पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील शेवटचे राज्य आता उरले आहे ते म्हणजे तेलंगणा. येत्या गुरुवारी तेथे मतदान होणार आहे. के. चंद्रशेखर राव यांचे भारत राष्ट्रसमितीचे सरकार यावेळी तेथे हॅटट्रिक घडवणार की नाही ह्याचा कौल मतदार त्या दिवशी देणार आहेत. मागील दोन निवडणुकांत काँग्रेसने राव यांची राजवट उलथवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मागील विधानसभा निवडणुकीत तर काँग्रेस तेलगू देसम, प्रो. कोंडारमण यांची तेलंगणा जनसमिती आणि डाव्या पक्षांची महाआघाडी करून लढली होती, परंतु तेलगू देसमशी हातमिळवणी तेव्हा काँग्रेसला महाग पडली. तेलगू देसम हे तेलंगणा राज्यनिर्मितीचे विरोधक होते, हा मुद्दा राव यांनी लावून धरला आणि त्याचा फटका काँग्रेसलाही तेव्हा बसला. यावेळी काँग्रेस स्वतंत्रपणे उभी आहे आणि कर्नाटकमधील चमकदार यशामुळे त्या पक्षाचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. तिसरी शक्ती तेलंगणात चंचूप्रवेश करू पाहते आहे ती म्हणजे भारतीय जनता पक्ष. दक्षिण दिग्विजयाचे भाजपचे स्वप्न कर्नाटकातील दारुण पराभवाने धुळीस मिळाले. त्यामुळे दक्षिणेच्या पाच राज्यांतील शेवटचे आशास्थान म्हणून तेलंगणामध्ये बीआरएस सरकार उलथवून आपली सत्ता आणण्याची स्वप्ने भाजप तेथे पाहत आहे. मात्र, अंतर्गत बंडाळी, पक्षाची हिंदुत्ववादी प्रतिमा, स्थानिक संघटनाचा अभाव, स्थानिक प्रदेशाध्यक्ष बंडी संजयकुमार यांच्या जागी केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांना आणण्याची आलेली पाळी ह्या साऱ्या गोष्टी भाजपला अडचणीच्या ठरल्या आहेत. के. चंद्रशेखर राव गेल्यावेळी जोरात होते. आपल्या सरकारचा कार्यकाळ संपण्याच्या तब्बल नऊ महिने आधी ते निवडणुकीला सामोरे गेले होते आणि ती निवडणूक आपल्या पक्षाला 47 टक्के मते मिळवून दिमाखदारपणे जिंकलेही होते. यावेळीही त्यांनी गेल्या ऑगस्ट महिन्यातच आपले बहुसंख्य उमेदवार घोषित करून विरोधकांना चारीमुंड्या चीत केले होते. मात्र, यावेळी ते तिसऱ्यांदा मतदारांना सामोरे जात आहेत आणि अर्थातच अँटी इन्कम्बन्सीचा त्यामुळे मुद्दा पुढे आला आहे.
के. चंद्रशेखर राव यांना आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रीय नेतृत्वाची स्वप्ने पडली. त्यांनी आपल्या पक्षाचे तेलंगणा राष्ट्रसमिती हे प्रादेशिक नाव बदलून भारत राष्ट्रसमिती केले. राष्ट्रीय स्तरावर पुढे आलेल्या ‘इंडिया’ आघाडीपेक्षा त्यांनी आपले स्वतंत्र अस्तित्व राखले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत प्रवेश करण्याचा त्यांचा प्रयत्न होता असा गौप्यस्फोट मध्यंतरी भाजपने केला होता. दुसरीकडे बीआरएस आणि भाजप यांच्यात गुप्त समझोता असल्याचा आरोप काँग्रेस करीत आली आहे. मात्र, तेलंगणामध्ये बीआरएसची सत्ता उलथवून टाकण्यासाठी जोरदार प्रयत्न भाजप आणि काँग्रेस ह्या दोन्हींकडून चालले आहेत. के. चंद्रशेखर राव मात्र निवांत दिसत आहेत. आपल्यामुळेच स्वतंत्र तेलंगणा राज्यनिर्मिती झाली आणि आपणच त्याचे तारणहार आहोत हे आपले मतदार विसरणार नाहीत असे त्यांना वाटते. ते, त्यांचे नातलग व मंत्री के. टी. रामाराव, टी हरीश राव व कन्या के कविता ही सगळी कुटुंबीय मंडळी बीआरएसची सूत्रे हलवत आहेत. के. टी. रामाराव ह्यांनीही राष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवला आहे. मात्र, भाजपने चंद्रशेखर राव यांच्या ह्या घराणेशाहीला ऐरणीवर आणले आहे. केसीआर यांची कन्या कविता हिचे नाव दिल्लीतील अबकारी घोटाळ्यात पुढे आल्याचा दावा करीत ईडी तेलंगणापर्यंत पोहोचली. मोदींची आणि भाजपची तेलंगणातील स्वच्छ प्रतिमा आणि हैदराबादेतील महापालिका निवडणुकीत भाजपने मिळवलेले यश यामुळे तेलंगणात यावेळी चमत्कार घडेल असा विश्वास भाजप व्यक्त करीत आहे. गेल्यावेळी भाजपला केवळ एक जागा जिंकता आली होती. पण यावेळी आम्हीच बीआरएस सरकारला पर्याय देऊ असे दावे भाजप करीत आहे. तेलंगणात हळदीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. आपल्या देशातून हळदीच्या होणाऱ्या एकूण निर्यातीच्या तीस टक्के निर्यात ही तेलंगणातून होत असते. भाजपच्या केंद्रातील सरकारने राष्ट्रीय हळद महामंडळाची स्थापना करून हळद उत्पादक शेतकऱ्यांना आपल्याकडे आकृष्ट करण्याची धडपड चालवली आहे. दुसरीकडे काँग्रेस आपणच खरे प्रतिस्पर्धी असल्याचे आणि मागील दोन पराभवांचे उट्टे यावेळी निवडणुकीतून काढू असे सांगत आहे. काँग्रेसने इतर राज्यांप्रमाणेच तेलंगणाच्या मतदारांसाठीही सहा हमी जाहीर केल्या आहेत. प्रवीणकुमार यांचा पीएसपी पक्ष अनुसूचित जाती जमातींची मते खेचण्याच्या प्रयत्नात आहेत. इतर पक्षही रिंगणात आहेत. त्यामुळे तेलंगणाची ही बहुरंगी लढत कोणता निकाल देणार? चंद्रशेखर राव हॅटट्रिक करणार की मतदार त्यांना पायउतार करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.