तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदासाठी रेवंत रेड्डी यांच्या नावाची घोषणा

0
19

>> उद्या सकाळी 11 वाजता होणार शपथविधी

तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदासाठी रेवंत रेड्डी यांचे नाव निश्चित करण्यात आले असून, ते गुरुवार दि. 7 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. रेवंत रेड्डी हे तेलंगणाच्या विजयाचे शिल्पकार ठरले आहेत. सुरुवातीला रेवंत रेड्डी यांच्या नावाला काही स्थानिक नेत्यांनी विरोध केला; पण पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

हैदराबादमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला आणि मुख्यमंत्री नियुक्तीचा अंतिम निर्णय पक्षाच्या हायकमांडवर सोडण्यात आला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी, तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत एक बैठक घेण्यात आली. त्यात रेवंत रेड्डी यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी निश्चित करण्यात आले.
तेलंगणात काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार असलेले रेवंत रेड्डी यांना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या विरोधाचा सामना करावा लागल्याची चर्चा आहे. रेवंत रेड्डी यांना विरोध केलेल्या नेत्यांमध्ये काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष एन. उत्तम कुमार रेड्डी, माजी सीएलपी नेते भट्टी विक्रमार्का, माजी मंत्री कोमातिरेड्डी व्यंकटा रेड्डी, माजी उपमुख्यमंत्री दामोदर राजनरसिंह यांचा समावेश आहे. या नेत्यांनी रेवंत रेड्डी यांच्या उमेदवारीला विरोध केला. मात्र काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यांचे नाव अंतिम केले.

यंदाच्या निवडणुकीत तेलंगणातील एकूण 119 जागांपैकी 64 जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. बीआरएसने 39, तर भाजपने 8 जागा जिंकल्या आहेत. येथे सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही एका पक्षाला 60 जागांची आवश्यकता आहे. या निवडणुकीत काँग्रेसला 39.40 टक्के, बीआरएसला 37.35 टक्के आणि भाजपला 13.90 टक्के मते मिळाली.
रेवंत रेड्डी यांनी कोडंगल विधानसभा मतदारसंघातून भारत राष्ट्र समितीचे पी. नरेंद्र रेड्डी यांचा 32,000 पेक्षा जास्त मतांनी पराभव केला होता. विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून रेवंत रेड्डी हे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर राहिले होते.