तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदी रेवंत रेड्डी शपथबद्ध

0
17

तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदी काल रेवंत रेड्डी हे विराजमान झाले. हैदराबाद येथील एलबी स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या शपथविधी सोहळ्यात रेवंत रेड्डी यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. तेलंगणाचे राज्यपाल टी. सुंदरराजन यांनी त्यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. भट्टी विक्रमार्क यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

तेलंगणाच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह अनेक काँग्रेस नेते उपस्थित होते.
रेवंत रेड्डी हे तेलंगणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. रेवंत रेड्डी तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री असतील. 2013 मध्ये तेलंगणा राज्याच्या स्थापनेनंतर काँग्रेस पहिल्यांदाच सत्तेत आली आहे. यापूर्वी चंद्रशेखर राव यांनी दोनदा मुख्यमंत्रिपद भूषवले हेाते; मात्र यावेळी त्यांना विजयाची हॅट्रिक करण्यात अपयश आले. रेवंत रेड्डींनी चंद्रशेखर राव यांचे स्वप्न धुळीला मिळवले आणि काँग्रेसकडे सत्ता खेचून आणली.
56 वर्षीय रेवंत रेड्डी यांनी एलबी स्टेडियममध्ये मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधी कार्यक्रमात सुमारे एक लाख लोक सहभागी झाले होते. शपथ घेण्यापूर्वी रेवंत रेड्डी हे सोनिया गांधींसोबत खुल्या जीपमधून स्टेडियमवर पोहोचले.

या सोहळ्यात दामोदर राजनरसिम्हा, उत्तम कुमार रेड्डी, भट्टी विक्रमार्क, कोमाटी रेड्डी, वेंकट रेड्डी, सीताक्का, पोन्नम प्रभाकर, श्रीधर बाबू, तुम्मला नागेश्वर राव, कोंडा सुरेखा आणि जुपल्ली कृष्णा पोंगुलेटी यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
तेलंगणामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला होता. पक्षाने 119 पैकी 64 जागा जिंकत बहुमत मिळवले. बीआरएसला केवळ 39 जागांवरच विजय मिळवता आला. भाजपने तेलंगणात केवळ 8 जागाच जिंकल्या होत्या.