>> अमित शहांच्या निवासस्थानी पक्षप्रवेश
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेसमधून अनेकजण भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. काल रविवारी आणखी पाच नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शाह यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे भाजपची पश्चिम बंगालमध्ये ताकद आणखी वाढली असून तृणमूल कॉंग्रेसला परत हादरा बसला आहे.
काल भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये तृणमूलच्या राजीब बॅनर्जी, वैशाली दालमिया, प्रबीर घोषाल, राथिन चक्रवर्ती आणि रुद्रनील घोष या नेत्यांचा समावेश आहे. या नेत्यांनी शनिवारी भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर पाचही नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर अमित शाह यांनी ट्विट करून याची माहिती दिली.
या नेत्यांच्या भाजप प्रवेशावेळी पूर्वाश्रमीचे तृणमूल कॉंग्रेस व सध्या भाजपात असलेले नेते मुकूल रॉय आणि भाजपचे पश्चिम बंगालचे प्रभारी कैलास विजयवर्गीय हे उपस्थित होते. राजीब बॅनर्जी यांनी अलिकडेच आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्याचबरोबर त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा दिला होता. तर वैशाली दालमिया यांची तृणमूलकडून पक्षविरोधी काम केल्याप्रकरणी हकालपट्टी करण्यात आली होती. प्रबीर घोषाल यांनीही तृणमूलचा राजीनामा दिलेला आहे.