
246

>> सॅम पित्रोडांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर कॉंग्रेसची स्पष्टोक्ती

शीखांविरोधातील १९८४ च्या दंगलींच्या संदर्भात सॅम पित्रोडा यांच्या ‘हुआ तो हुआ’ या वादग्रस्त वक्तव्यानंतर गदारोळ उडाल्याच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस पक्षाने प्रसिद्धीपत्रक जारी करून ते वक्तव्य हे पित्रोडा यांचे वैयक्तिक मत असल्याचे जाहीर केले. पित्रोडा यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजपच्या नेत्यांनी कॉंग्रेस पक्षावर टीकेची झोड उठविली.
सॅम पित्रोडा यांनी ‘१९८४ च्या दंगलीचे काय घेऊन बसलात? जे व्हायचं ते होऊन गेलं. ती दंगल होऊन गेली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षांत काय केले ते देशवासियांना सांगावे’ असे वक्तव्य केल्याने मोठा वाद उसळला. मात्र ते पित्रोडा यांचे वैयक्तिक मत असल्याचे सांगत कॉंग्रेस पक्षाने त्याच्याशी फारकत घेतली आहे.

१९८४ च्या दंगल पीडितांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आमचा पाठिंबा कायम आहे. या विषयावर विरोधात सॅम पित्रोडा किंवा अन्य कोणीही व्यक्त केलेले मत किंवा वक्तव्य हे कॉंग्रेसचे मत नाही असे कॉंग्रेसने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
याचबरोबर कॉंग्रेसने या पत्रकात गुजरातमधील २००२ च्या दंगलीचाही उल्लेख केला आहे. १९८४ च्या दंगल पीडितांबरोबरच २००२ मधील गुजरात दंगल पीडितांनाही न्याय मिळायला हवा ही कॉंग्रेसची भूमिका आहे. कोणत्याही प्रकारच्या व्यक्ती किंवा संघटनेविरोधात त्यांच्या धर्म, प्रदेश अथवा रंगाच्या आधारे करण्यात आलेल्या हिंसाचाराला विरोध असल्याचे कॉंग्रेसने पत्रकामधून स्पष्ट केले आहे. १९८४ च्या दंगलीचे आदेश त्यावेळी पंतप्रधान कार्यालयातून आले होते असा आरोप भाजपाने केला होता. त्यावर सॅम पित्रोडा यांची प्रतिक्रिया विचारण्यात आल्यानंतर पित्रोडा यांनी उपरोल्लेखित भाष्य केले होते.

पंतप्रधानांकडून हल्लाबोल
१९८४ च्या शीखविरोधी दंगलीसंदर्भातील सॅम पित्रोडा यांच्या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घणाघाती टीका केली. या वक्तव्यामुळे कॉंग्रेस पक्षाचे वर्तन व मानसिकता स्पष्ट झाली आहे. या वक्तव्यामुळे कॉंग्रेसच्या मग्रुरीचे दर्शन घडले आहे. अशी टिप्पणी मोदी यांनी हरयाणातील एका जाहीर सभेत केली.