तुलसी विवाह ः एक आध्यात्मिक संस्कार

0
5
  • प्रा. रमेश सप्रे

श्रीकृष्णाशी तुळस किती संलग्न झालेली आहे याचं स्मरण तुलसीविवाह करून देतो. त्यापासून प्रेरणा घेऊन जीवन आनंदानं भरून टाकणं नि मन- सकारात्मक ऊर्जा, विचार यांच्या स्पंदनांनी भारून टाकणं हा तुलसीविवाहाचा मुख्य संदेश आहे, संस्कार आहे. त्यानुसार आपण संकल्प मात्र केला पाहिजे.

भारतीय संस्कृतीचा एक विशेष पैलू म्हणजे सर्व सजीव-निर्जीवांत देवाचं दर्शन नि पूजन. देवदेवतांच्या वाहनांना आधी नमस्कार करून मग देवाचं दर्शन घ्यायचं हा प्रघात आहे. आधी नंदी मग शिवशंकर, आधी गरुड मग विष्णुभगवान, उंदीर- गणेश, हंस- सरस्वती किंवा हंस- ब्रह्मदेव, मोर- कार्तिकेय, इतकंच काय पण लक्ष्मीचं वाहन आहे घुबड आणि महाप्रतापी शनिदेवाचं वाहन आहे कावळा. या सर्वांतून एक महत्त्वाचा संदेश दिला गेलाय की सर्व पशुपक्ष्यांत देवत्व आहे. याशिवाय गोमाता, बैल, नाग यांच्यातही देवत्वाची प्रतिष्ठापना केलेली आहे.

इतकंच काय पण वनस्पतींतही देवत्व-दिव्यत्व पाहून दर्शन-पूजनाचा आग्रह केला गेलाय. श्रावणात पूजेसाठी लागणारी विविध वनस्पतींची पानं- ‘पत्री’- पवित्र मानली जातात. स्मशानाजवळ रस्त्याच्या कडेला वाढलेली रुई ही हनुमंताला प्रिय आहे. गवत- दूर्वा गणेशाला, बिल्वदलं शंकराला तर तुलसी विष्णूला अतिशय प्रिय आहे. वटवृक्ष, पिंपळ, आंब्याची पानंही पूजनीय मानलेली आहेत. यातून केवळ ‘निसर्गस्नेही जीवनशैली’ दिसून येत नाही तर ‘सृष्टीला देवी मानणारी दृष्टीही व्यक्त होते.’ साऱ्या जगाला यातील तपशिलाची जरी नाही तरी समान जीवनतत्त्वाची महती पटली आहे. अधिकाधिक पटत आहे.
यानंतरची गोष्ट म्हणजे विविध पशू, पक्षी, वृक्ष-वनस्पती यांचे सणसमारंभसुद्धा वर्णन करून सांगितलेयत. सामान्यजनांमध्ये साऱ्या सृष्टिमातेविषयी कृतज्ञतेची, आदराची भावना निर्माण होण्यासाठी नि निसर्गाचं संतुलन राखण्यासाठी, जतन-संवर्धन करण्यासाठी अशा पवित्र भावनेचं नि सण-समारंभाचं महत्त्व आजही अबाधित आहे, नि ही निसर्गप्रेमी पूज्य दृष्टी इथून पुढच्या काळात अतिशय आवश्यक आहे.

या पार्श्वभूमीवर तुलसीविवाहाचा विचार करूया. यासंबंधी अनेक कथा पुराणग्रंथांतून वर्णन केलेल्या आहेत. त्यांतील तपशिलाचा विचार न करता रूपकात्मकता, प्रतीकात्मता, मूळ तत्त्व, त्यात दडलेली ‘वसुधैव कुटुंबकम्‌‍’ची विशाल दृष्टी हे मान्य करायला काहीच हरकत नाही.
तुलसीविवाहाची कथा ः ही केवळ एका व्रताची धार्मिक अंगानं वर्णन केलेली कथा नाहीये. चिंतन करून जीवनात उपयोग करण्यासाठीही या कथेत खूप काही आहे. जालंदर नावाचा एक राक्षसवृत्तीचा राजा प्रजेवर खूप अत्याचार करीत असे. देवांनाही तो त्रस्त करू लागला. त्याच्या अफाट सामर्थ्याचं रहस्य काय यावर विचारमंथन केल्यावर लक्षात आलं की त्याची पत्नी वृंदा हिची पतीवरची भक्ती, ती करत असलेली निष्ठापूर्ण पतिसेवा. थोडक्यात म्हणजे तिचं पातिव्रत्य हे जालंदराच्या संरक्षक-कवचाचं काम करीत होतं. यावर एकमेव उपाय म्हणजे वृंदेच्या पातिव्रत्याचा भंग करणे. तिला शीलभ्रष्ट करणे. वरवर पाहिले तर हे चांगले काम नव्हते; पण मानवजातीच्या कल्याणासाठी हे आवश्यक होते. ही जबाबदारी अखेर विष्णूचा पूर्णावतार कृष्णाने स्वीकारली. त्याप्रमाणे त्याने वृंदेला शीलभ्रष्ट केले. त्यामुळे जालंदराचे संरक्षक वज्रकवच दुबळे झाले. त्याचा वध केला गेला. या महत्त्वाच्या कार्यात वृंदाचा उगीचच बळी गेला का? त्यावर उपाय- स्वतः श्रीकृष्णानं तिचा पत्नी म्हणून स्वीकार करणं. या कृत्याची तीव्रता कमी होऊ नये म्हणून दरवर्षी वृंदेशी ती तुलसीच्या रूपात गेल्यावरही हा विवाह चालू राहिला. त्याचाच सोहळा आपण कित्येक शतकं करत आलो आहोत. आता तुलसीविवाह ही अखंड परंपरा बनून राहिली आहे.

अन्य पुराणांत वेगवेगळ्या पद्धतीने तुलसीविवाहाची कथा सांगितली गेलीय- तुलसी ही देवीशक्ती बनून पृथ्वीतलावर येते नि विष्णूचा पूर्णावतार श्रीकृष्ण तिच्याशी विवाह करून तिच्याविषयीची आत्मीयता व्यक्त करतो. त्यांच्या लीला वृंदावनात चालतात.
तुलसीविवाह विधी ः या विवाहाचं स्वरूप आता वधुवरातील विवाहासारखं झालंय. प्रकारही तोच नि काही ठिकाणी प्रमाणही तसेच. तुलसीविवाहाचा पूजाविधी आहे. जर लग्न लावणाऱ्या पुरोहितांची उपलब्धता नसेल तर विधिवत पूजा ही दृक्‌‍श्राव्य (म्हणजे व्हिडिओ नि ऑडिओ) रूपात उपलब्ध आहे, त्याचाही उपयोग मान्य होऊ लागलाय. सुदैवानं या सर्व गोष्टी ‘गुगल’वर सहज मिळतात. त्याही अत्यंत प्रभावी रीतीनं.

प्रचंड विविधता नि तिच्या तळाशी असलेली एकता- एकात्मता हे तर भारतीय संस्कृतीचं महान वैशिष्ट्य आहे. गणेश, देवी (नवरात्र), दिवाळीतलं लक्ष्मीपूजन अशा सर्व पूजा करताना पूजेची द्रव्यं, कृती वेगवेगळी वाटली तरी पूज्यभावना मात्र एकच असते. घरातलं, मंदिरातलं, समाजातलं वातावरणही या काळात आनंदमय, चैतन्यमय असतं. समाजाच्या एकात्मतेसाठी आपले सण-समारंभ त्यांच्या मूळ रूपात एक प्रभावी माध्यम बनतात.
प्रत्यक्ष तुलसीविवाह ः दिवाळी संपली की तुळशीची म्हणजेच तुळशीवृंदावनाची रंगरंगोटी, सजावट होते. एखाद्या नवरीची करावी तशी तुळशीची प्रतिमा सजवली जाते. काही ठिकाणच्या तुळशीवृंदावनांचा आकार नि प्रकार वेगळा असतो. काही कासव, हत्ती अशा प्राण्यांच्या भव्य आकृतींवर वृंदावनं उभारलेली असतात, तर काही पृथ्वीवर म्हणजे पृथ्वीगोलावर बांधलेली असतात. सजवल्यावर ती खूप जिवंत वाटू लागतात.

चातुर्मास आषाढी एकादशीला सुरू होऊन कार्तिकी एकादशीला संपतो. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजे कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत या विवाहाचे मुहूर्त असतात. तुळशीवृंदावनाभोवती उसाची मांडणी केली जाते. शिवाय तुळशीला आवळे, चिंचा अर्पण करतात. विवाहविधी- सामान्य विवाहासारखाच- पूजा, आरती, मंगलाष्टकं. प्रत्यक्ष विवाह अगदी तुळशी नि श्रीकृष्ण यांच्यामध्ये अंतरपाट धरून, अक्षता टाकून साग्रसंगीत होतो. प्रसादाला चिरमुले, मिठाई यांच्या जोडीला काही उत्साही मंडळी आईस्क्रीमसुद्धा वाटतात. वातावरण लग्नासारखंच उत्साह नि उल्हास यांनी अभिमंत्रित झालेलं असतं. फोटो, सेल्फी सगळे प्रकार पार पाडले जातात. अशाप्रकारे तुलसीविवाहाचा सोहळा घराघरांत, खरं तर अंगणा-अंगणांत संपन्न होतो. काही ठिकाणी साऱ्या गावातील तुळशींचे विवाह एकाच दिवशी केले जातात. सर्वत्र जल्लोशाचं वातावरण असतं.

या समारंभाचा विशेष म्हणजे तुळशीला वधूसारखं सजवणं. तिला वस्त्र नेसवलं जातं, हिरवा चुडा भरला जातो, मंगळसूत्रही घातलं जातं. हळद-कुंकू-फुलं तर असतातच. वर म्हणून कृष्णाची मूर्ती असेल तर तिलाही योग्य वस्त्रं, क्वचित फेटाही बांधला जातो. परदेशी मंडळींना अशा साऱ्याच समारंभांचं खूप अप्रूप वाटतं. एका विशिष्ट दिवशी, काही वेळच साजरा होणाऱ्या समारंभासाठी घरातली मंडळी काही दिवस पूर्वतयारी करत असतात. श्रीमंत-गरीब आपापल्या परिस्थितीनुसार समारंभ साजरा करतात. पण त्यातून मिळणारी ऊर्जा, आनंद, सकारात्मक स्पंदनं सर्वत्र सारखीच असतात.
तुळशीचं स्तोत्र, आरती
तुलसी स्तोत्रातील श्लोक अतिशय भावयुक्त नि अर्थपूर्ण आहेत. काही श्लोक असे-
नमामि शिरसा देवीं तुलसीं विलसत्तनुम्‌‍।
यां दृष्टवा पापिनो मर्त्या मुच्यन्ते सर्वकिल्बिषात्‌‍॥
तुलस्या नापरं किंचिद्‌‍ दैवतं जगतीतले।
यथा पवित्रितो लोको विष्णुसंगेन वैष्णवः॥
तुलस्यां सकला देवा वसन्ति सततं यतः।
अतस्ताम्‌‍र्चयेल्लोके सर्वान्‌‍ देवान्‌‍ समर्चयन्‌‍॥
याबरोबरच तुळशीची सोळा नावंही म्हटली जातात-
तुलसी श्रीर्महालक्ष्मीर्विद्याविद्या यशस्विनी।
धर्म्या धर्मानना देवी देवीदेवमनःप्रिया॥
संस्कृतमध्ये तुलसीला विष्णुप्रिया, हरिप्रिया असंही म्हणतात.

  • तुलशीचे प्रकार ः आपल्याला माहीत नसलेले तुळशीचे अनेक प्रकार आहेत. उदा. श्रीकृष्णतुळस, लक्ष्मीतुळस, रामतुळस, नीलतुळस, श्वेततुळस, रक्ततुळस, वन(रान) तुळस इ. या सर्व प्रकारच्या तुळशीत औषधी गुणधर्म आहेत. त्यांचा रस काढून आयुर्वेदात थंडी, खोकला, श्वासाचे रोग यांवर प्रभावी औषधं बनवली जातात.
  • तुलसीविवाहाचा तसेच नित्यतुलसीपूजनाचा संस्कार ः
  • झाडापासून आपल्या ज्या अपेक्षा असतात, त्यांतला औषधी गुण सोडला तर दुसरी कोणतीही अपेक्षा तुलसी पुरी करत नाही. झाडं सुंदर दिसतात, फुलं-फळं देतात, त्यातून सुगंध नि मधुर रस प्राप्त होतात. इतकंच नव्हे तर काही झाडं सावली देतात, तर काहींच्या लाकडाचा घरं, फर्निचर बनवण्यासाठीही उपयोग होतो. पण तुलसी मात्र यांपैकी काहीही देत नाही तरीही तिला आपण पवित्र मानतो. तिला देवांच्या पूजेत मानाचं स्थान देतो. काहीजणांचं तर रोज तुळशीला पाणी घालण्याचं व्रत असतं. या साऱ्याचा एक महत्त्वाचा संस्कार मनावर घडतो. खरं तर आपण घडवून घेतला पाहिजे.
    हा मुख्य संस्कार म्हणजे निष्काम, निरपेक्ष सेवेचा, उपासनेचा. हा जर मनावर घडला तर आपण घरातील म्हाताऱ्या निरुपयोगी जनावरांना कसायांना विकणार नाही आणि आपल्या वृद्ध आईवडिलांची शेवटपर्यंत सेवा करू; त्यांना वृद्धाश्रमात पाठवणार नाही.
  • नुसती पुराणातल्या कथांत सांगितलंय म्हणून तुलसीविवाह किंवा तुलसीची नित्यपूजा करायची नाही, तर सतत साधनेचा संस्कार स्वतःवर घडवण्यासाठी तुलसीपूजन किंवा तुलसीविवाह करायचा. नुसता सण-सोहळा-समारंभ नव्हे, तर एक जीवनोपयोगी संस्कार!
  • भारतीय जीवनशैलीनुसार सर्वांना सहा समान आचार सांगितलेयत. त्यात तुलसीपूजन हा एक महत्त्वाचा आचार आहे. औषधी गुण हा याचा एक भाग आहे.
  • श्रीकृष्णाच्या जीवनाचा आरंभीचा काळ गोकुळ-वृंदावनात गेला. त्यातील बाललीला, किशोरलिला, रासलीला, असुरवधलीला अशा लीलांचं नित्यस्मरण आपल्याला तुळशीवृंदावन करून देतं. श्रीकृष्णाशी तुळस किती संलग्न झालेली आहे याचं स्मरण करून देतो तुलसीविवाह. त्यापासून प्रेरणा घेऊन जीवन आनंदानं भरून टाकणं नि मन- सकारात्मक ऊर्जा, विचार यांच्या स्पंदनांनी भारून टाकणं हा तुलसीविवाहाचा मुख्य संदेश आहे, संस्कार आहे. त्यानुसार आपण संकल्प मात्र केला पाहिजे.
  • श्रीकृष्ण चरित्रातील कृष्णाच्या सुवर्णतुला प्रसंगी रुक्मिणीनं दिलेल्या तुलसीपत्रानं कृष्णाची तुला केली. संतांनी याचं हृद्य वर्णन केलंय. ‘रुक्मिणीने एका तुलसीदलाने गिरिधरासी तुळियेले.’ याचाच संदर्भ घेऊन तुकोबांनी आपल्या अंगणातल्या तुळशीचं जे चित्र रंगवलंय ते अतिशय जिवंत आहे-
    आता काय उणे आमुचे कुटुंबा। बैसलीसे अंबा वृंदावनी।
    एक एक पान त्रिभुवनासमान। वैकुंठी (विष्णू) तो जाण तुका म्हणे॥
    यात आपल्या जीवनातील मिळालेलं आश्वासन हाही मनावरचा संस्कारच नव्हे का?