– विष्णुकांत बेहरे, ढवळी – फोंडा
प्राथमिक शाळा संपून जेव्हा आम्ही हायस्कूलमध्ये प्रवेश केला, तेव्हा आम्ही ढवळीहून कवळ्याला जात असू. अर्थातच चालत, म्हणजे १५-२० मिनिटांची वाट. आमचे कुटुंब म्हणजे संस्थान पौरोहित्य करणारे असल्यामुळे सकाळी आंघोळ करून निर्माल्य विसर्जन करूनच शाळेला जावे लागे. साहजिकच शाळेची वेळ सांभाळताना आम्हा भावंडांची फार तारांबळ उडे. त्यात काही वस्तू, पेन, वही, कंपास इत्यादी घरी राहतच असे. पण यावेळी आमच्या घरातील वडीलधारी मंडळी नेहमी एक वाक्य आम्हाला सुनावत असत, ‘तुम्हाला शिस्तीसाठी टेंग्से गुरूजींकडेच ठेवले पाहिजे’. म्हणजे तुमची सर्व कामे वेळेपूर्वीच होतील. तेव्हापासून आम्हा सर्वांना टेंग्से गुरूजींविषयी भीतीयुक्त कुतूहल होते.शालेय शिक्षण पूर्ण करून मी आमच्या घराशेजारी राहणारे सुप्रसिद्ध याज्ञिक कै. तात्या (हरिभाऊ बोरकर) यांच्याकडे नित्यविधी व जुजबी याज्ञिक शिक्षण घेण्यासाठी जात असे. तेव्हा आमचे गुरूजी तात्या यांना कुणीही भेटण्यासाठी या क्षेत्रातील व्यक्ती आल्या तर पाठशाळेचा विषय येतच असे व त्यांच्या तोंडी पण टेंग्से गुरूजींचा उल्लेख असे, तो त्यांच्या शिस्तीविषयी. दरम्यानच्या काळात माझी व टेंग्से गुरूजींची भेट झाली. पण मला तशी त्यांची भीतीच वाटे. नेहमी स्वच्छ कपड्यांत प्रसन्न, पण करारी अशी त्यांची नजर, ठासून शब्दफेक अशा गुरूजींच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव माझ्यावर प्रभाव पडला.
नंतर मी तात्यांकडेच शिकत असताना नागेश महारुद्र संस्थानात अतिरुद्र स्वाहाकार तात्यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. त्यात मी पण सहभागी होतो. ह्या अनुष्ठानात टेंग्से गुरुजींकडे कसली तरी जबाबदारी होती. त्यांच्यात – माझ्यात जुजबी बोलणे घडत असे. त्यांचे बोलणे मोजून मापून, पण करारी. मुखावर तेज असे.
नंतरच्या काळात मी मुद्रण व्यवसायात आलो. त्यांच्या येण्या-जाण्याचा रस्ता आमच्या आस्थापनासमोरून. एक दिवस गुरूजी मला मुद्दाम भेटावयाला आले. कारण साधे. ते म्हणाले,‘पाठशाळेच्या आवारातील शंकराचार्यांचे मंदिर खूपच जुने झाले आहे व ते बांधण्यासंबंधीच्या बैठकीत तू सहभागी व्हावेस’. मी बैठकीला गेलो व तेथूनच पुढे मी त्यांच्या संपर्कात जास्त आलो. गुरूजी तसे मितभाषी, पण जे बोलत ते रोखठोक. शिस्तीत वागणे व बोलणे हा त्यांच्या दैनंदिन व्यवहारातला अविभाज्य घटक आहे व मला त्यांचे हे रोख-ठोक बोलणे फारच भावत असे.
काही वर्षांनी मी संस्थेचा कार्यवाह म्हणून काम पाहिले. ज्या दिवशी आमची कार्यकारिणी कार्यरत झाली त्या दिवशीच्या बैठकीला ते उपस्थित नव्हते. (तसे ते कार्यकारिणीच्या बैठकीला मुद्दाम अनुपस्थित राहत. त्यांचे म्हणणे असे की मी संस्थेचा शिक्षक असल्यामुळे कार्यकारिणीला एखादा निर्णय घेणे कठीण जाऊ नये.) ज्यावेळी त्यांची माझी भेट झाली तेव्हा ते म्हणाले, ‘विष्णुकांत, तुमची कार्यकारिणी म्हणजे माझ्यासाठी खरीच ‘नूतन कार्यकारिणी’ कारण एक तू व अध्यक्ष दिलीप देसाई सोडल्यास इतरांना पाठशाळा कुठे आहे हे देखील त्यांना सांगावे लागेल. कार्यवाह झाल्यापासून मी कमीत कमी आठवड्यातून दोनदा व त्यात रविवारी किमान दोन तास पाठशाळेत घालवित असे. दर भेटीत गुरूजी मला पाठशाळेसंबंधीच्या गोष्टी सांगत. त्यांच्या एकूणच बोलण्यात पाठशाळेविषयीची आत्मीयता ठासून भरली होती. पाठशाळेत एखादा कार्यक्रम झाल्यास त्यासाठी नेहमीच उपस्थितांसाठी भारतीय बैठक असे. मी पाठशाळेसाठी किमान ५० खुर्च्या घेण्याचे ठरविले. सुरुवातीला या कल्पनेला गुरूजीचा विरोध. त्यांचे म्हणणे पाठशाळेत भारतीय बैठक नव्हे तर ती कुठे? पण मी त्यांना खुर्च्यांची उपयुक्तता पटवून दिल्यानंतर माझ्या एक व्यक्ती एक खुर्ची ह्या योजनेस त्यांनी दोन खुर्च्या दिल्या. यातून गुरूजी आपल्या मतांशी आग्रही होते, पण दुराग्रही नव्हते.
पाठशाळेत पूर्वी चालणारा वासंतिक वर्ग पुन्हा सुरू करावा यासाठी मी गुरूजींकडे बोललो त्यावर त्यांचा अनुभव त्यांनी मला सांगितला. तो प्रत्येकानेच लक्षात ठेवण्यासारखा. गुरूजी म्हणाले, ‘काही अपवादात्मक पालक सोडल्यास राहिलेल्या सर्वांना मे महिन्याच्या सुट्टीच्या सहलीला जाताना मुलांची अडचण नको म्हणून त्यांना वासंतिक वर्ग हवा. एकूणच त्यांचे पाठशाळेचे नियम हे विद्यार्थ्यांसाठी कमी व पालकांसाठी जास्त होते. काही आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करणारे पालक मोठ्या कौतुकाने जेव्हा त्यांना आपल्या पाल्ल्याचे गुण सांगत की त्याला आंघोळीला गरम पाणी, चहाबरोबर शेव, चिवडा, लाडू लागतो. हे सर्व ते शांतपणे ऐकून घेत व ते त्या पालकांना म्हणत,‘तुमच्या सकट तुमच्या मुलाची पिशवी घेऊन आपण घरचा रस्ता पकडा.’ वर ते त्यांना सुनावत की पाठशाळेत सर्व विद्यार्थी सारखेच आहेत. लाडू, चिवडा देणार असालच तर सर्वांना पुरेल एवढा द्यावा लागेल. काही वेळा ते मला म्हणत की,‘अरे माझी शिस्त ही मुलांना तर आहेच, पण त्यांच्या पालकांनाही आहे.’ दरवर्षी विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देताना ते घेत असलेल्या मुलांच्या मुलाखतीचा कार्यक्रम खरोखरच पाहण्या, ऐकण्यासारखा असे. मुलाचे नाव विचारल्यानंतर ते त्याला श्री गणेशादी, अ आ ते य र ल व ही मुळाक्षरे म्हणावयास लावत. काही पालकांना ही मुलाखत विचित्र वाटे. पण आमच्या गुरूजींचा अनुभव वेगळाच असे. ते म्हणत,‘आताच्या शाळेतील शिक्षणामुळे शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला आहे. ज्या मुलांना काहीच जमत नाही, त्यांच्यासाठी टेंग्से गुरूजी. त्याच्या पुढेही त्यांचा आणखी एक अनुभव म्हणजे ते म्हणत, ‘एस.एस.सी. चा निकाल चांगला लागला तर पाठशाळेला विद्यार्थी कमी आणि कमी लागला तर आम्हाला विद्यार्थी जास्त’. पण पुढे ते मला हेही सांगत. ‘आमच्याकडे सात वर्षे पूर्ण केलेला विद्यार्थी व पदवीपर्यंत शिक्षण घेतलेला विद्यार्थी यांची तुलना कर. बुद्धी, राहणीमान, मासिक प्राप्ती’ इ. वर ते हे ही सांगायला विसरत नसत की, काही गोष्टींना अपवाद असतो. त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीविषयी त्यांची काही पक्की मते होती. पाठशाळेच्या हिताआड ते कोणतीही गोष्ट होऊ देत नसत. वेळप्रसंगी कार्यकारी मंडळाशीही पंगा घेण्यास त्यांनी मागे पुढे पाहिले नाही. ते नेहमीच आपल्या मताशी ठाम राहिले.
तशी आमची पाठशाळा स्व. श्री. वासुदेव पाटील व श्री. अनंत बखले या द्वयींनी गोमंतक व आजूबाजूच्या कोकण व कर्नाटकात घराघरात पोहोचवली. पण ती त्या तितक्याच समर्थपणे घट्ट रोखून ठेवली ती टेंग्से गुरुजींनीच. ते मला नेहमी म्हणायचे, ‘शिक्षणासाठी जर माणसाला हाय! झाले नाही तर शिक्षणाचे महत्त्वच कळत नाही’. माझ्या कार्यकाळात मला एक दाता मुलांना सकाळच्या आंघोळीसाठी गरम पाणी म्हणून सोलर सिस्टम बसवून देण्यास तयार होता. ते मला जवळ बोलावून म्हणाले,‘हे बघ तू संस्थेची पै देखील खर्च न करता सोलर बसवशीलच, (आमच्या कार्यकारिणीने शाळेत ज्या काही सुधारणा केल्या त्यासाठी संस्थेची एक पै देखील खर्च केली नाही.) पण मुलांनी या वयात गार पाण्याची आंघोळ करायची नाही तर केव्हा?