पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेसच्या आणखी एका आमदाराने पक्षाचा राजीनामा दिला आहे. मागील दोन दिवसांत तीन नेत्यांनी तृणमूलला रामराम ठोकला आहे. तृणमूलचेे नेते सुवेंदू अधिकारी यांनी पक्षाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता आमदार शीलभद्र दत्त यांनी तृणमूल कॉंग्रेसचा राजीनामा दिला. शीलभद्र दत्त यांच्याबरोबर तृणमूलचे नेते कबिरूल इस्लाम यांनी पक्षाच्या अल्पसंख्यांक सेलच्या महासचिव पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे तेही लवकरच तृणमूल सोडणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
सुवेंदू अधिकारी, शीलभद्र दत्त यांच्यासह आणखी एक नेते जितेंद्र तिवारी हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे माजी अध्यक्ष अमित शहा लवकरच पश्चिम बंगालचा दौरा करणार आहे. सुवेंदू अधिकारी यांनी राजीनामा दिल्यानंतर केंद्राने त्यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे.
दरम्यान, सुवेंदु अधिकारी यांनी आमदारकीपाठोपाठ पक्षाच्या सर्व पदांसह सदस्यत्वाचा दिलेला राजीनामा पश्चिम बंगालच्या विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारला नाही. राजीनामा देण्याचा हा फॉर्मेट चुकीचा असल्याचे त्यांनी सांगून अधिकारी यांना २१ डिसेंबर रोजी बोलावून स्वत: राजीनामा सोपवण्यास अध्यक्षांनी सांगितले आहे.