तेरेखोल येथे ११ लाख चौ. मी. एवढ्या जागेत गोल्फ कोर्स उभारण्यात येत असून त्यामुळे तेरेखोल गावाचे अस्तित्व धोक्यात आले आहेच शिवाय या प्रकल्पामुळे पर्यावरणाचेही मोठे नुकसान होणार आहे. तसेच या प्रकल्पामुळे कूळ कायद्याचाही भंग झाला असल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रवक्ते सुनील कवठणकर यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना केला.या प्रकल्पाला कॉंग्रेसचा पूर्ण विरोध असून पर्यावरण मंत्री आलिना साल्ढाणा यांनी या प्रकल्पाला विरोध का केला नाही. आपले पती माथानी साल्ढाणा यांनी आपले संपूर्ण जीवन पर्यावरणाच्या जतनासाठी खर्च केले होते याचा त्यांना विसर पडला आहे काय, असा प्रश्न त्यांनी केला.
हा प्रकल्प जेथे उभा राहत आहे तेथून १० कि. मी. अंतरावरील परिसर हा पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील आहे. असे असताना या प्रकल्पाला हिरवा कंदिल का देण्यात आला, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तेरेखोल ग्रामस्थांनी या प्रकल्पाला विरोध करावा अशी मागणी करून त्यांनी आंदोलन उभारल्यास कॉंग्रेस त्यांच्या मागे राहील, असे कवठणकर यांनी यावेळी सांगितले. या प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध असताना तो उभारण्यात येत असल्याचे ते म्हणाले. एखादा खासगी प्रकल्पासाठी अशा प्रकारे संपूर्ण गावच आंदण देणे योग्य नसल्याचे कवठणकर म्हणाले. हा शेकडो कोटींचा प्रकल्प असून त्यात मोठा घोटाळा असल्याचा आरोपही कवठणकर यांनी यावेळी केला.