तुलसी विवाहाचे संपूर्ण पूजाविधी

0
53
  • चिंतामणी केळकर

तुलसी-विवाहासंदर्भात पाहता सांप्रत एकवाक्यता दिसत नाही. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने तुलसी-विवाह साजरा होतो. कार्तिक शुक्ल द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी तुलसी-विवाह करता येतो. यासाठी नक्षत्र, तिथी वगैरे दिनशुद्धी पाहण्याची गरज नाही.

तुलसी-विवाहासंदर्भात पुराणांमध्ये अनेक कथा आलेल्या आहेत. मात्र त्यांपैकी प्रामुख्याने सर्व कथांमध्ये जालंधराची पत्नी वृंदा- तीच तुळशीरूपाने पुजली जाते. वृंदा ही पतिव्रता असल्यामुळे तिच्या कृपेने जालंदर बलाढ्य बनलेला असतो. जालंदराचा वध करण्यासाठी वृंदेचे पातिव्रत्य भंग करणे आवश्यक वाटल्याने जालंधराचे रूप घेऊन विष्णू तिच्या पातिव्रत्याचा भंग करतो. वृंदाच्या ही गोष्ट लक्षात येताच ती विष्णूला शाप देते आणि स्वतः देहत्याग करते.
वृंदा हिनेच तुलसीचे रूप धारण केले. हिला ‘हरिप्रिया’ असेही एक नाव आहे. पुढे हिनेच सीतेच्या रूपात जन्म घेतला आणि त्यानंतर पुढे रुक्मिणीच्या रूपात जन्म घेतला असे मानले जाते. रुक्मिणीचा कृष्णाशी विवाह कार्तिक शुक्ल द्वादशीला झाल्यामुळे त्यादिवशी तुलसी-विवाह करण्याची पद्धत सर्वत्र आहे.
राधेमध्येसुद्धा वृंदाचाच अंश होता, आणि म्हणूनच तुलसी-विवाहाच्या वेळी जी पूजा केली जाते त्यामध्ये रुक्मिणी-दामोदर असे न म्हणता ‘राधा-दामोदर’ असे म्हणण्याची पद्धत आहे.
तुळसस्वरूप वृंदा ही विधवा असल्यामुळे रोजच्या पूजेच्या वेळी तुळशीच्या रोपट्याजवळ हळद-कुंकू वाहत नाहीत. हळद-कुंकू पेढीवर वाहतात. फक्त तुलसी-विवाहाच्या दिवशीच तिला हळद-कुंकू वाहिले जाते अशी परंपरा आहे. संतती होण्यासाठी तुळशीमध्ये गोपाल कृष्ण ठेवून पूजा करण्याची पद्धत आहे. विवाह लवकर होण्यासाठी अविवाहित मुलींनी तुळशीत कृष्णाची मूर्ती ठेवून, पूजा करून तुळशीभोवती प्रदक्षिणा काढण्याची पद्धत आहे.
तुळस ही एक औषधी वनस्पतीसुद्धा आहे. रक्तप्रवाह थांबवणारी, कफवात घालवणारी, हवा शुद्ध करणारी असे अनेक गुण तिच्या अंगात आहेत. तुलसीचेसुद्धा अनेक प्रकार असून साधारण कृष्ण तुळस ही सर्वत्र आढळते. शिवाय घरासमोर तुळस असणे हे हिंदू असण्याचे एक प्रतीक मानण्यात येते.
पूर्वीच्या काळी तुळशी वृंदावनासमोर सकाळी सडा-शिंतोडा घालून रांगोळी काढत असत. घरातील सुवासिनी स्त्रिया तिची पूजा करत. संध्याकाळी तुळशीसमोर दिवा, उदबत्ती पेटवणे ही एक प्रथा आहे/होती.
पेशवाईपर्यंत तुलसी-विवाह समारंभाला फारच महत्त्व दिले जायचे. उत्तर भारतामधील एका राज्यात तर लाखो रुपये खर्च करून मेजवान्या, सनई, वाजंत्रीसकट तुलसी-विवाह साजरा व्हायचा. तुलसी-विवाहासंदर्भात पाहता सांप्रत एकवाक्यता दिसत नाही. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने तुलसी-विवाह साजरा होतो. कार्तिक शुक्ल द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी तुलसी-विवाह करता येतो. यासाठी नक्षत्र, तिथी वगैरे दिनशुद्धी पाहण्याची गरज नाही. आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंतच्या काळाला ‘चातुर्मास’ असे म्हणतात. यादरम्यान अनेक व्रतवैकल्ये केली जातात. चातुर्मासाच्या कालावधीत प्रामुख्याने महाराष्ट्र-गोवा- कर्नाटक या राज्यांमध्ये विवाह समारंभ करत नाहीत. आधी पंढरपूरच्या राजाचे लग्न आणि नंतर आमचे लग्न असे म्हणण्याची महाराष्ट्रात पद्धत आहे.
पूर्वीच्या काळी बऱ्याच लोकांची मातीची घरे होती. त्यावेळी तुलसी-विवाहापूर्वी मातीची तुळस तयार करीत आणि तुलसी-विवाहानंतर गुरेढोरे ही तुळस नष्ट करीत. आता बहुतांशी ठिकाणी चांगले पद्धतशीर तुलसी-वृंदावन बांधलेले असते. जागेअभावी अशक्य असल्यास कमीत कमी कुंडीतून तरी तुळस लावली जाते. फ्लॅट संस्कृतीमध्येसुद्धा हिंदूच्या घरात कुंडीतून तुळस ठेवली जाते. आपल्या घरातील तुळस टवटवीत दिसावी याकडे प्रत्येक गृहिणीचा कल असतो.

काही महत्त्वाच्या गोष्टी
तुलसी-विवाहाच्या दिवशी तुळशीमध्ये ऊस, आवळे, चिंचा, आणि एक दिंडा (एक प्रकारची सालीवर नक्षी कोरलेली काठी) हे मात्र सर्वत्र आवर्जून असते. ज्या ठिकाणी ब्राह्मण येत नाहीत अशा ठिकाणी यजमान उभा राहून अंतरपाट धरून तुलसी-विवाह केला जातो. यामध्ये दिंडा हा वरस्वरूप मानला जातो.
काही समाजांमध्ये आंब्याची माळ, तुळशीची माळ, फुलांची माळ वापरली जाते. दिंडा हा वरस्वरूप मानल्यामुळे त्याला तुळशीची माळ तर तुळशीला आंब्याची माळ घालतात आणि दोघांनाही फुलांच्या माळा अर्पण करतात.
बहुतांश ठिकाणी तुलसी-विवाहाच्या वेळी सुवासिनी बायका जोडवी पेटवतात. (एका पडग्यात छोट्या आकाराच्या 108 किंवा 10,008 वाती घालून त्या पेटवतात आणि हे तबक घेऊन तुळशीभोवती प्रदक्षिणा काढतात.)
कोकणात याचवेळी भाताचे पीक तयार होते आणि त्यामुळे तुलसी-विवाहप्रसंगी दूध-पोहे किंवा गूळ-पोहे वगैरेचा नैवेद्य दाखवून तो सर्वांना देण्याची विशेष पद्धत आहे (चुरमुरे उधळणे किंवा चुरमुरे वाटणे हा प्रकार विचित्र वाटतो). तथापि, तुलसी-विवाह संपन्न झाल्यानंतर चुरमुरे उधळून ‘गोविंदा गोविंदा’ सर्वांनी म्हणण्याची (आधार नाही, पण-) पद्धत आहे.
राधा-दामोदर विवाह असे तुलसी-विवाहाचे स्वरूप असल्यामुळे गोपाल कृष्ण आणि तुळस यांचे लग्न लावणे हे योग्य आहे. तुळस ही यजमानाची कन्या असल्यामुळे विवाहादरम्यान कन्यादानप्रीत्यर्थ तुळशीपत्र घेऊन पाणी सोडण्याचीही पद्धत असते. आषाढ महिन्यात श्रयनी एकादशीला निद्रावस्थेत गेलेला विष्णू प्रबोधिनी एकादशीला जागा होतो. त्यामुळे त्याला तुलसी-विवाहाच्या दिवशी जागे करून विवाह करण्याची पद्धत आहे.
तुलसी-विवाहाच्या दिवशी सकाळी तुळशीवृंदावनाकडे रांगोळी काढून नंतर सजावट केली जाते. बऱ्याच ठिकाणी तिला साडी नेसवून वधूचे स्वरूप दिले जाते. दुपारी महानैवेद्य दाखवण्याचीही पद्धत आहे. घरच्या विवाहपद्धतीप्रमाणेच हळद लावण्याचीसुद्धा पद्धत आहे.

तुलसी-विवाहपद्धती
यजमानाने पाटावर बसावे. समोर तुळस आणि यजमान यांमध्ये ताम्हणात कृष्णाची मूर्ती ठेवावी (कृष्णाची मूर्ती नसल्यास त्याऐवजी सुपारी ठेवून पूजाविधी संपन्न झाल्यानंतर त्याचे विसर्जन करावे). तुलसी-विवाहप्रसंगी पूजाक्रम पुढीलप्रमाणे असतो ः
आचमन, संकल्प, गणेशपूजा, कलश घंटादी पूजा, गोपाल कृष्ण आणि तुळशी यांची षोडशोपचार पूजा, अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणून विधीवत विवाह, नंतर आरती म्हणून जोडवी पेटवून पूजा संपन्न करावी.

पुढे क्रमवार पद्धतीने तुलसी-विवाहातील पूजाविधी दिलेला आहे. सर्व धार्मिक कार्याप्रसंगी गणेशपूजा केली जाते. ती करून नंतर बाकीचा पूजाविधी करावा. प्रामुख्याने गोवा-महाराष्ट्रात ज्या पद्धतीने विवाह करण्याची पद्धती आहे त्याचा विचार करून प्रस्तुत लेख आणि पूजा विधी दिलेला आहे. आचमन करून, स्वतःला कुंकुम तिलक लावून सर्वांना नमस्कार करावा आणि संकल्प करून पूजेला प्रारंभ करावा.

भाग पहिला : श्रीमहागणपती पूजन (गणेशपूजा)

  1. श्रीमन्महागणपतये नमः ध्यायामि (नमस्कार)
  2. श्रीमन्महागणपतये नमः आवाहनार्थे अक्षतान्‌‍ समर्पयामि। (अक्षता)
  3. श्रीमन्महागणपतये नमः आसनार्थे अक्षतान्‌‍ समर्पयामि। (अक्षता)
  4. श्रीमन्महागणपतये नमः पादयोः पाद्यं समर्पयामि (पळीतून किंवा दूर्वा, फुलाने पाणी घालणे)
  5. श्रीमन्महागणपतये नमः हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि। (पळीत पाणी घेऊन त्यात गंध, फूल घालून वाहणे.)
  6. श्रीमन्महागणपतये नमः आचमनीयं समर्पयामि। (पळीतून पाणी सोडणे)
  7. श्रीमन्महागणपतये नमः स्नानीयं समर्पयामि। (पळीतून पाणी घालणे)
  8. श्रीमन्महागणपतये नमः कार्पास्त्रवस्त्रम्‌‍ समर्पयामि। (कापसाचे लाल कुंकूयुक्त दुपदरी वस्त्र घालणे)
  9. श्रीमन्महागणपतये नमः चंदनं समर्पयामि। (चंदन/गंध लावणे)
  10. श्रीमन्महागणपतये नमः हरिद्रा कुंकुमं सिंदुरं समर्पयामि। (हळद, पिंजर (कुंकू), सिंदूर वाहणे)
  11. श्रीमन्महागणपतये नमः पुष्पं-दूर्वांकुरान्‌‍ समर्पयामि (फूल व दूर्वा, शमी इ.)
  12. श्रीमन्महागणपतये नमः सर्वोपचारार्थ अक्षतान्‌‍ समर्पयामि (अक्षता वाहाव्यात)
  13. श्रीमन्महागणपतये नमः धूपं दर्शयामि। (अगरबत्ती ओवाळावी)
  14. श्रीमन्महागणपतये नमः दीपं दर्शयामि। (एकारती किंवा तुपाचा दिवा)
  15. श्रीमन्महागणपतये नमः नैवेद्यं समर्पयामि। (दूर्वा पाण्यात बुडवून डोळ्यावर हात ठेवून नैवेद्य दाखवणे.)
  16. श्रीमन्महागणपतये नमः पुगीफलं दक्षिणां च समर्पयामि। (विडा व दक्षिणा यावर पाणी घालावे) व मंत्रपुष्पप्रीत्यर्थ परत अक्षता घालणे.
    कार्यंमे सिद्धिमायांतु प्रसन्ने त्वयिधातरी।
    विघ्नानिनाशमायांतु सर्वाणि सुरनायक॥
    श्रीमन्महागणपतये नमः अनया विघ्नहर्ता श्रीमहागणपतिः प्रियताम्‌‍ असे म्हणून पळीने हातावरून ताह्मणात पाणी सोडावे.

गणेश पूजेसाठी ः एका ताह्मणात (पडग्यात) थोडे तांदूळ, त्यावर एक नारळ, दोन पाने, एक सुपारी (विडा), दक्षिणा (पैसे), नैवेद्यासाठी केळे, गूळ वगैरे पदार्थ ठेवले जातात. यातील नारळाची सोंड आपल्याकडे असावी, पण दक्षिणेला साधारणपणे होऊ नये. या महागणपतीची पूजा पंचामृतविरहित करण्याची प्रथा असून याचा पूजाक्रम पुढीलप्रमाणे असतो व ही पूजा नाममंत्रानेच केली जाते. जागा कमी असता फक्त थोडे तांदूळ ठेवून- त्यावर सुपारी ठेवून- पूजा करावी.
हे जे श्रीमहागणपतीपूजन आहे, त्याचे स्वरूप ः
ऋद्धि बुद्धिसहितं, सांगम्‌‍, सपरिवारम्‌‍, सायुधं स-शक्तिकम्‌‍, श्रीमहागणपती आवाहयामी असे आहे. म्हणजेच या कार्याच्या ठिकाणी असलेल्या दुःशकुनाच्या परिहारार्थ दुष्टप्रवृत्तीचा विनाश, सुबुद्धीसाठी, निर्विघ्न कार्यसिद्धीसाठी केले जाते.
श्रीमहागणपती पूजनामधील काही विधिनिषेध :

  • काही ठिकाणी (प्रामुख्याने कोकण प्रांत सोडून) नारळाऐवजी सुपारी ठेवतात.
  • मुख्य पूजाविधी संपन्न झाल्यावर या गणेशपूजेवर- नारळावर- विसर्जयामि म्हणून अक्षता घालून विसर्जन करतात व या वस्तू पुरोहिताला अर्पण करतात. आवाहन-आसनादि उपचाराचा यामध्ये उल्लेख झाल्याने त्याचे विसर्जन आवश्यक असते. जर हे ताह्मण-पडगा मुख्य देवतेच्या विसर्जनापर्यंत यत्किंचितही न हलता स्थिर राहणार असेल तर काही दिवस ठेवण्यास हरकत नाही. पण तसे घडत नाही. त्यामुळे मुख्य पूजनविधी संपल्यानंतर याचे विसर्जन योग्य असते.

श्रीमहागणपतीपूजन व तुलसी-विवाहादी पूजन यामध्ये ः

  1. कलश- कलश देवताभ्यो नमः सर्वोपचारार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामि।
  2. शंख (यात पाणी भरून ठेवून पूजा करणे)- शंख देवताभ्यो नमः सर्वोपचारार्थे गंध पुष्पं समर्पयामि।
  3. घंटा- घंटिकायै नमः सर्वोपचारार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामि।
  4. दीप (समई) दीप देवताभ्यो नमः सर्वोपचारार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामि।
  5. प्रोक्षण- सर्व वस्तूंच्या शुचीर्भूतीसाठी दूर्वांकुर, तुळशीपत्र किंवा फुलाने पाणी स्वतःवर व सर्व वस्तूंवर प्रोक्षण करावे.

त्यानंतर पुढील क्रमाने ‘राधा दामोदर देवताभ्यो नमः।’ किंवा ‘राधा दामोदर देवतायै नमः।’ असे म्हणत पूजा करावी. गोपाल कृष्ण आणि तुळस यांची एकाच वेळी पूजा करण्यास हरकत नाही किंवा जर तुळस खूप उंच असेल तर प्रथम कृष्णाची व नंतर तुळशीची याच क्रमाने पूजा करावी. तांबूल म्हणजे विडा या 13 उपचारापर्यंतची पूजा करावी.

भाग दुसरा
राधा-दामोदर पूजन

  1. श्री राधा दामोदराय नमः आवाहनार्थे अक्षतान्‌‍ समर्पयामि। (अक्षता)
  2. श्री राधा दामोदराय नमः आसनार्थे अक्षतान्‌‍ समर्पयामि। (अक्षता)
  3. श्री राधा दामोदराय नमः पादयोः पाद्यं समर्पयामि। (पळीतून किंवा दूर्वा, फुलाने पाणी घालणे)
  4. श्री राधा दामोदराय नमः हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि। (पळीत पाणी घेऊन त्यात गंध, फूल घालून वाहणे.)
  5. श्री राधा दामोदराय नमः आचमनीयं समर्पयामि। (पळीतून पाणी सोडणे)
  6. श्री राधा दामोदराय नमः स्नानीयं समर्पयामि। (पळीतून पाणी घालणे)
    नंतर (पंचामृत- दूध, दही, तूप, मध, साखर) आणि त्यानंतर परत शुद्धोदक म्हणून पाणी घालणे. गंधोदक म्हणजे पळीत पाणी घेऊन गंध घालून स्नान, सुगंधी द्रव्याने स्नान, उष्णोदक- गरम पाण्याने स्नान घालावे. प्रत्येक वेळी शुद्धोदक म्हणून पाणी घालावे. यावेळी तुळशीने पाणी प्रोक्षण करत एखाद्या स्तोत्राने अभिषेक वगैरे करावा.
    श्री राधा दामोदराय नमः पंचामृतशेषनैवेद्यम्‌‍ समर्पयामि असे म्हणून उरललेल्या पंचामृताचा नैवेद्य दाखवून मग गंध, फूल, तुळशी वहाव्या.
    (शेषनैवेद्य हेच तीर्थ म्हणून घेतात.)
  7. श्री राधा दामोदराय नमः कार्पास्त्रवस्त्रम्‌‍ समर्पयामि। (कापसाचे लाल कुंकूयुक्त दुपदरी वस्त्र घालणे)
  8. श्री राधा दामोदराय नमः उपवस्त्रार्थे अक्षतान्‌‍ समर्पयामि।
  9. श्री राधा दामोदराय नमः चंदनं, हरिद्रा कुंकुमं सिंदुरं समर्पयामि। (हळद, कुंकू, अबीर, सिंदूर, बुका, सुगंधी द्रव्य वाहणे.)
  10. श्री राधा दामोदराय नमः पुष्पं-तुलसीपत्रं समर्पयामि। (फूल, तुळशी, पत्री इ.)
  11. श्री राधा दामोदराय नमः धूपं दर्शयामि। (अगरबत्ती ओवाळावी)
  12. श्री राधा दामोदराय नमः दीपं दर्शयामि। (एकारती किंवा तुपाचा दिवा)

13. श्री राधा दामोदराय नमः नैवेद्यम समर्पयामि (दूधपोहे, गूळपोहे नैवेद्य) तथा च तांबुलम्‌‍, दक्षिणाम्‌‍ फलम्‌‍ समर्पयामी (विडा, पैसे, फळ यांवर पाणी घालावे)

भाग- तिसरा
तुलसी-विवाह
नंतर हातात पाण्याने भरलेला पेला घेऊन प्रत्येकवेळी पाणी घालत तीन प्रदक्षिणा काढाव्या व पुढील मंत्र म्हणावा-
उत्तिष्ठोतिष्ठ गोविंद उत्तिष्ठ गरुडाध्वज।
उत्तिष्ठ कमलाकांत वासुदेव जगत्पते ॥
त्यानंतर तबकातील कृष्णाच्या मूर्तीचे मुख तुळशीच्या दिशेने करावे. सर्वांना अक्षता वाटाव्या. यजमानाने हातात तुळस आणि फुलांच्या माळा घेऊन उभे राहावे. तुळस आणि कृष्ण यांच्या मध्ये स्वस्तिक चिन्ह रेखाटलेला अंतरपाट धरावा.
नंतर काही मंगलाष्टके म्हणावीत. उपस्थितांनी कृष्ण आणि तुळस यांच्यावर अक्षतारोपण करावे.
‘आली लग्न घटी…’ म्हणून झाल्यानंतर अंतरपाट काढून तुळशीची माळ तुळशीला स्पर्श करून कृष्णाला वहावी आणि फुलांची माळ कृष्णाला स्पर्श करून तुळशीला अर्पण करावी. त्यानंतर कृष्णमूर्ती असलेले ताह्मण तुळशीच्या रोपट्यापर्यंत नेऊन स्पर्श करून परत कृष्णाचे मुख आपल्याकडे करून पूर्वीप्रमाणे ताह्मण ठेवावे.

त्यानंतर यजमानाने कन्यादानप्रीत्यर्थ तुळशीपत्र व सुपारी ठेवून त्यावर पाणी सोडावे. त्यानंतर पंचारती आणि जोडवी पेटवून आरती म्हणावी. (कृष्णाची आरती, तुळशीची आरती, ‘युगे अठ्ठावीस’ ही विठोबाची आरती वगैरे आरत्या म्हणाव्या) त्यानंतर…

  1. राधा दामोदर देवतायै नमः प्रदक्षिणां समर्पयामि (3,5,7 प्रदक्षिणा)
  2. राधा दामोदर देवतायै नमः नमस्कारान्‌‍ समर्पयामि (साष्टांग नमस्कार)
  3. राधा दामोदर देवताय नमः मंत्रपुष्पांजली समर्पयामि (ओंजळीने कृष्ण आणि तुळशीवर फुले अर्पण करून मागणे मागावे, सांगणे करावे)
    नंतर हातात पाणी घेऊन ‘श्री राधा दामोदर देवतायै नमः यथा ज्ञानेन यथामिलित उपचारद्रव्यैः षोडशोपचार पूजनाख्येन कर्मणा श्री राधा दामोदर प्रियताम्‌‍।’ असे म्हणून पाणी सोडावे.
    पुन्हा ‘केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः’ असे म्हणून आचमन करून पुढे ‘गोविंदाय नमः विष्णवे नमो, वैष्णवे नमो, विष्णवे नमः’ असे म्हणून पाणी सोडावे. इथपर्यंत पूजा झाल्यानंतर पूजेची (तुलसी-विवाहाची) शास्त्रोक्त सांगता होते.

  • पूजाविधी आणि त्यात वाहण्यात येणारे उपचार यांचे वेगवेगळे मंत्र असले तरी
    सर्वत्र दोन पद्धती महत्त्वाच्या आहेत. त्या म्हणजे-
  1. षोडशोपचार पूजा- सोळा उपचार
  2. पंचोपचार पूजा- पाच उपचार
  3. गंध, 2. फूल, 3. धूप, 4. दीप, 5. नैवेद्य.

श्री गं गणपतये नमः॥ किंवा श्रीमन्महागणपतये नमः॥ असे म्हणून गणेशपूजा, राधा दामोदराभ्यो नमः। (उपचार- कृतीचे नाव) समर्पयामि। एवढेच म्हणून क्रमानुसार जरी पूजा केली तर ती सशास्त्र होते.

क्षुल्लक पण महत्त्वाच्या गोष्टी :

  • आरास करताना पूजा व्यवस्थित करता येईल ही काळजी घ्यावी.
  • समई, उदबत्ती, धूप यांचे सान्निध्य आरास करताना त्याजवळ येऊ देऊ नये.
  • भव्य तुळस असता व उंचीने-वयाने लहान व्यक्ती पूजा करीत असता, दुसऱ्याने शुचीर्भूत राहून पूजाविधीला हातभार लावावा.
  • एका वातीवर दुसरी वात शक्यतो पेटवू नये. तसेच कमीत कमी तुपाची वात तेलाच्या वातीवर पेटवू नये. दिवा-समईची ज्योत दक्षिणेकडे तोंड करून पेटवू नये. पूजेपासून विसर्जनापर्यंत सतत दिवा पेटत असावा (विजेचा बल्ब नव्हे). वारा वगैरे कारणांनी विझल्यास लक्षात येताच लगेच लावणे. अशा प्रकारे जर दिवा विझला तर अशुभ नाही.
  • विडा किती पानांचा याला बंधन नाही. कमीत कमी दोन पाने व शिरा खाली. त्यावर सुपारी ठेवावी.
  • घंटानाद : स्नाने, धूपेच दीपेच तथा निरंजनेच।
  • एखादा उपचार नसता अक्षता वाहाव्या. षोडशोपचारात अक्षता नसल्या तरी वाहणे आवश्यक आहे. (द्रव्याभावे प्रदातव्याः क्षापिताः तंदुलाः शुभाः) उदाहरणार्थ- श्री राधा दामोदराय नमः उपवस्त्रार्थे अक्षतान्‌‍ समर्पयामि ।
  • ज्या वस्तू मांडतात त्या वस्तू पडून विपरित काही घडणार नाही याची प्रथमपासून काळजी घ्यावी.
  • भक्तीभावे केलेली मानसपूजासुद्धा भगवंताला पोचते. पूजा ही अनेकांग भक्ती आहे. पूजादिषु अनुरागाः इति पराशर्याः। प्रेमाने पूजा करणे हीच भक्ती असे व्यासमुनी म्हणतात. रामदासांनी आरतीमध्ये दर्शनमात्रे मन कामना पुरती असे म्हटले आहे, तर मानसपूजा किंवा प्रत्यक्ष पूजेवेळी उपचार वाहतात ते स्पर्शमात्रेही देवाला पोहोचतील हे मर्म ध्यानी घ्या.