तृणमूल कॉंग्रेस व मगो पक्ष यांच्यात झालेल्या युतीविषयी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ह्या दोन्ही पक्षांची संस्कृती जुळत नाही, अशी जी टीका केली होती त्याचा काल तृणमूल कॉंग्रेसचे नेते व राज्यसभा खासदार लुईझिन फालेरो यांनी पत्रकार परिषदेत बोलताना समाचार घेतला.
सत्तेवर येण्यासाठी मगो पक्षाचा वापर करून व त्यांच्या दोघा आमदारांना लुटून मगो पक्षाचा विश्वासघात करणे आणि नंतर त्यांना कचरा पेटीत टाकून देणे ही भाजपची संस्कृती आहे का, असा प्रश्न फालेरो यांनी सावंत यांना केला.
यावेळी फालेरो यांनी कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांना कॉंग्रेस पक्ष गोवा फॉरवर्ड ह्या पक्षांची खरोखरच युती झाली आहे की नाही हे उघड करून लोकांना त्याविषयीचे सत्य काय ते कथन करावे, अशी सूचना केली.
राव यांच्या ३० नोव्हेंबरच्या विधानाचा संदर्भ देत फालेरो म्हणाले की कॉंग्रेस व गोवा फॉरवर्डच्या आमदारांनी फक्त हात वर केले होते. दोन्ही पक्षांमध्ये खरोखरच युती झालेली आहे की काय यासंबंधी राव यांनीच स्पष्टपणे बोलावे, अशी मागणी फालेरो यांनी केली.