नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान, तुर्कीने पाकिस्तानला मदत केल्याचे समोर आले, तेव्हापासून भारताने तुर्कीविरोधात कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. भारत सरकारने देशातील सर्वात मोठी खासगी विमान कंपनी इंडिगोला तुर्की एअरलाईन्ससोबतचा विमान भाडेपट्टा करार रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत. भारत आणि तुर्कीमधील वाढत्या राजनैतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) इंडिगोला तुर्की एअरलाइन्सकडून घेतलेल्या दोन बोईंग 777-300ईआर विमानांसाठी करार फक्त तीन महिन्यांसाठी वाढवण्याची परवानगी दिली आहे, पण यावेळी अटी घातल्या आहेत. या कालावधीनंतर इंडिगो हा करार रद्द करेल आणि भविष्यात त्यासाठी आणखी मुदतवाढ मागणार नाही, अशी अट घातली आहे. डीजीसीएने दोन्ही विमानांच्या भाडेपट्ट्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत तीन महिन्यांनी वाढवली आहे. इंडिगोने सहा महिन्यांची मुदतवाढ मागितली होती, ती नाकारली.