तुरुंगातील भांग पार्टीप्रकरणी पाच कर्मचारी निलंबित

0
196

कोलवाळ – बार्देश येथील मध्यवर्ती कारागृहातील भांग पार्टी प्रकरणी तुरूंग प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून पाच तुरूंग कर्मचार्‍यांना काल निलंबित केले आहे. गेल्या १३ फेब्रुवारीला मध्यरात्री कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात भांग पार्टी पार पडली. या भांग पार्टीत कैदी आणि कर्मचारी सहभागी झाले. कैद्यांनी भांग पिऊन दंगामस्ती केली. मध्यरात्रीच्या सुमारास कारागृहातील दोन कैदी व एका तुरूंग कर्मचार्‍याला अस्वस्थ वाटू लागल्याने भांग पार्टीचा प्रकार उजेडात आला आहे.
निलंबित केलेल्या कर्मचार्‍यांमध्ये सहाय्यक जेलर शिवप्रसाद लोटलीकर, हेडगार्ड राजेंद्र वाडकर, जेलगार्ड किरण नाईक, विजय देसाई, कायतान कुतिन्हो यांचा समावेश आहे. या प्रकरणी तुरूंग प्रशासनाने अर्तंगत चौकशी केली असून त्या दिवशी रात्र पाळीत काम करणार्‍या सहाय्यक जेलर व इतर कर्मचार्‍यांना घटनेला जबाबदार धरून निलंबित करण्यात आले आहे. अति भांग प्राशन केलेल्या कैदी सुर्वेश उर्फ बाबू आरोलकर आणि विनय गडेकर याच्यावर बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले आहेत. तसेच निलंबित जेलगार्ड किरण नाईक याला उलट्या सुरू झाल्या होत्या. या भांग पार्टीला एक कैदी जबाबदार असल्याची चर्चा सुरू आहे. दुधात भांग मिसळून प्यायला दिल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणी अधीक्षक नारायण प्रभुदेसाई यांनी तक्रार केली आहे.